पहिनेजवळील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By admin | Published: June 26, 2017 10:44 PM2017-06-26T22:44:16+5:302017-06-26T22:45:21+5:30

मविप्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यां

Two students die drowning in a nearby lake | पहिनेजवळील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

पहिनेजवळील तलावात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : त्र्यंबकेश्वर - घोटी रस्त्यावरील पहिने परिसरातील तलावात बुडून मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ कौस्तुभ प्रमोद भिंगारदिवे (२६, रा़राहुरी, जि़अहमदनगर) व संग्राम शिवाजी सिरसाठ (२३, रा़इंदिरानगर, नाशिक) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत़ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयास सुटी असल्याने सहलीसाठी ते मित्रांसमवेत आले होते़ या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

 


वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रमजान ईदनिमित्त मविप्रच्या कर्मवीर बाबूराव ठाकरे महाविद्यालयास सुटी होती़ या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी कौस्तुभ भिंगारदिवे व संग्राम सिरसाठ हे आपल्या आठ सहकाऱ्यांसह पहिने परिसरात सहलीसाठी आले होते़ पहिने परिसरात रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहोण्यासाठी उतरले़ दुपारी चार वाजेच्या सुमारास पोहोता येत नसलेले कौस्तुभ व संग्राम हे दोघे तलावात बुडाले, त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही़
या दोघांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती त्यांचे पालक व पोलिसांना दिली़ त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला़ अखेर सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले़ दरम्यान, कोस्तुभ भिंगारदिवे हा मूळचा राहुरीचा, तर संग्राम सिरसाठ हा इंदिरानगरमधील रहिवासी आहे़

--कोट--
निसर्गाचा आनंद घ्या, मात्र जरा जपून
त्र्यंबकेश्वर व परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणी तसेच शहरातील नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात़ मात्र, पाण्याच्या ठिकाणच्या खोलीचा त्यांना अंदाज नसतो वा नको ते धाडस करताना अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात़ त्यामुळे निसर्गाचा आनंद जरूर घ्या, मात्र त्याबरोबरच सावधानताही बाळगायला हवी़
- शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक, वाडीवऱ्हे


--कोट--
केटीएचएम महाविद्यालयातील हे सर्व विद्यार्थी अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते़ कौस्तुभ व संग्राम यांच्यापैकी एक जण पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच तेथे असलेल्या पर्यटकांनी वाचवा-वाचवा अशी ओरडही केली़ त्यावेळी उर्वरित दुसऱ्याने वाचविण्याचा प्रयत्न केला असता दुसराही बुडाला़ विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वजण अंघोळ करीत असूनही कोणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही़ गेल्यावर्षी याच ठिकाणी वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता़ त्यामुळे या ठिकाणची जागा धोकादायक जागा आहे, असा फलक लावायला हवा. जेणे करून पर्यटकांना याची माहिती मिळेल़
- ज्ञानेश्वर गांगुर्डे, प्रत्यक्षदर्शी, नाशिक

 

Web Title: Two students die drowning in a nearby lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.