अखेर सरकारला आठवले ताजाबाद

By admin | Published: January 29, 2015 12:58 AM2015-01-29T00:58:07+5:302015-01-29T00:58:07+5:30

मागील अनेक वर्षांपासून शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ताजाबादचे सौंदर्यीकरण रखडले आहे. नवीन सरकार यादिशेने काही करेल असे वाटत होते, परंतु नवीन सरकारही उदासीन ठरले.

Finally, the government remembers Tajuddin | अखेर सरकारला आठवले ताजाबाद

अखेर सरकारला आठवले ताजाबाद

Next

सहा महिन्यानंतर जाग : ५५ कोटींच्या निविदेला मंजुरी
रियाज अहमद - नागपूर
मागील अनेक वर्षांपासून शासन व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ताजाबादचे सौंदर्यीकरण रखडले आहे. नवीन सरकार यादिशेने काही करेल असे वाटत होते, परंतु नवीन सरकारही उदासीन ठरले. तब्बल सहा महिन्यानंतर राज्य सरकारला ताजाबादच्या सौंदर्यीकरणाची आठवण झाली. येथील सौंदर्यीकरणाच्या कामाला गेल्या वर्षीच निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यातून होणारी कामे मात्र रखडली होती. ताजाबाद सौंदर्यीकरणाच्या संदर्भात बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत ताजाबाद सौंदर्यीकरण समितीचे नवीन अध्यक्ष व वित्त व नागरी विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ५५ कोटी रुपयांच्या विकास कार्याच्या निविदेला मंजुरी प्रदान केली. जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने या निधीच्या कामाचे टेंडर बोलावले होते. निविदेचे अर्जही आले होते. परंतु निविदा मंजूर झाली नव्हती. कारण सरकार बदलल्याने समितीच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करायची होती. विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री असलेले राजेंद्र मुळक हे ताजाबाद सौंदर्यीकरण समितीचे अध्यक्ष होते. याशिवाय समितीमध्ये मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, नासुप्र सभापती, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारीसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.
अध्यक्षाचे पद वगळता समितीचे सदस्य कायम होते. समितीच्या अध्यक्षांची निवड करायला उशीर झाल्यानेच निविदा मंजूर करायला सुद्धा उशीर झाला.
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव इकबाल वेलजी यांच्यानुसार २०१३ मध्ये २८ कोटी रुपये खर्चुन सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले.
यानंतर मागच्या सरकारने सौंदर्यीकरणासाठी ५० कोटी रुपयापेक्षा अधिक निधीची तरतूद केली होती. जुलै-आॅगस्ट २०१४ मध्ये नासुप्रने याचे टेंडर काढले होते. परंतु ताजाबाद सौंदर्यीकरण समितींमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती झाली नसल्याने टेंडर अडकून पडले होते. ताजाबाद ट्रस्टने यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली.(प्रतिनिधी)
१०-१२ दिवसात ‘वर्क आॅर्डर’
नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जलवार यांनी सांगितले की, ताजाबाद सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ताजाबाद सौंदर्यीकरण समितीचे नवीन अध्यक्ष राज्यमंत्री दीपक केसरकर होते. केसरकर यांनी गेल्या वर्षी बोलावण्यात आलेल्या ५५ कोटी रुपयांच्या टेंडरला मंजुरी प्रदान केली. पुढील १०-१२ दिवसात टेंडरचे वर्क आॅर्डर सुद्धा दिले जातील, असेही गुज्जलवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Finally, the government remembers Tajuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.