ग्रामीण गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी

By admin | Published: December 3, 2015 04:02 AM2015-12-03T04:02:03+5:302015-12-03T04:02:03+5:30

लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाची लाट आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसने भाजपच्या

Congress rush in rural Gujarat | ग्रामीण गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी

ग्रामीण गुजरातमध्ये काँग्रेसची मुसंडी

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपाची लाट आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. सहाही महापालिकांमध्ये भाजपने वरचष्मा कायम राखला असला तरी ग्रामीण भागात कमळ कोमजल्याचे चित्र आहे.
३१ पैकी १८ जिल्हा परिषदांमध्ये बाजी मारल्याचा आणि अन्य पाच जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी टिष्ट्वटरवर केला असला तरी अंतिम निकाल घोषित होईपर्यंत त्याला अधिकृतरीत्या दुजोरा मिळालेला नव्हता. त्यांनी ६.५ कोटी गुजरातींचे अभिनंदनही केले. हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे राज्य ढवळून काढले असताना त्यांचा महापालिका निवडणुकीत प्रभाव दिसून आला नाही. मोदी-शाह आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासाठी ही बाब दिलासादायक ठरली.राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपला काँग्रेसने दोन दशकानंतर पंचायत निवडणुकीत का होईना भुईसपाट केले आहे. मोदी मुख्यमंत्री असतानाच्या १२ वर्षांच्या काळात काँग्रेस बहुस्तरीय निवडणुकीतून जवळपास हद्दपार झाली होती.२०१२ मधील विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात १८२ पैकी ११५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भाजपने मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या सर्व २६ जागा पटकावल्या होत्या. (वृत्तसंस्था)

भाजप सरकारविरुद्ध कौल- काँग्रेस
भाजप सरकारविरुद्ध हा कौल असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. २०१० मध्ये ३१ पैकी ३० जिल्हा परिषदांमध्ये झेंडा लावणाऱ्या भाजपला हा जबर हादरा मानला जातो.
२३० तालुका पंचायतींमध्ये एकूण ४७७८ जागा असून काँग्रेसने २२०४ जागांवर आघाडी मिळवत भाजपाला धोबीपछाड दिली आहे.
५६ पैकी ३४ नगर परिषदांमध्ये भाजप तर ९ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. सहा महापालिकांसाठी २२ नोव्हेंबर रोजी,
३१ जिल्हा परिषदा, २३० तालुका पंचायत, ५६ नगर
परिषदांसाठी २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली.

हार्दिक निष्प्रभ ; आनंदीबेन यांचा ‘गड आला पण सिंह गेला’
आनंदीबेन यांना मेहसाना जिल्'ातील भऊचराजी ही गटपंचायत भाजपकडे कायम राखता आली नाही. त्याचा उल्लेखही सूर्जेवाला यांनी ब्लॉगवर केला आहे. एकूणच आनंदीबेन यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली.
मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच राजकीय लढाई आनंदीबेन पटेल यांनी संमिश्र यश मिळविले आहे. भाजपने अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर आणि वडोदरा या सहाही महापालिका कायम राखल्यामुळे हार्दिक पटेल यांचे आंदोलन निष्प्रभ ठरल्याचे मानले जाते. हार्दिक यांच्या वीरमगाम नगर परिषदेतही भाजपने बाजी मारली. पटेल समुदायाला आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ हार्दिक यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. हार्दिक यांच्या खास निकटस्थ दोघांच्या पत्नींनीही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

हे राज्यातील मिनी निवडणूक होती. ग्रामीण भागात बाजी मारत काँग्रेसने हा राज्य सरकारविरुद्ध कौल असल्याचे दाखवून दिले आहे.
- भारतसिंग सोळंकी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.

उंझा नगर परिषदेवर अपक्षांचा झेंडा...
गेल्या दोन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मेहसाना जिल्'ातील उंझा नगर परिषदेच्या ३६ पैकी ३५ जागा जिंकत अपक्षांनी या राष्ट्रीय पक्षाला पार भुईसपाट केले. एक जागा काँग्रेसने पटकावल्यामुळे भाजपच्या पदरी चक्क भोपळा पडला आहे. उंझामध्ये पाटीदार समुदायाचे वर्चस्व असून आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसल्याचे मानले जाते. हार्दिक पटेल यांना या शहरात अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले होते.

Web Title: Congress rush in rural Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.