कोट्यवधींच्या कंत्राटासाठी फेरनिविदा मागविणार

By admin | Published: July 15, 2016 03:07 AM2016-07-15T03:07:19+5:302016-07-15T03:07:19+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी फेरनिविदा मागविण्यात येणार आहे.

Will reciprocate for billions of contracts | कोट्यवधींच्या कंत्राटासाठी फेरनिविदा मागविणार

कोट्यवधींच्या कंत्राटासाठी फेरनिविदा मागविणार

Next

नागपूर विद्यापीठ : नागपुरातच कार्यालयाची अट काढणार, त्रुटी दूर करणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी फेरनिविदा मागविण्यात येणार आहे. कोट्यवधींच्या कंत्राटाशी संबंधित निविदांमधील मोठ्या त्रुटी ‘लोकमत’ने समोर आणल्या होत्या. विद्यापीठाकडे केवळ दोनच कंपन्यांनी निविदा पाठविल्या. कंपन्यांची कमी संख्या व समोर आलेल्या त्रुटी यामुळे प्रशासनाने फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली बऱ्याच अंशी ‘आॅनलाईन’ झाली आहे. ‘एमकेसीएल’ला परीक्षा प्रणालीतून दूर केल्यानंतर विद्यापीठाला सक्षम कंपनीचा शोध आहे. त्यातच यंदापासून पदवी परीक्षादेखील सत्र प्रणालीनुसार राबविण्यात येणार असल्यामुळे लवकरात लवकर परीक्षांच्या कामांचे कंत्राट देणे आवश्यक झाले आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून परीक्षेचे काम दोन किंवा त्याहून अधिक कंपनी किंवा संस्थांना देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार विद्यापीठाकडून ‘महाटेंडर्स’ या संकेतस्थळावर नोटीस जारी करण्यात आली व ८ जून ते १० जुलै या कालावधीत इच्छुक कंपन्यांकडून ‘ई’ निविदा मागविण्यात आल्या.
एरवी लहानसहान कामांच्या निविदांची विद्यापीठाकडून जाहिरात करण्यात येते. परंतु कोट्यवधींच्या कंत्राटाच्या निविदेची विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कुठेही माहिती देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे निविदा भरणाऱ्या कंपनीचे नागपुरात कार्यालय हवे, अशी अट नोटीसमध्ये टाकण्यात आली होती. अशा स्थितीत नागपूरबाहेरील कंपन्या येणारच नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. बुधवारी निविदा उघडण्यात आल्यावर केवळ दोनच कंपन्यांच्या निविदा आल्याची बाब समोर आली. त्यामुळे विद्यापीठाने फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला.(प्रतिनिधी)

Web Title: Will reciprocate for billions of contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.