एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका

By मनोज गडनीस | Published: April 18, 2024 08:51 AM2024-04-18T08:51:42+5:302024-04-18T08:51:54+5:30

अर्ज भरून दिला तरीही अद्याप तिकिटांचा मिळाला नाही परतावा

Air India sold 30 more tickets than the number of seats Passengers hit | एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका

एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: विमानात असलेल्या आसनांपेक्षा जास्तीच्या तब्बल ३० तिकिटांची विक्री करण्याची कमाल करत प्रवाशांना मनस्ताप देण्याची किमया एअर इंडिया कंपनीने केली आहे. ही घटना गेल्या शनिवारी मुंबईतून सायंकाळी नागपूरसाठी रवाना होणाऱ्या एआय-६२९ या विमानाच्या बाबती घडली. त्या ३० प्रवाशांना अद्याप तिकिटांचा परतावाही मिळालेला नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनीचे मुंबई ते नागपूर हे विमान सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांसाठी नागपूरसाठी प्रयाण करणार होते. नियमानुसार पाऊणतास आधी बोर्डिंग अर्थात विमानात प्रवेश दिला जातो. अलीकडे सर्वच विमान कंपन्यांना वेब-चेक इन करण्यास सांगतात व त्याद्वारे बोर्डिंग पास प्राप्त होतो. 

या बोर्डिंग पासवर आसन क्रमांकदेखील नमूद केलेला असतो. या विमानाने प्रवास करण्यासाठी जेव्हा काही प्रवासी विमानतळावर पोहोचले, त्यावेळी आमच्या विमानातील आसन संख्येपेक्षा ३० तिकिटांचे बुकिंग जास्त झाल्यामुळे आपल्याला प्रवास करता येणार नसल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले. मात्र, आमच्याकडे बोर्डिंग पास व त्यावर आसन क्रमांक नमूद असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, तिकिटांचे बुकिंग हे संगणकीकृत आहे, तर असा घोळ कसा झाला, असा प्रश्न प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांना विचारला असता, संगणकीय प्रणालीमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे चुकीने हे जास्तीचे बुकिंग झाल्याचे कारण प्रवाशांना सांगण्यात आले. 

प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्थेची मागणी केली. त्यावर उद्या  सकाळच्या (रविवार) इंडिगोच्या विमानाने १० लोकांना तर, उर्वरित प्रवाशांना सोमवारी संध्याकाळच्या विमानाने पाठवू शकतो, असे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले. दुसऱ्या विमानाने जाऊ इच्छित असाल, तर त्या तिकिटाचे पैसे आणि कंपनीच्या परताव्याच्या धोरणानुसार पैसे देऊ, असेही सांगण्यात आले. त्यानुसार काही 
प्रवाशांनी परताव्यासाठी अर्ज भरून दिला. मात्र, पाच दिवस होऊनही या प्रवाशांना तिकिटांच्या पैशांचा परतावा मिळालेला नाही.

Web Title: Air India sold 30 more tickets than the number of seats Passengers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.