"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:08 PM2024-04-24T16:08:55+5:302024-04-24T16:09:47+5:30

"मोदींनी १० वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि आमच्याकडे हिशेब मागतात."

Sharad Pawar criticize Pm Modi led BJP Government and slams him over dictatorship | "पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

"पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला"; शरद पवारांची सणसणीत टीका

Sharad Pawar vs PM Modi, Lok Sabha Election 2024 at Madha: २०१४ मध्ये मोदींनी सांगितले होते की आम्ही बेरोजगारी संपवू. पण बेरोजगारीचे सर्वेक्षण करणाऱ्या जागतिक दर्जाची संस्था इंटरनॅशनल लेबर ऑर्गोनायझेशनने सर्वेक्षण आले. त्यात भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे सांगितले आहे. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि हिशेब आम्हाला मागतात. मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदींनी गेल्या दहा वर्षांत फक्त महात्मा गांधी, पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंवर टीका केली. जे लोक हयात नाही, त्यांच्यावर ते टीका करतात. मात्र त्यांनी दहा वर्षात काय केले या संदर्भात काहीही बोलत नाहीत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार शरद पवार यांनी मोदी आणि भाजपा सरकारवर टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

"पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांनी गेल्या दहा वर्षांत काय केले? पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात नोटाबंदी केली. त्यामुळे सामान्य लोकांना कित्येक दिवस रांगेत उभे राहावे लागले. देशभरात ७०० लोकांचा बँकांच्या रांगेत उभे राहून मृत्यू झाला. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यावर मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत. पन्नास दिवसाच्या आत आपण पेट्रोलची किंमत कमी आणू, अस मोदी यांनी सांगितलं होतं. मोदींच्या आश्वासनाला ३ हजार दिवस उलटून गेले. तरी ७१ रुपये पेट्रोलची किंमत १०६ रुपये झाली. गॅस सिलिंडर ही महागला. आज देशात १०० पैकी ८७ तरुण बेरोजगार आहेत. मोदी हे आम्हाला, उद्धव ठाकरे यांना शिव्या देतात. शिव्या द्या, पण तुम्ही १० वर्षात केलं काय? फक्त नोटाबंदी केली," असेही शरद पवार म्हणाले.

भर भाषणात मोबाईलवर लावलं मोदींचं जुनं भाषण

भाषणादरम्यान शरद पवारांनी आपल्या मोबाईलमधून मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचं जुनं भाषण ऐकवलं. त्यांनी भरसभेत नरेंद्र मोदी यांचे २०१४ सालचं भाषण ऐकवलं. मोदी यांचं भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण जेवल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था असल्याची टीका त्यांनी केली.

मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने...

"मोदींची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जाते. ज्यांनी देशासाठी योगदान दिलं त्यांच्यावर टिका केली जात आहे. जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळ्यांवर टीका केली जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आपलं आयुष्य तुरुंगात घालवलं. देशासाठी काम केलं, हे आपण विसरू शकत नाही. मात्र, त्यांच्यावर मोदी टीका करतात. इंदिरा गांधी , मनमोहन सिंह अशा सर्वच प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला. पण मोदी यांनी देशाचा विचार केला नाही. हा देश हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सर्वांचाच आहे," असे पवारांनी ठणकावले.

"दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून केजरीवालांना तुरुंगात टाकले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर तिथेही त्यांना तुरुंगात टाकले आहे. इंग्रजांसारखे काम सध्या केंद्रातील सरकार करत आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे," असा त्यांनी पुनरुच्चार केला.

Web Title: Sharad Pawar criticize Pm Modi led BJP Government and slams him over dictatorship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.