मुंबई विद्यापीठात राबविला अनाेखा उपक्रम; विद्यार्थी संघामुळे मिळाले व्हर्च्युअल क्लासरूम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:11 AM2023-12-11T10:11:05+5:302023-12-11T10:12:28+5:30

माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून व्हर्च्युअल क्लासरूमची निर्मिती.

Various activities implemented in Mumbai University | मुंबई विद्यापीठात राबविला अनाेखा उपक्रम; विद्यार्थी संघामुळे मिळाले व्हर्च्युअल क्लासरूम

मुंबई विद्यापीठात राबविला अनाेखा उपक्रम; विद्यार्थी संघामुळे मिळाले व्हर्च्युअल क्लासरूम

मुंबई : मुंबई विद्यापीठातील १०० वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पब्लिक पॉलिसी’ विभागातील माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातून व्हर्च्युअल क्लासरूमची (आभासी वर्गखोली) निर्मिती करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा या व्हर्च्यूअल क्लासरूमच्या माध्यमातून जगभरातील विद्वानांच्या व्याख्यानाचे आयोजन, परिषदा, कार्यशाळांचे ऑनलाइन- ऑफलाइन आणि हायब्रीड पद्धतीने सादरीकरण होणार आहे. 

या अनाेख्या उपक्रमाचा फायदा विभागातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना होणार आहे. नुकत्याच या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन ‘मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स माजी विद्यार्थी संघटने’च्या अध्यक्ष प्रा. रितू दिवाण आणि विभागाच्या संचालिका प्रा. मनीषा करणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अँड्रॉईड आणि विंडोज् ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असलेल्या या आभासी वर्गखोलीच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, रायटिंग बोर्डसह पर्सनल काॅम्प्युटर म्हणून याचा वापर करता येणार आहे. 

 विभागात असलेल्या सेमिनार रूमचे अद्ययावतीकरण करून या आभासी वर्गखोलीची निर्मिती करण्यात आली आहे. 
 हायब्रिड पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या या सुविधेमुळे ज्ञानार्जनाच्या कक्षा रुंदावणार असून, भौगोलिक सीमा ओलांडून शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

विभागाची ओळख :

देशाची आर्थिक विचारसरणी आणि धोरणनिर्मितीमध्ये या विभागातील विद्वानांचा मोठा वाटा आहे. प्रा. सी. एन. वकील, प्रा. एम. एल. दांतवाला, प्रा. डी. टी. लकडावाला आणि प्रा. पी. आर. ब्रम्हानंद यांनी या विभागाचाच नव्हे, तर देशातील अर्थशास्त्र अभ्यासाचा पाया रोवला. या स्वायत्त विभागातील माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर देश-विदेशात नावलौकिक कमावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युटीआय, सेबी, युनिसेफ, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, योजना आयोग आणि भारत सरकारचे विविध विभाग यासह विविध नामांकित आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या 
विभागातील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Web Title: Various activities implemented in Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.