आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

By admin | Published: July 5, 2015 03:00 AM2015-07-05T03:00:47+5:302015-07-05T03:00:47+5:30

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि

You want the earth to swell! | आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

Next

- डॉ. राजेंद्र सिंह
(लेखक मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)
शब्दांकन - सचिन लुंगसे

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि त्यानंतर मध्य भारतात पावसाचा खंड पडणे, याच घटना होत असताना पहाडांवर अतिवृष्टी होऊन पूर येणे, अशा गोष्टी सलग घडत आहेत. याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला असेल आणि होतही असेल. परंतु याची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नेमके आपण तेच तपासत नाही आणि येथेच गल्लत होते.
मान्सून दाखल होण्यास झालेला विलंब, पाकिस्तानातील उष्णतेची लाट, मान्सूनने देश व्यापल्यानंतर पडलेला खंड, पहाडांवर होणारी अतिवृष्टी आणि ‘एल निनो’चा प्रभाव, या सगळ्या घटनांशी जागतिक तापमान वाढीचा संबंध नाही, असे कोणीही कितीही ओरडून सांगत असले तरी जागतिक तापमानवाढीमुळेच वातावरणात हे बदल होत आहेत, हे मी ठामपणे सांगू इच्छित आहे.
आपण यापूर्वीही जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. मान्सूनचा एक पॅटर्न असतो. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर बदल अपेक्षित असतात, असे सांगण्यात येत असले तरी त्यामागची पार्श्वभूमी कोणीही समजावून घेत नाही. ऋतुचक्र बदलले आहे, बदलते आहे, हे आपण समजावून घेत नाही. आपण निसर्गाशी खेळतो आहोत. पाकमध्ये आलेली उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सुमारे ५०० जणांचा बळी गेला होता. बळींमध्ये दक्षिण भारतातील नागरिकांचे प्रमाण अधिक होते. आता पाकिस्तानात आलेल्या हजारएक बळी गेले.
जागतिक तापमानवाढ ही समस्या काही आज निर्माण झालेली नाही. आपण आपल्या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा गळा घोटला आहे, प्रदूषण वाढवले आहे, हिरवळ नष्ट केली आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपणाला परत करीत असतो. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच परिणाम आहे. जमिनीवरील झाडे नष्ट होतात. जमीन वाळवंटासारखी होते. जमिनीतील पाणी कमी होते. तेव्हा आपण त्यावर उपाय करण्याऐवजी समस्या आणखी वाढवत जातो. मध्य भारत असो किंवा आणखी काही. विदर्भ आणि मराठवाड्यात नेमके हेच झाले आहे. म्हणून तिथे पाऊस कमी आणि उष्णता वाढली आहे.
जागतिक स्तरावरही सर्वच देशांना तापमानवाढीची झळ बसते आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रांनाही जागतिक तापमान वाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे आजारी पडलेल्या वसुंधरेला बरे करण्याची गरज आहे. पृथ्वीवरची नष्ट झालेली हिरवळ वाढविण्याची गरज आहे. आपण आपली जीवनशैली (लाइफ स्टाइल) बदलण्याची गरज आहे. असे झाले तर आपण निसर्गाशी एकरूप होऊ. जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ तेव्हा कुठे निसर्ग आपणाला तारेल.

 

Web Title: You want the earth to swell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.