‘पर्यायी वास्तवा’चं ट्रम्प युग

By admin | Published: January 28, 2017 04:32 PM2017-01-28T16:32:18+5:302017-01-28T16:55:17+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावरही ट्रम्प यांनी आपला बोलभांडपणा सोडलेला नाही. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप आणि ट्रम्प यांच्या शपथविधीची उपस्थिती याबाबत पत्रकारांनी खोट्यानाट्या बातम्या दिल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी बरीच आगपाखड केली. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी वास्तवाला ‘पर्याय’ही निर्माण केला. ‘पोस्ट ट्रुथ’ आणि ‘अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स’ यासारख्या नव्या शब्दप्रयोगांनाही त्यांनी जन्म दिला.

Trump era of 'alternative reality' | ‘पर्यायी वास्तवा’चं ट्रम्प युग

‘पर्यायी वास्तवा’चं ट्रम्प युग

Next

- प्रकाश बाळ

आत्मस्तुतीचं हे निर्लज्ज प्रदर्शन बघून मी खूप उदास तर झालोच, पण मला रागही आला, खरं तर ट्रम्प यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी’ - हे उद्गार आहेत, जॉन ब्रेनन यांचे. हे ब्रेनन शुक्रवारपर्यंत ‘सीआयए’ या अमेरिकेच्या बलाढ्य गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर ते या पदावरून पायउतार झाले. हे उद्गार काढण्यास ब्रेनन प्रवृत्त झाले, ते शपथ घेतल्यावर ‘सीआयए’च्या मुख्यालयात जाऊन ट्रम्प यांनी सर्व अधिकाऱ्यांपुढं केलेल्या भाषणांमुळं आणि याला पार्श्वभूमी होती, ती शपथविधीच्या आधी काही आठवड्यांपासून अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केल्याच्या संशय व्यक्त करणाऱ्या ‘सीआयए’च्या अहवालावरून उठलेल्या वावटळीची. असा संशय घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी ‘सीआयए’ची नात्झी जर्मनीशी तुलना केली होती. मात्र शपथविधी झाल्यावर ‘सीआयए’च्या मुख्यालयात जाऊन ‘मी पहिल्यापासून कसा या गुप्तहेर संघटनेचा पाठीराखा आहे’, याचं गुणगान ट्रम्प यांनी गायलं. त्यानंतर आपल्या शपथविधीसाठी किती कमी लोक उपस्थित होते, याच्या आकडेवारीवरून प्रसारमाध्यमं खोट्यानाट्या बातम्या देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. मग अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाबाबत प्रसारमाध्यमांनी उगाचच जास्त कोल्हेकुई केली, असंही त्यांनी सूचित केलं. वर ‘पत्रकारांना मी काडीचीही किंमत देत नाही, त्यांची तेवढी लायकीच नाही’, असंही त्यांनी सांगून टाकलं. ‘सीआयए’च्या सेवेत असताना देशहित जपताना ज्यांनी बलिदान केलं, अशांच्या स्मारकापुढे उभं राहून ट्रम्प हे सगळं बोलले.. ...आणि म्हणून जॉन बे्रनन संतप्त झाले. ट्रम्प हे बोलून गेल्यावर काही तासांच्या अवधीतच ‘व्हाइट हाउस’मधील पत्रकार कक्षात झालेल्या बैठकीत ट्रम्प यांचे प्रमुख माध्यम अधिकारी सीन स्पायसर यांनीही तोच सूर आळवला.. पण अधिक वरच्या पट्टीत. आधीच्या कोणत्याही अध्यक्षांच्या शपथविधीपेक्षा ट्रम्प यांनी शपथ घेतली, तेव्हा सर्वात जास्त लोक उपस्थित होते, असा दावा स्पायसर यांनी केला आणि ‘तुम्ही खोट्या बातम्या छापत व दाखवत आहात, हे आम्ही चालवून घेणार नाही, यापुढं आता आम्ही तुम्हाला जबाबदार धरायला सुरुवात करणार आहोत, तुम्हाला बाजूला सारून अध्यक्ष लोकांशी सरळ संवाद साधू शकतात’, असा इशारा तावातावानं देऊन ट्रम्प यांचे हे प्रमुख माध्यम अधिकारी पत्रकार कक्षातून ताडकन निघून गेले. ‘सीआयए’च्या मुख्यालयातील ट्रम्प यांचं भाषण व प्रमुख माध्यम अधिकारी सीन स्पायसर यांचा हा अवतार बघितल्यावर अमेरिकी पत्रकार अवाक् झाले. पण ते गप्प बसले नाहीत. त्यांनी ताबडतोब तपशील गोळा करून, छायाचित्रं जमवून ट्रम्प यांना खोटं पाडण्याचं काम हाती घेतलं आणि ते करूनही दाखवलं. आपली डाळ शिजत नाही, हे दिसून आल्यावर ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार केलीअ‍ॅन कॉनवे यांनी शब्दांचे आणखी खेळ करून बाजू सावरायचा प्रयत्न केला. पण त्यानं ट्रम्प यांची बाजू सावरली तर गेलीच नाही, पण काहीही करून आपले खोटे दावे जनतेच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न ट्रम्प करीत असल्याचा समज आणखी पक्का झाला. त्याचं असं झालं की, ‘एनबीसी’ या वृत्तवाहिनीच्या ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमात या वादाचा मुद्दा निघाला. तेव्हा या कार्यक्रमाचं संचालन करणारे ‘एनबीसी’चे एक संपादक चक टॉड यांनी कॉनवे यांना विचारले की, ‘व्हाइट हाउस’मध्ये पत्रकारांसमोर जाऊन इतकं खोटं बोलायला सीन स्पायसर यांना ट्रम्प यांनी का भाग पाडलं?’ त्यावर कॉनवे यांनी चेहरा अत्यंत निर्विकार ठेवत सांगून टाकलं की, ‘आमचे प्रमुख माध्यम अधिकारी सीन स्पायसर यांनी फक्त पर्यायी वास्तव (अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स) पत्रकारांसमोर मांडलं.’ या उत्तरानं आश्चर्यचकित झालेल्या टॉड यांनी कॉनवे यांना सुनावलं की, ‘वास्तवाला पर्याय नसतो, वास्तव हे वास्तवच असतं. त्याला पर्याय सांगणं हा निव्व्ळ खोटारडेपणा असतो.’ मात्र केलीअ‍ॅन कॉनवे यांनी केलेला ‘अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स’ हा शब्दप्रयोग समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाला आणि ट्रम्प यांच्या नावांना विनोद करून त्यांची खिल्ली उडवण्याचं पेवच फुटलं. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ट्रम्प जे बोलत होते, त्यामुळं ‘पोस्ट ट्रुथ’ असा एक शब्द प्रचलित झाला आणि ‘आॅक्सफर्ड’च्या शब्दकोशातही समाविष्ट करण्यात आला. ‘तपशील वा वास्तवाला फारसं महत्त्व न देता भावनात्मक आवाहन करून लोकांची मनं जिंकणं’, असा या शब्दाचा आशय ‘आॅक्सफर्ड’नं आपल्या या शब्दकोशात दिला आहे. आता ‘अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स’ हा शब्दप्रयोगही शब्दकोशात स्थान मिळवतो काय, ते बघायचं. मात्र शब्दांच्या अशा खेळांपलीकडं ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीचे काय परिणाम अमेरिकी प्रसारमाध्यमं, लोकशाही संस्था व समाजजीवनावर होतील, या मुद्द्यावर अमेरिकी विचारवंतांत गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे. सरकारतर्फे दिलेली माहिती ही अधिकृत असते, असं सर्वसाधारणत: मानलं जातं. ‘व्हाइट हाउस’मध्ये जेव्हा अध्यक्षांचे प्रमुख माध्यम अधिकारी वा त्याचे सहकारी पत्रकारांना काही माहिती देतात, तेव्हा ती सरकारची अधिकृत भूमिका मानली जात असते. आता या ‘अधिकृतते’वरच संशयाचं सावट धरलं गेलं आहे. निवडणूक प्रचारात भाग घेताना ट्रम्प यांनी अनेकदा खोटीनाटी विधानं केली होती. वारेमाप व बेलगाम आरोप केले होते. ‘ट्विटर’वरून त्यांनी पाठवलेल्या ‘पोस्ट’मुळं मोठे वाद झाले. हे सगळे ‘पोस्ट’ लिहिले होते, डॅन स्कॅव्हिनो यांनी. हे गृहस्थ पूर्वी गोल्फच्या मैदानावर खेळाडूंच्या मागं त्यांच्या ‘स्क्सि’ची बॅग उचलून नेण्याचं- गोल्फ कॅडी’चं- काम करीत असत. त्यांची ट्रम्प यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचा उत्कर्ष होत गेला. स्कॅव्हिनो यांनी ट्रम्प यांचा सहायक म्हणून काम सुरू केलं. नंतर प्रचाराच्या काळात ते ट्रम्प यांच्या वतीनं त्यांचं ‘ट्विटर’ हँडल सांभाळत होते. याच काळात त्यानं खोट्या बातम्या, व्हिडीओ पोस्ट करण्याचा सपाटा लावला होता. जर्मनीत आलेल्या सीरियातील निर्वासितांनी ‘इसिस’च्या बाजूनं निदर्शनं केली येथपासून ते ९/११च नव्हे, तर अमेरिकेत नंतर जे काही दहशतवादी हल्ले झाले, त्यापैकी अनेक सरकारनंच ‘सीआयए’ व इतर गुप्तहेर संघटनांच्या हस्ते घडवून आणले होते येथपर्यंतचे बनावट व्हिडीओ या स्कॅव्हिनो यांनी पोस्ट केले होते. अशा या स्कॅव्हिनो यांना अमेरिकी अध्यक्षांचं जे अधिकृत ‘ट्विटर’ खातं आहे, ते हाताळण्यासाठी नेमण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प प्रशासनाकडून मिळणारी माहिती ही खरी नसणार, हे लक्षात घेऊन वास्तव जनतेपुढं मांडण्याचं आव्हान आता अमेरिकी प्रसारमाध्यमांपुढं आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं संपादकीय लिहून या आव्हानाचा ऊहापोह केला आहे. आता ट्रम्प प्रशासन काय म्हणते, ट्रम्प यांचे मंत्री काय सांगतात, प्रशासकीय अधिकारी काय बोलतात यापेक्षा तथ्यं काय हे तपासून पाहण्याची आणि ते जनतेपुढं मांडण्याची गरज आहे. मात्र हे आव्हान पेलताना ट्रम्प यांच्यामागं ससेमिरा न लावण्याचं, कमकुवत तथ्य असलेलं विश्लेषणात्मक भाष्य न करण्याचं भान अमेरिकी प्रसारमाध्यमांनी पाळण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमांना ट्रम्प लक्ष्य करीत आहेत, ते त्यांची सर्व कुलंगडी बाहेर काढली जात आहेत म्हणून. मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणं ट्रम्प यांनी लक्ष्य केलं म्हणून प्रसारमाध्यमांनी भान सोडणं धोक्याचं ठरेल. ट्रम्प यांच्या चुका दाखवताना, त्यांनी केलेले घोटाळे उघड करताना, त्यांच्या कारभारावर प्रकाशझोत टाकताना, त्यांच्या अध्यक्ष होण्यामुळं समाजातील ज्या घटकांच्या मनावर भीतीचं व संशयाचं सावट धरलं गेलं आहे ते विनाकारण गडद होणार नाही, ही सीमारेषा प्रसारमाध्यमांनी आखून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ही सीमारेषा ओलांडल्यास त्याचा ट्रम्प यांनाच फायदा होणार आहे. हे भान न राखल्यास काय होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘व्हाइट हाउस’मधील अध्यक्षांच्या ‘ओव्हल आॅफिस’ या कार्यालयात असलेला मार्टिन ल्युथर किंग यांचा अर्ध पुतळा हलविण्यात आला असल्याची ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या झेक मिलर यांनी दिलेली बातमी. तथ्याची पुरेशी तपासणी न करता दिलेल्या या बातमीबद्दल मिलर यांना माफी मागावी लागली. पण ‘पत्रकार खोट्या बातम्या देतात’ हे आपलं म्हणणं खरं असल्याचा दावा करण्याची संधी ट्रम्प यांना मिळालीच. अर्थात ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेत बरीच मोठी उलथापालथ होणार आहे. ट्रम्प हे उद्योगपती आहेत. कंपन्या कशा चालवायच्या याचा अनुभव त्यांना आहे आणि अनेकदा त्यांच्या कंपन्या बुडाल्याही आहेत. कोणताही मुद्दा वा समस्या याकडं ‘फायदा काय होईल, तोटा कसा टाळता येईल’ याच दृष्टीनं बघण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळं ट्रम्प यांना कोणताही विधिनिषेध नाही. खरं-खोट्याची चाडही नाही; कारण उद्देश फक्त नफा कमावणं, हाच आहे. पण देश म्हणजे कंपनी नव्हे आणि धोरणात्मक निर्णय हे ‘फायदा व तोटा’ या निकषावर घेता येत नाहीत. व्यवहारी व वास्तववादी यात मोठा फरक आहे. ट्रम्प हे ‘व्यवहारी’ आहेत. म्हणूनच चीनला शह देण्यासाठी रशियाला जवळ करायला ते तयार आहेत. वास्तवाशी त्यांना काही देणंघेणं नाही. त्यामुळं याआधीच्या ४३ अमेरिकी अध्यक्षांच्या कारकिर्दीशी त्यांची तुलना करून चालणार नाही. अमेरिकी राजकारणात हा नवा ‘ट्रम्प प्रयोग’ आहे आणि त्याचे जे काही विपरीत परिणाम आहेत, ते आता टप्प्याटप्प्यानं त्या देशाच्या नागरिकांच्या आणि जगाच्याही पुढं येणार आहेत. या सगळ्यांतून अमेरिका सावरेल, की अमेरिकी लोकशाही संस्थांचंही अवमूल्यन होत जाईल? शेवटी अमेरिकी लोकशाही संस्था ट्रम्प यांना पुरून उरतील, अशी आशा फ्रान्सिस फुकुयामा या प्रख्यात अमेरिकी राज्यशास्त्रज्ञानं बोलून दाखवली आहे. ती खरी ठरते काय, हे आगामी काळात दिसून येणार आहे. ट्रम्प यांच्यापुढे आव्हान अधिमान्यतेचं! ट्रम्प यांच्यापुढं आज सर्वात मोठं आव्हान आहे, ते अधिमान्यतेचं (लेजिटीमसीचं). त्यांच्या शपथविधीच्या वेळी अमेरिकेच्या विविध शहरांत किमान २६ लाख लोक रस्त्यावर आले. ‘ट्रम्प आमचे अध्यक्ष नाहीत’, अशा घोषणा देत त्यांनी निदर्शनं केली. महिलांविषयी असभ्य भाषेबद्दल दुसऱ्याच दिवशी वॉशिंग्टन या राजधानीच्या शहरात महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानात ट्रम्प यांना हिलरी क्लिन्टन यांच्यापेक्षा काही लाख मतं कमी मिळाली आहेत. अमेरिकेतील विशिष्ट निवडणूक पद्धतीमुळं ‘इलेक्टोरल कॉलेज’मधील मतं जास्त पडून ट्रम्प निवडून आले आहेत. शपथविधीला किती लोक हजर होते, यावरून वाद होण्यामागं हा अधिमान्यतेचा मुद्दा आहे. लोक आपल्या मागं आहेत, हे दाखवण्याचा ट्रम्प यांचा खटाटोप आहे. प्रत्यक्षात त्यांना मोठा विरोध आहे आणि तो अमेरिकी नागरिक रस्त्यावर उतरून प्रदर्शित करीत आहेत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
prakaaaa@gmail.com

Web Title: Trump era of 'alternative reality'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.