शोध नव्या दुनियेचा

By admin | Published: November 8, 2014 05:42 PM2014-11-08T17:42:34+5:302014-11-08T17:42:34+5:30

खरा निसर्ग भेटतो, मनाला भिडतो तो गावातच. तिथला प्रत्येक गंध अस्सल.. मनाचा गाभारा संपूर्णपणे उजळून टाकणारा. सूर्योदयाचा सोहळा जसा अपूर्व असतो, तशीच निसर्गाची प्रत्येक हालचाल एक नवी आशा जागवत असते. अशा निसर्गजीवनाशी एकरूप झालेल्या जीवनाची ही कहाणी..

Search the new world | शोध नव्या दुनियेचा

शोध नव्या दुनियेचा

Next

- भैरवनाथ डवरी

 
परसबागेतील वृक्षसंपदेमध्ये सर्वांगावर पांढर्‍याशुभ्र भरगच्च फुलांची चादर पांघरलेला ऐन तारुण्यातला शेवगा. आकाशाशी पैज करणारे उंचच उंच ताड-माडांचे वृक्ष. महादेवाच्या भाळावरील अर्धचंद्राकृती गंधाच्या आकारांचे चिंचेचे बुटूक लगडलेली झाडं. बागेतील सार्‍या वृक्षसंपदेवर छत्र धारलेला हिरव्याकंच पर्णसंभारातील जुनाट आम्रवृक्ष. आरक्त फुलांचे किरीट माथ्यावर घालून, नभांगणात लालभडक पताका फडकविणारे पळस. चेंडूसारखी गोलाकार लागलेली बेलफळांची झाडं. अंगावर काटेरी कातडी पांघरलेली लंबगोलाकृती गाठोडी तोलणारी फणसाची झाडं. त्यातून दरवळणार्‍या घमघमाटानं मनाचा गाभारा अक्षरश: दरवळून जातो आणि आपसूकच ओठांवर ओळी येतात..
रसाळ सोने ते मधाचा ठेवा, 
फणसदादाला विचारा सेवा
सीताफळ, रामफळ, जांभूळ यासारखी रानमेवा देणारी झाडं. तर गुलमोहर, काटेसावर इत्यादी लक्षवेधी फूलझाडांची निसर्गदत्त देणगी लाभलेली आमची परसबाग. या सार्‍या वृक्षराजीला रातराणी, जाई-जुई, मोगरा, शेवंती वेली आलिंगन देऊन कडेखांद्यावरील पुष्पवैभवाला जोजवत असत. दोन्ही बाजूंना दोन पारिजातकांचे गोलाकृती वृक्ष. पांढरीशुभ्र अंगकांती आणि केशरी दांडे असलेले पारिजातकाचे हे गोजिरवाणे पुष्पवैभव. अगदी पहाटेच सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी पारिजातक पुष्पवैभवाच्या पायघड्या घालीत. किती विलोभनीय स्वागत सोहळा हा! हळूहळू तांबडं फुटू लागतं. पूर्वक्षितिजावर हा विलोभनीय असा सूर्योदयाचा अपूर्व सोहळा सुरू होतो. डोंगरटेकड्यांच्या माथ्यावर पूर्व दिशेला लालीचे धुमारे फुटू लागतात. सप्तरंगांच्या उधळणीनं सारं पूर्वक्षितिज तेजाळतं. निसर्गानं उगवत्या गोलाच्या स्वागताची तयारी सुरू केलेली असते. बघता-बघता त्याचं विलोभनीय रूपडंही बदलतं आणि चंदेरी रूप धारण करून त्याची सोनेरी पावलं जमिनीवर अवतरतात. ही हसरी कोवळी उन्हं पाहिल्यावर
याहो सूर्यनारायणा याहो या लवकर,
 सोनियाच्या पावलांनी भूषवा हे घर
अशी प्रार्थना सूर्यनारायणाला केल्यावाचून राहवत नाही. घरट्यातल्या नवजात पिलांचं भरणपोषण करायचं, त्यांच्या हिरव्या ओल्या पंखात बळ द्यायचं यासाठी खाऊ शोधण्याच्या निमित्तानं पाखरांचे थवे आकाश कवेत घ्यायला सुरुवात करतात. मोर-लांडोरांचा केकारव. कावळ्यांची कावकाव, चिमण्यांचा चिवचिवाट, घुबडांचा घूत्कार, भारद्वाजाच्या पखवाजाची साथ, गानकोकिळेच्या कुहूकुहूच्या सप्तसुरांनी गगनाचा गाभारा भरून उरतो. हे सारं साग्रसंगीत ऐकल्यावर ही परसबाग की पक्षी-अभयारण्य, असा प्रश्न मनात येतो. बागेच्या उत्तरेकडून दक्षिणोत्तर बारमाही वाहणारा नितळ पाण्याचा ओढा. त्यात प्रवाहाबरोबर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं गिरक्या घेत मागे-पुढे जाणार्‍या मासोळ्या. बारमाही पाण्यामुळे किनार्‍यावर भरगच्च हिरवाई. विविध रंगरूपांतील फुलेसुद्धा. या फुलांभोवती दिवस-दिवसभर पिंगा घालणारी फूलपाखरं आणि मधचाख्यांचे थवेच्या थवे आकृष्ट होत. त्यात किडे, मुंग्या, सरपटणारे कीटक यांची रेलचेल. मासोळ्या टिपण्यासाठी झाडांवर बसलेले खंडे पक्षी. साधुसंतांसारखे डोळे मिटल्याचे सोंग घेऊन ध्यानस्थ बसलेले पांढरेशुभ्र बगळेदेखील. 
वसंत ऋतू आता प्रौढ झालेला. आमराईतील कैर्‍यांनी लंबक रूप धारण केलेलं. चिंचांचे बुटूक कानातील रींगांप्रमाणे डुलत, खोडकर वार्‍याच्या तालावर ताडमाड आमराईवर चवर्‍या ढाळीत. अशा वसंताच्या प्रौढत्वाच्या काळात कोंबड्यांच्या कळपातील काळाकभिन्न रंग, अणकुचीदार पिवळसर चोच. चोचीच्या दोन्ही बाजूंना काजळ कोरल्यासारख्या भुवया. त्यांमध्ये लुकलुकणारे पाणीदार डोळे. डोक्यावर लालभडक तुरा असलेली अत्यंत देखणी कोंबडी एके दिवशी अचानक कळपातून गायब होते. कोंबडीची शोधाशोध सुरू होते; पण व्यर्थ. अख्ख्या अवनीवर अंधाराचं साम्राज्य पसरायला सुरुवात होते. हा हा म्हणता अंधार अवनीला कवेत घेतो. आम्ही सारे जण निराश होतो. निराशाजनक चेहर्‍यानं घरी येतो. मातुश्रींचा मात्र कोंबडीवर प्रचंड विश्‍वास. ‘अरं लेकरांनू, कोंबडी ह्यो तसा लाजराबुजरा पराणी कुटंतरी दडलं असंल झाडाबिडात! ईल उद्याबिद्या घराकडं.’ आम्हाला धीर देणारं त्यांचं आश्‍वासक बोलणं. आम्ही पोरं कशीबशी रात्र गुजरतो. आशाळभूत नजरेनं दुसर्‍या दिवशी पुन्हा आमराईत शोधाशोध सुरू करतो. दिवस डोक्यावर येईपर्यंत कोंबडीचा थांगपत्ता लागत नाही. आणि काय आश्‍चर्य? अनपेक्षितपणे एके दिवशी ऐन दुपारच्या वेळी एकाएकी कॉक कॉक करीत एका जुनाट उंचच्या उंच आंब्याच्या शेंड्यावरून कोंबडी उंचच उंच भरारी घेऊन परत आमराईत मटमाया होते. आमच्या आशा पल्लवित होतात. आईनं सांगितल्याप्रमाणं येईल आज ना उद्या घरात, असं समजून आम्ही घरी परततो. कोंबडीनं मात्र सतत एक महिनाभर तिचा दिनक्रम न चुकता सुरू ठेवलेला.
एके दिवशी सायंकाळी सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात. नवजात पिलांच्या ओल्या पिवळ्या पंखांत बळ देण्याच्या निमित्तानं खाऊ आणण्यासाठी गेलेली नि गगनाच्या गभार्‍यात गिरक्या घेणारी सोनेरी, मखमली, रुपेरी पंखांची पाखरं आपापल्या पिलांच्या ओढीनं घरट्यांकडे परतू लागतात. सूर्याचा लालभडक गोळा क्षितिजापलीकडे जाऊ लागतो. काळ्याकभिन्न रंगातील ढगांच्या कडा चंदेरी होतात. ढगाआडून डोकावणारा सूर्याचा लालभडक तेजोगोल. आहा किती विलोभनीय ही सायंकाळची शोभा! 
‘झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती,
हिरे माणके पाचू फुटूनी पंखची गरगरती,
पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा 
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा.
अशा रमणीय सायंकाळच्या वेळी बलदंड बाहू, लांबरुंद छाती, पोलादी नि धिप्पाड देहयष्टीनं कोल्हापूरच्या तालमीतील पैलवान जसे महाद्वाराच्या रस्त्यावरून छाती काढून ऐटबाजपणे डुलत डुलत चालतात, अगदी तशीच आमची देखणी कोंबडी डुलत डुलत अंगणात प्रवेश करते. येताना ती एकटी नसते, तर जुनाट आंब्याच्या ढोलीत, तीन आठवडे अंडी उबवून, त्यातून बाहेर आलेल्या तब्बत दोन डझन पिलांचा गोतावळा घेऊन येते. पिलं तर इतकी सुरेख, जणू फिकट पिवळ्या रंगाचे पिंजून ठेवलेल्या कापसाचे पुंजकेच! इवले इवले लुकलुकणारे डोळे. फिकट गुलाबी रंगांच्या चोची. फिकट पिवळ्या रंगाचे चिमुकले पाय. बघितल्या बघितल्या हातात उचलून घेण्याचा मोह आवरत नाही इतकी गोजिरवाणी पिलं!
नववधू ज्याप्रमाणे गृहप्रवेशासाठी उंबर्‍याजवळ येऊन थांबते, अगदी तशीच! कोंबडी कुटुंबकबिल्यासह अंगणात थांबते. आमची मातुश्री बिचारी भावनाप्रधान आणि हळवी. ती कोंबडीसह पिलांचं अक्षरश: औक्षण करते आणि काय? कोंबडीपाठोपाठ गोतावळाही गृहप्रवेश करतो. 
तिनं केलेला गृहप्रवेश पाहिल्यावर मातुश्रींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात. डोळ्यांत साठलेल्या आनंदाश्रूंना आवरताही येत नाही. भरल्या अंत:करणानं त्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देतात. आनंदाश्रूंच्या शिडकाव्यानं सारं अंगण चिंब चिंब भिजत्ां. कारण, मातुश्रींचं भविष्यकालीन अर्थकारण पुढे सुलभ होणार असतं. कोंबडीचा पुनप्र्रवेश तिनं आपल्या पिलांना, नव्या दुनियेचा शोध लावून दिल्याबद्दल आम्हा सार्‍या कुटुंबीयांचा आनंद शतगुणित तर होतोच; शिवाय प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अक्षरश: कोजागरीचं टिप्पूर चांदणं उतरतं. 
(लेखक साहित्यिक आहेत.)

Web Title: Search the new world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.