आईच्या संस्कारामुळे ५० वर्षांच्या जीवनात यशस्वी

By Admin | Published: April 24, 2017 12:00 AM2017-04-24T00:00:29+5:302017-04-24T00:00:29+5:30

५० वर्षांच्या सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालो असल्याचे भावोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

Successful in 50 years of life due to mother's esteem | आईच्या संस्कारामुळे ५० वर्षांच्या जीवनात यशस्वी

आईच्या संस्कारामुळे ५० वर्षांच्या जीवनात यशस्वी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - बाळंतीण झाल्यानंतर चौथ्या दिवशीच शरद नावाच्या बाळाला सोबत घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या बैठकीला हजेरी लावणा-या आईने बालपणी केलेल्या संस्कारामुळेच ५० वर्षांच्या सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालो असल्याचे भावोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगती या पुस्तकाला आणि नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीवर लक्षणीय कार्य केल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांना रविवारी मसापच्या नाट्यगृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विचारमंचावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कवी ना. धों. महानोर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. दिलीप घारे, किरण सगर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मराठी भाषा, रंगभूमीवर भाष्य केले. मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी आहे. मुंबईतील मराठी भाषेत सर्व देशातील भाषांचे मिश्रण पाहायला मिळते. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भ, मराठवाड्यातील मराठी भाषेचे विभागानुसार वेगळेपण आढळते.

या सर्वांमध्ये मराठवाड्यातील संतांची भूमी वेगळीच आहे. या भूमीत पे्रमाचा ओलावा जाणवतो. याची प्रचीती अनेक वेळा आलेली आहे. यामुळे मसापने दिलेल्या पुरस्काराचे मोल असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी काही लिहावे असे वाटत आहे. परंतु सार्वजनिक जीवनातून वेळ मिळेल की नाही हे सांगता येत नसल्याचे पवार म्हणाले. राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात १४ निवडणुका लढविल्या. सर्वांमध्ये यश मिळाले. यात प्रेम करणाऱ्या लोकांचे मोठे योगदान आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आईने लहानपणी केलेल्या संस्कारामुळे हा सर्व पल्ला गाठता आला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर रसाळ यांनी शरद पवार यांनी लिहिलेले आत्मचरित्र हा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी निवड समितीची भूमिका मांडली. डॉ. मनोहर जाधव यांनी लोक माझे सांगती या पुस्तकावर भाष्य केले. डॉ. दिलीप घारे यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या रंगभूमीविषयक कार्याचा आढावा घेतला. मराठी रंगभूमी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये पटेल यांचा असलेला वाटा त्यांनी विषद केला. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले. किरण सगर यांनी आभार मानले. राजेश सरकटे यांच्या स्वागत गितांने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजकीय, सामाजिक, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थित होती.

अन् मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला
यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना गेवराईहून पैठणमार्गे औरंगाबादला येत होते. तेव्हा पैठणजवळ एका वृध्द महिलेने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला हात केला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी गाडी थांबविण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र त्या वृध्द महिलेकडे चव्हाण गेले तेव्हा तिने त्यांच्या हातात एक चांदीचे नाणे टेकवले. कारण काय तर तू राज्यासाठी चांगले काम करतोस. याचे बक्षीस म्हणून. असा प्रेमाने ओतप्रोत भरलेला मराठवाडा असल्याचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

ठाले पाटलांना टोला
प्रास्ताविकात ठाले पाटील यांनी सर्वांना नियोजित वेळ दिला असल्याचा उल्लेख केला. हाच धागा पकडत शरद पवार यांनी माझ्या भाषणाला नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ गेला तरी हरकत नसावी, असे सांगितले. कारण ठाले पाटलांनी वेळेचा उल्लेख करुन अधिक वेळ घेतला. यामुळे मलाहही हाच नियम लागू असल्याचे सांगताच सभागृहात खसखस पिकली.

विमान उडाले विदेशी
डॉ. जब्बार पटेल यांचे घाशीराम कोतवाल या नाटकाचे विदेशात प्रयोग होऊ देणार नसल्याची घोषणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. घाशीराम कोतवाल नाटकातील कलावंतांचा विदेशी जाणारा ताफा खंडाळा घाटातच अडविण्याची योजना शिवसैनिकांनी आखली. तेव्हा किर्लोसकर यांचे विमान घेऊन सर्व कलाकारांना थेट पुण्यातून मुंबई विमानतळावर आणत विदेशात जाणाऱ्या विमानात बसवले. तरीही शिवसैनिकांना याचा थांगपत्ता नव्हता. ते खंडाळा घाटातच जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देत बसले हा किस्साही शरद पवार यांनी सांगितला.

पुन्हा रंगभूमीवर पदार्पण करतोय : जब्बार पटेल
नाटके, चित्रपट केल्यानंतर अनेक वर्षांपासून जब्बार पटेल काय करतो, असा अनेकांना प्रश्न पडलेला असेल. मात्र लवकरच रंगभूमीवर जूने आणि नवीन नाटके घेऊन युवावर्गाला इतिहास माहिती होण्यासाठी पदार्पण करत असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. याला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षाही पटेल यांनी व्यक्त केली.

Web Title: Successful in 50 years of life due to mother's esteem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.