चेन्नईत जलप्रलय

By admin | Published: December 3, 2015 04:03 AM2015-12-03T04:03:56+5:302015-12-03T04:03:56+5:30

तामिळनाडूत गेले दोन दिवस सुरू असलेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नई व उत्तर तामिळनाडूमधील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले असून, पावसाचे हे पाणी

Flood in Chennai | चेन्नईत जलप्रलय

चेन्नईत जलप्रलय

Next

चेन्नई : तामिळनाडूत गेले दोन दिवस सुरू असलेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नई व उत्तर तामिळनाडूमधील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले असून, पावसाचे हे पाणी अक्षरश: आणीबाणी घेऊन आले आहे. ना वृत्तपत्रे, ना विमानसेवा, ना रेल्वे वाहतूक ना रस्त्यावर वाहतूक, शिवाय वीज गायब, मोबाइलचे नेटवर्क डेड, बँका, आयटी कंपन्या, सर्व कार्यालये, शिक्षणसंस्था, तसेच एटीएम सेवाही बंद अशी अभूतपूर्व स्थिती चेन्नईवासीय अनुभवत आहेत.
पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे तळातील वा खालच्या मजल्यांवरील लोक वरच्या मजल्यांवरच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आश्रयाला गेले आहेत. गेल्या काही दिवसांत हाहाकार उडवून देणाऱ्या या पावसाने १९७ जणांचा बळी घेतला आहे. या भीषण पावसाने २६ जुलै २००५ मध्ये जलमय झालेल्या मुंबईच्या आठवणीही फिक्या ठरविल्या आहेत. तशात पुढचे तीन दिवस असाच भीषण पाऊस कोसळण्याच्या अंदाजाने चेन्नईकरांचा थरकाप उडाला आहे. या परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी थेट लष्कर आणि नौदलाला पाचारण करण्यात आले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

१०० वर्षांतील पावसाचा विक्रम
मंगळवारी चेन्नईत केवळ १४ तासांत २०० मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. गेल्या १०० वर्षांत चेन्नईत एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस होता. बुधवारीही पावसाचा जोर कायम असल्याने, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्तेही जलमय झाले.
चेन्नई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या अड्यार नदीवरील सईदापेठ पुलावरून पुराचे पाणी वाहत असून, चेन्नई शहराचा आजूबाजूंच्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. कांचीपूरम, तिरवल्लूर व कुड्डलूर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे.
रेल्वेमार्ग व रस्ते जलमय झाल्याने बसस्थानक, रेल्वेस्थानकांत शेकडो लोक अडकून पडले आहेत. अनेक भागांतील वीजसेवा खंडित करण्यात आली असून, लोकांना दूध आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सैन्य सक्रिय
चेन्नईत, तसेच अन्य भागांत तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य आरंभले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ३० पेक्षा अधिक पथकेही मदत कार्यात गुंतली आहेत.

चेन्नई विमानतळावरील रन-वेवर पुराचे पाणी साचल्याने गुरुवारी सकाळपर्यंत विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. १५०० प्रवाशांसह एकूण ३५०० लोक अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि नौदलाने युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य आरंभले आहे.

१३७ वर्षांची परंपरा खंडित
कर्मचारीच पोहोचू न शकल्याने इतर वृत्तपत्रांसारखीच गत झालेल्या ‘दि हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राचे १३७ वर्षांत प्रथमच चेन्नईत प्रकाशन झाले नाही.

48तास अटीतटीचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईत येत्या ७२ तासांपर्यंत पावसाचा जोर कायम असेल. मात्र, त्यातही पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता बघता, अटीतटीचे आहेत.

काश्मिरात थंडीची लाट
काश्मिरात थंडीची लाट असून,
कारगीलमध्ये सर्वाधिक कमी उणे
१०.३ अंश से. तापमानाची नोंद झाली.

मोदींची चर्चा; राहुल यांची चिंता
दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री जयललिता यांना फोेन करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्याची हमीही त्यांनी दिली, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर चेन्नई व तामिळनाडूच्या अन्य भागांतील मुसळधार पावसावर चिंता प्रकट करीत, काँग्रेस कार्यकर्त्यांना मदतकार्यांत भाग घेण्याचे आवाहन केले.

Web Title: Flood in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.