प्रारंभ

By Admin | Published: December 31, 2016 12:59 PM2016-12-31T12:59:43+5:302016-12-31T13:10:26+5:30

मन मोकळे आणि रिकामे असेल तेव्हाच आणि तरच त्यात नवे काही येऊ/सामावू/उमलू शकेल ना? विचार आणि पूर्वग्रहांची गर्दी असलेल्या मनात प्रसन्नतेचा नवा किरण कसा आणि कुठून शिरेल?

Start | प्रारंभ

प्रारंभ

googlenewsNext
>- आनंदमार्ग
- श्री श्री रविशंकर
 
जेव्हा जीवनाला सुरुवात होते तेव्हाच शिकण्याची प्रक्रियाही सुरू होते. चालणे, बोलणे, खाणे या बरोबरच आसपासच्या जगाविषयीही तुम्ही शिकू लागता. खरे म्हणजे शिकणे हे आयुष्यभर चालूच राहते. कारण प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतच असतो. 
प्रत्येक प्राणिमात्र आनंदाच्या शोधात असतो. कोणतेही कार्य करण्याच्या मागे आनंद मिळवण्याची इच्छा असते. हा शोध स्वाभाविक आहे. जसे अग्नीचा स्वभाव वर जाण्याचा आहे तसेच पाण्याचा स्वभाव खालच्या दिशेने वाहण्याचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनाचा स्वभाव प्रसन्नता आणि आनंदाकडे जाण्याचा आहे. माणूस खूश होण्यासाठी काय काय करत नाही! पण वाईट हे आहे की आनंदाच्या शोधात माणूस लोभ, मोह, तणाव या सर्वांच्या गुंत्यात अडकतो. 
लहानपणी मन वर्तमानात राहते, मनात ताजेपणा, नावीन्य असते. मुले उत्साहाने भरलेली असतात. त्यांच्यासाठी जीवन अगदी सरल असते. मोठे होता होता जसजसे जगाबद्दल जास्त कळू लागते तसा तणावही वाढू लागतो. जीवन गुंतागुंतीचे होऊ लागते, उत्साह लुप्त होऊ लागतो. वय वाढत जाते तसतसे मन भूतकाळ आणि भविष्यकाळ यात दोलायमान होत राहते आणि त्यामुळे नवेपण हरवले जाते. 
या चक्रव्यूहातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे आपल्या मनाला समजून घेणे. बाहेरच्या जगाविषयी जाणणे म्हणजे विज्ञान आणि आतील जगताला जाणणे म्हणजे अध्यात्म आहे. आपल्याला बाहेरच्या जगाविषयी तर माहिती होऊन जाते, पण आपल्या मनाला कसे नियंत्रित करायचे, क्रोध आणि द्वेष यासारख्या नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे याविषयीचे ज्ञान आपल्याला ना शाळेत दिले जाते, ना घरी. आपली विचार करायची पद्धत, आपली सारी कार्ये आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून आहेत. 
जर मन प्रसन्न असेल, उत्साहाने भरलेले असेल तर कठीणातील कठीण समस्येवर मार्गही लगेच सापडतो. पण जर मन उदास आणि निराश असेल तर उत्तमातील उत्तम गोष्टीतही रस वाटत नाही आणि समस्या आणखीनच मोठ्या वाटू लागतात. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काही जाणणे नव्हे तर ती एक अवस्था आहे; ज्यात जीवनातील कठीण प्रसंगातही तुमचा उत्साह टिकून राहणे, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या चेहऱ्यावरचे स्मित नाहिसे न होणे महत्त्वाचे असते!
जसे गाडी चालवायला शिकण्यासाठी कुणीतरी शिकवणारा हवा, पोहोणे शिकण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असते त्याचप्रमाणे मनाला समजावण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. अध्यात्माच्या मार्गाला प्रकाशित करण्याचे काम गुरू करतात. गुरू माहिती देत नाहीत तर तुमच्या चेतनेत परिवर्तन घडवतात. 
भारत ही जगातील सर्वांत जुनी संस्कृती आहे. जगातील आणखी काही देशांतही प्राचीन संस्कृती होती, पण ती काळाबरोबर लुप्त झाली. गेल्या शेकडो वर्षांपासून एकानंतर एक आक्रमणे आणि आतंकी हल्ले होऊनही आपली संस्कृती अबाधित आहे याचे काय कारण आहे? भारताची शक्ती आहे अध्यात्म, ज्याची धारा सतत आपल्या देशाचे पोषण करत आहे. आपल्या ऋषीमुनींनी ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने सांगितले की ते समाजातील सर्वांच्या जीवनशैलीचा भाग बनून गेले. हे जीवनाच्या प्रत्येक पैलूला, प्रत्येक परिस्थितीला उज्ज्वल बनवते. भगवान कृष्णाने तर रणांगणाच्या मधोमध ज्ञानोपदेश केला आणि अर्जुनाला योग्य दिशा दाखवली. जीवनात पूर्णता आणणे हा ज्ञानाचा उद्देश आहे. आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती, मग ती कडू असो वा गोड, प्रत्येक परिस्थिती, मग ती अनुकूल असो वा प्रतिकूल, आपल्याला या पूर्तीकडेच घेऊन जाते. वेगवेगळ्या घटना आपल्या मनावर काही ना काही छाप उमटवून जातात, प्रभावित करून जातात. तुम्हाला लोभ, घृणा, द्वेष आणि अशा सर्व दोषांपासून मुक्त व्हायचे असते. जर मन नकारात्मक भावनांनी भरून गेले तर ते प्रसन्न, शांत राहू शकत नाही आणि नावीन्याचा अनुभव घेऊ शकत नाही. 
या सर्व अडचणींतून जात असताना आपला उत्साह कसा टिकवायचा हीच जीवन जगण्याची कला आहे. आपल्या प्रत्येकात प्रेमाचे कारंजे आहे. पण फक्त ते तणावाने झाकले गेल्यामुळे व्यक्त होऊ शकत नाही. सर्वांच्या मनात शांतीचा स्रोत आहे, पण त्याला शोधायचे कसे ते आपल्याला माहीत नाही. त्याला शोधणे कठीण नाही, फक्त थोडेसे मार्गदर्शन हवे. 
आपल्या सर्व ग्रंथांची सुरुवात प्रश्नाने होते. आपल्या सर्वांचे जीवन एखाद्या ग्रंथासारखे आहे आणि वेळोवेळी आपल्या मनात प्रश्न तयार होत असतात. एका प्रकारचे प्रश्न विषण्णता आणि निराशेतून तयार होतात. 
जर कुणी दु:खी असेल तर बहुतेक त्यांचा प्रश्न असतो की, ‘असे माझ्या बाबतीतच का घडले?’ जी व्यक्ती प्रश्नातूनच आपले दु:ख व्यक्त करते तिला त्याचे उत्तर मिळवण्यात इतका रस नसतो. उत्तरापेक्षा त्या व्यक्तीला हवी असते, ती सहानुभूती! दुसऱ्या प्रकारचा प्रश्न जिज्ञासेतून निर्माण होतो. जीवनाविषयी, स्वत:विषयी आणखी जाणून घेण्याच्या इच्छेतून निर्माण होतो. मुले जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याकडे पाहा. त्या प्रश्नातच उत्तराची उत्सुकता असते. श्रद्धा असते, विश्वासही असतो, की हे उत्तर माझ्यासाठी लाभदायी असेल. 
- अशाप्रकारे उत्तराच्या जिज्ञासेने विचारलेले प्रश्न आपला विकास करतात. 
जीवनात नवेपण हवे असेल तर मनात रुजलेल्या जुन्या गोष्टींना सोडून द्यायला हवे. जेव्हा मन मोकळे आणि रिकामे असेल तेव्हाच ते ज्ञानाचे पात्र बनू शकेल. जेव्हा मनात विचार आणि पूर्वग्रह असतील तेव्हा त्यात ज्ञानाचा प्रवेश होऊ शकत नाही. घटनांमधून काहीतरी शिकून आपल्याला पुढे जायला हवे आहे. घटनांना मनात थारा द्यायचा नाही. जुने वर्ष संपले आहे. आता त्या वर्षातील सर्व घटना भूतकाळाला समर्पित करा आणि त्यांच्यापासून मुक्त व्हा. विश्वासाने पुढे जा...
या नव्या वर्षात मी आपल्यासोबत हा संवाद चालू ठेवणार आहे. तुम्हा सर्वांना नववर्षाची प्रेमपूर्ण शुभकामना!! नवीन वर्ष तुम्हाला आनंद आणि संतोष मिळवून देवो...
 
गुरुजींशी संवाद-संधी
बदलते जग नवे पर्याय देणारे, नवी उत्तरे शोधणारे, अकल्पित अशा शक्यता वास्तवात उतरवण्याची शक्ती धारण करणारे आहे; तसेच ते मनाला कुरतडणाऱ्या नवनव्या प्रश्नांचेही जंगल बनते आहे. 
असे अंधारे, अगम्य, गूढ अरण्य; की बाहेर पडण्याची वाट दिसू नये, काही फटच सापडू नये. 
गर्दीतला एकटेपणा, तुटल्या नात्यांचे व्रण, धावत्या पायांना पडलेला वेगाचा फास, न शमणारा मनातला कोलाहल असे कित्येक डंख प्रत्येकालाच डाचत असतात. अशा संभ्रमित प्रश्नांना उत्तरांची दिशा सुचवणारे हे नवे सदर! 
आर्ट आॅफ लिव्हिंग या जगन्मान्य विचार-आचार प्रणालीचे गुरू श्री श्री रविशंकर या सदरातून वाचकांच्या प्रश्नांच्या आधाराने त्यांचे चिंतन मांडतील. 
प्रश्न अति-व्यक्तिगत स्वरूपाचे नसावेत. व्यक्तिगत अडी-अडचणींपेक्षा आधुनिक जगण्यातले पेच मांडणाऱ्या निवडक प्रश्नांना गुरुजींनी दिलेली उत्तरे या सदरातून प्रसिद्ध होतील. 
प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता :
srisri.lokmat@gmail.com

Web Title: Start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.