मद्यधुंद युवकांची 'पद्मावती'च्या सेटवरील सुरक्षा रक्षकाला मारहाण

By admin | Published: March 29, 2017 12:51 PM2017-03-29T12:51:03+5:302017-03-29T12:52:59+5:30

दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आगामी सिनेमा 'पद्मावती'मागील वाद काही संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीत.

At the Padmavati's set of drunken youth, a security guard was assaulted | मद्यधुंद युवकांची 'पद्मावती'च्या सेटवरील सुरक्षा रक्षकाला मारहाण

मद्यधुंद युवकांची 'पद्मावती'च्या सेटवरील सुरक्षा रक्षकाला मारहाण

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 29 - दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आगामी सिनेमा 'पद्मावती'मागील वाद काही संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीत. पुन्हा कोल्हापुरातील 'पद्मावती'च्या सेटवर सांगलीच्या तीन युवकांचा मद्यप्राशन करुन धिंगाणा घातला. इतकंच नाही तर सेटवरील सुरक्षा रक्षकालाही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. 
 
यापूर्वी 14 मार्च रोजी भन्साळी यांच्या ‘द लिजंड ऑफ पद्मावती’ या सिनेमाचे पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर सुरू असलेल्या चित्रीकरणाचा सेटही मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने पेटवून दिला. जमावाने जनरेटर व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करीत सुरक्षारक्षकास मारहाण केली. त्यामध्ये राजू, आवदेश व फैयाज हे कामगार जखमी झाले. आगीमध्ये 700 ते 800 किमती पोशाख, चित्रीकरणाचे साहित्य, असे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले होते.
 
मसाई पठारावर 5 मार्चपासून चित्रीकरण झाले. मसाईवर युद्धतयारीचे चित्रीकरण करण्यात येणार होते. यासाठी भव्य रथ तयार करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. क्रेनच्या साहाय्याने 60 फुटी भव्य युद्धध्वज उभारण्यात येणार होता. शिवाय कोल्हापूर परिसरातील 400 हून अधिक स्थानिक कलाकारांचा समावेश करण्यात येणार होता. यामध्ये उंट, हत्ती, बैल आणि घोड्यांचा समावेश होता.
 
मसाई पठारावर या चित्रीकरणाची तयारी सुरू असतानाच, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या पठाराच्या दरीच्या बाजूला असलेल्या वेखंडवाडी परिसरातून अचानक दहा ते पंधरा जणांनी बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून पेटते गोळे साहित्यावर फेकल्याने परिसराला आग लागली. आग पसरत जाऊन तबेलापर्यंत पोहोचली. कर्मचाऱ्यांनी प्रथम घोडे वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही एका घोड्याला धग लागून तो जखमी झाला. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात दहा ते पंधरा राजपूत लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निर्माता चेतन भालचंद्र देवळेकर (वय ३४, रा. माहीम, मुंबई) यांनी फिर्याद दिली.  

विमा रकमेसाठी स्टंट?
चित्रीकरण सुरू होऊन नऊ दिवस होईपर्यंत कोणीही विरोध केलेला नव्हता किंवा तसे निवेदनही कोणी दिलेले नव्हते. चित्रीकरण अंतिम टप्प्यात आल्यामुळे विम्याच्या रकमेसाठी हा स्टंट केला असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
जयपूरमध्येही सेटवर तोडफोड
कोल्हापूरपूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावतीच्या सेटवर तोडफोड करून भन्साळी यांना थापड देखील मारली होती. तेराव्या शतकात तत्कालीन दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चितोडगड येथील शिशमहालात राणी पद्मिनीची एक झलक पाहिली होती. यादरम्यान राणी पद्मिनीने या गडावरच जोहार केला होता. या पार्श्वभूमीवर पद्मावतीचे चित्रीकरण जयपूर येथे सुरु असताना संघटनेने तोडफोड केली. पाठोपाठ चितोडगडमधील ऐतिहासिक शिशमहालातील आरसेही फोडले होते. या घटनेचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही बॉलीवूडच्या दिग्गजांनी केली होती. 
 
करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.
 

Web Title: At the Padmavati's set of drunken youth, a security guard was assaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.