मुंबईत पुन्हा ‘रेन ब्लॉक’

By admin | Published: June 28, 2016 04:35 AM2016-06-28T04:35:37+5:302016-06-28T04:35:37+5:30

शहरात मुसळधार पावसाचा मारा सोमवारीही सुरूच राहिला.

'Rain block' in Mumbai again | मुंबईत पुन्हा ‘रेन ब्लॉक’

मुंबईत पुन्हा ‘रेन ब्लॉक’

Next


मुंबई : शहरात मुसळधार पावसाचा मारा सोमवारीही सुरूच राहिला. परिणामी, मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ‘रेन ब्लॉक’ झाला. पाणी साचून ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. उपनगरात दिवसभर पावसाची संततधार होती. त्यामुळे पूर्व उपनगरांत लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी जोड रस्ता आणि पश्चिम उपनगरात एस. व्ही. रोडवर वाहतुकीचा खोळंबा झाला आणि मुंबईकरांची दैना उडाली. रेल्वेने मात्र वेळापत्रक पाळल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
सोमवारी सकाळी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत दाखल झालेला पाऊस सायंकाळीही कायम होता. मुंबई शहरात मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, महालक्ष्मी, वरळी, दादर आणि प्रभादेवी येथे विश्रांती घेत बरसणाऱ्या पावसामुळे वाहतूककोंडी झाली होती. विशेषत: दक्षिण मुंबईत मोहम्मद अली रोडवर पावसामुळे झालेल्या कोंडीने येथील वाहतूक विस्कळीत झाली. करीरोड आणि चिंचपोकळी या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या ना.म. जोशी मार्गावरही वाहतूककोंडी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सायन रुग्णालय येथे पाणी साचल्याने माटुंगा आणि शीव येथे कोंडी झाली.
पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा, शीतल सिग्नल, कमानी नाका, घाटकोपरमधील श्रेयस सिनेमा आणि भांडुप स्टेशन रोडवर कोंडी झाली. दुपारी पूर्व उपनगरात सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता आणि वांद्रे, कलिनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर झालेली वाहतूककोंडी सुटण्यास पाऊण तासाहून अधिक काळ लागला. बैलबाजार, साकीनाका, मरोळ आणि घाटकोपर येथील असल्फा या ठिकाणी दुपारी वाहतूककोंडी झाली. पश्चिम उपनगरात एस. व्ही. रोडसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे आणि अंधेरी येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. (प्रतिनिधी)
> २७ ठिकाणी पाणी तुंबले : शहरात १०, पूर्व उपनगरांत ७ आणि पश्चिम उपनगरांत १० अशा एकूण २७ ठिकाणी पाणी तुंबले. येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका मुख्यालयातून संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
११ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या : शहरात ४, पश्चिम उपनगरात ४ आणि पूर्व उपनगरात ३ अशा एकूण ११ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत महापालिकेकडून संबंधित विभागांना सूचना देत मदतही पुरवण्यात आली.
१७ ठिकाणी शॉर्टसर्किट : शहरात १०, पूर्व उपनगरांत २ आणि पश्चिम उपनगरांत ५ अशा एकूण १७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. कोणीही जखमी झाले नाही.
२२ ठिकाणी झाडे पडली : शहरात ९, पूर्व उपनगरांत ६ आणि पश्चिम उपनगरांत ७ अशा एकूण २२ ठिकाणी झाडे पडली. पडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले.

Web Title: 'Rain block' in Mumbai again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.