..तर दक्षिण मुंबईवर पुन्हा आघाडीचा वरचष्मा?

By admin | Published: September 23, 2014 02:30 AM2014-09-23T02:30:27+5:302014-09-23T02:30:27+5:30

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी

Again, South Mumbai's lead again? | ..तर दक्षिण मुंबईवर पुन्हा आघाडीचा वरचष्मा?

..तर दक्षिण मुंबईवर पुन्हा आघाडीचा वरचष्मा?

Next

जमीर काझी- मुंबई
लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील केवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाल्याने येत्या विधानसभेच्या रणसंग्रामात आघाडीच्या उमेदवाराचे पानिपत होण्याची अपेक्षा असताना महायुती फुटल्यास हे चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केल्यास आघाडीला ६ पैकी सध्याच्या ४ जागा राखता येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणाहून सेनेचे अरविंद सावंत पावणेदोन लाखांवर मतांनी विजयी झाले होते. त्यात वरळी मतदारसंघातून त्यांना ३५ हजारांवर मताची आघाडी मिळाली होती. मात्र आता या ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे राहिल्यास गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर सलग चौथ्यांदा सहजपणे निवडून येऊ शकतील. सध्याच्या फॉर्मुल्यानुसार ही जागा सेनेच्या वाट्याला असून त्यांच्याकडून आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपामधूनही त्यासाठी इच्छुक असून त्याचा फायदा अहीर यांना होऊ शकतो. मनसेची हवा नसली तरी त्या उमेदवारीचा फायदा कॉँग्रेस आघाडीला होईल.
शिवडी मतदारसंघात प्रतिनिधित्व करीत असलेल्या मनसचे गटनेते बाळा नांदगावकर यांना पुन्हा निवडून येणे अशक्य असल्याने ते पुन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक नाहीत. मात्र युती तुटीत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भायखळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्याबद्दल मतदारसंघात उघडपणे नाराजी आहे. विशेषत: मुस्लीम उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. गेल्यावेळी सेना व कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा त्यांना मिळाला होता. या वेळी गवळीची कन्या गीता गवळी इच्छुक असून, सेनानेतृत्व त्यासाठी राजी असल्याचे सांगितले जात आहे.
मुस्लीमबहुल मतदार असलेल्या मुंबादेवीमध्ये लोकसभेत कॉँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार अमीन पटेल पुन्हा निवडून येण्याबाबत आशावादी आहेत. युती तुटल्यास त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा यांचे तिकीट व विजय जवळपास निश्चित आहे. सेनेने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मात्र त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्याउलट कॉॅँग्रेसच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळू शकणार आहे. कुलाब्यात कॉँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांना गेल्यावेळी भाजपाच्या राज पुरोहितांनी चांगली झुंज दिली होती. मात्र या वेळी स्वतंत्र लढल्यास अ‍ॅनी शेखर यांना त्याचा थेट फायदा होईल. मनसेचे या ठिकाणी स्थान नगण्य आहे.

Web Title: Again, South Mumbai's lead again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.