पंप हाऊसची इमारत कोसळली

By admin | Published: August 23, 2014 02:59 AM2014-08-23T02:59:36+5:302014-08-23T02:59:36+5:30

रेल्वेची जीर्ण इमारत पडल्यामुळे मलब्याखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

The pump house building collapsed | पंप हाऊसची इमारत कोसळली

पंप हाऊसची इमारत कोसळली

Next

नागपूर : रेल्वेची जीर्ण इमारत पडल्यामुळे मलब्याखाली दबून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर, तिघे जखमी झाले. यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. आज दुपारी १.३० च्या सुमारास अजनी रेल्वे वसाहतीतील निक्सू चौकाजवळ ही घटना घडली. निलय श्यामराव रंगारी (वय १६, रा. सावित्रीबाई फुलेनगर अजनी) असे मृताचे तर कौस्तुभ डांगरे (वय १७) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
निक्सू चौकाजवळ अजनीत जनमंडल स्कूल आहे. त्याला लागूनच रेल्वेचे जुने मोटर पंप हाऊस आहे. येथे जमिनीत पाण्याचे मोठे टाके आहे. मोटर पंप हाऊस कार्यालयाची इंग्रजकालीन इमारत होती. ती जीर्ण झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय इतरत्र हलविण्यात आले. या पडक्या इमारतीत सभोवताल मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं वाढलेली आहेत. त्यामुळे या इमारतीचा वापर काही जण जुगार खेळण्यासाठी आणि दारू, गांजासाठी करतात. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी कधी कधी या टाक्यात पोहण्यासाठी येतात. निलय रंगारी, कौस्तूभ डांगरे, अंकुश मडावी (वय १७, रा. पार्वतीनगर), अनिकेत अनिल बहादुरे (वय १७) आणि निखिल घोटकर (वय १७, रा. चंद्रमणीनगर) हे पाच मित्र आज दुपारी १.३० च्या सुमारास पाण्याच्या टाक्यावर पोहचले. त्यातील अनिकेत इमारतीच्या बाहेरच थांबला. तर, उर्वरित चौघे आतमध्ये जाऊन एकमेकांसोबत मस्करी करू लागले. अचानक इमारत कोसळली. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी पोल आणि पाईपचा वापर करण्यात आला. त्यातील काही पोल वाकल्यामुळे त्या पोकळीत अंकुश आणि निखिल सापडले. परिणामी त्यांना जुजबी दुखापत झाली. मात्र, निलयच्या अंगावर पाईप आणि मलबा पडल्यामुळे तो पुरता दबला. तर, कौस्तुभचा हात मलब्यात फसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. बाहेर असलेल्या अनिकेतने पळत येऊन चौकातील दुकानदारांना ही माहिती दिली. त्यामुळे ते घटनास्थळी धावले. बाजूला असलेल्या शाळेचे कर्मचारीही धावले. तोपर्यंत अंकुश आणि निखिल मलब्याच्या पोकळीतून बाहेर आले होते.
घटनेची माहिती कळताच अजनीचे ठाणेदार लक्ष्मणराव डुंबरे, पीएसआय संदीप मोरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन दल आणि जेसीबीही मदतीला बोलवून घेतली. काही वेळेतच कौस्तुभ आणि निलयला मलब्यातून बाहेर काढून मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच निलयने प्राण सोडला. तो दहावीचा विद्यार्थी होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले. अंकुश आणि निखिल संताजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर, अनिकेत सिध्देश्वर ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी होय. (प्रतिनिधी)

Web Title: The pump house building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.