विक्रेत्यांमार्फत परमिटचे रॅकेट

By admin | Published: May 30, 2016 03:45 AM2016-05-30T03:45:02+5:302016-05-30T03:45:02+5:30

रिक्षा विक्रीच्या नावाखाली डिलरकडून परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Permit racket by vendors | विक्रेत्यांमार्फत परमिटचे रॅकेट

विक्रेत्यांमार्फत परमिटचे रॅकेट

Next

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- रिक्षा विक्रीच्या नावाखाली डिलरकडून परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईसह नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील रिक्षाचालकांना परमिट मिळवून देण्याचे आमिष देवून त्यांची नोंदणी केली जात आहे. त्यानुसार परमिट मिळवण्यासाठी या डिलरकडे रिक्षा खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे.
रिक्षा विक्रेते डिलर यांच्यासह काही रिक्षा युनियनमार्फत रिक्षा परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात आहे. परमिट मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे. लायसन्स व बॅच आहे परंतु परमिट नाही, अशांना परमिट मिळवून देण्याची हमी दिली जात आहे. याकरिता त्यांच्याकडून ५० हजार ते १ लाख रुपये उकळले जात आहेत. दीड वर्षापूर्वी व जानेवारी महिन्यात आरटीओने काढलेल्या परमिटच्या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीत आलेल्यांचा विशेषत्वाने जाळ्यात ओढले जात आहे. परिवहन मंत्रालयात थेट सेटिंग असल्याचे सांगून दलाल परमिटसाठी ग्राहक शोधत आहेत. तर काही रिक्षा विक्रेत्यांनी रिक्षा खरेदी केल्यावर परमिट देखील मिळवून देतो, असे सांगायला सुरुवात केली आहे. सानपाडा गाव येथे सुरू असलेला असाच प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणच्या मातोश्री मोटर्स शोरूमच्या चालकाने १ रुपयात रिक्षा बुकिंगची जाहिरात केली आहे. यानुसार त्याच्याकडे चौकशीसाठी येणाऱ्यांना आपल्याकडूनच रिक्षा घेतल्यास परमिट देखील मिळवून देऊ, असे सांगितले जात आहे. या आमिषाला भुलून अवघ्या काही दिवसात दीड हजारहून अधिकांनी रिक्षा व परमिटसाठी कागदपत्रे जमा केली आहेत. दिवसेंदिवस पसरणाऱ्या या चर्चेनुसार दररोज अनेकांची झुंबड उडत असल्याचे दिसून आले आहे. त्याठिकाणी येणाऱ्यांमध्ये नवी मुंबईसह मुंबई व पनवेल परिसरातील रिक्षाचालकांचा समावेश आहे. या सर्वांना एकत्रित बसवून रिक्षासोबत परमिट कसे मिळवून दिले जाईल व त्यासाठी किती पैसे मोजायचे याची उघड माहिती दिली जाते. काहींनी या प्रकाराची तक्रार आरटीओकडे देखील केलेली आहे. यानंतरही संबंधितावर कारवाईऐवजी सुरू असलेल्या प्रकाराकडे डोळेझाक होत आहे.
काही दिवसांपूर्वी वाशी रेल्वेस्थानक परिसरात बैठक घेवून एका रिक्षा चालक संघटनेनेच परमिटसाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज भरून घेतल्याचे समजते. यादरम्यान परमिटच्या नावाखाली संबंधितांनी ५० हजार ते १ लाख रुपये उकळल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये आहे. यावरून आरटीओच्या मूक संमतीने परमिट विक्रीचे रॅकेट चालवले जात असून, त्यामध्ये दलालांसह रिक्षा संघटनाही सक्रिय असल्याचे उघड होत आहे.
>परिवहन मंत्रालयापर्यंत धागेदोरे ?
परमिट विक्री करणाऱ्या दलालांकडून त्यांची थेट परिवहन मंत्रालयापर्यंत पोच असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात परमिटची सोडत निघणार असून त्याची प्रक्रिया आॅनलाइन असो किंवा आॅफलाइन, अर्ज भरणाऱ्यांचे नाव त्या यादीत असणारच याची हमी दिली जात आहे. मात्र यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दोन हजार रुपये लागणार असून, ते कधी द्यायचे हे फोनवर कळवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Permit racket by vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.