एपीएमसीतील शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंसह क्लार्कची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 07:40 AM2024-04-27T07:40:34+5:302024-04-27T07:41:15+5:30

गुन्हे शाखेने केली होती अटक, पोलिसांनी या प्रकरणात बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज, शंकर पिंगळे यांचीही चौकशी केली आहे.

Clerk sent to judicial custody along with Sanjay Panser in APMC toilet scam case | एपीएमसीतील शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंसह क्लार्कची न्यायालयीन कोठडीत रवानगी

एपीएमसीतील शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंसह क्लार्कची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे व क्लार्क शिवनाथ वाघ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री त्यांना अटक केली होती.

एपीएमसी आवारातील शौचालयाच्या ठेक्यात झालेल्या साडेसात कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी काहींना अटक केली होती.

शशिकांत शिंदे यांचेही नाव 
तपासाला अधिक गती देऊन मंगळवारी रात्री संजय पानसरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, चौकशीअंती त्यांना अटक केली होती. त्याशिवाय एपीएमसीचे क्लार्क शिवनाथ वाघ यांनाही यावेळी अटक केली होती. दोघांनाही शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत पानसरे यांना झालेली अटक व या प्रकरणात बाजार समितीचे इतरही काही जण व सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचेही नाव या प्रकरणात गुंतले गेलेले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज, शंकर पिंगळे यांचीही चौकशी केली आहे.

Web Title: Clerk sent to judicial custody along with Sanjay Panser in APMC toilet scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.