ना बाप बडा, ना भैया...

By Admin | Published: June 30, 2016 12:55 AM2016-06-30T00:55:47+5:302016-06-30T01:25:15+5:30

औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली.

No father big, no brother ... | ना बाप बडा, ना भैया...

ना बाप बडा, ना भैया...

googlenewsNext


औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप कंपनीच्या आवारात घडलेल्या रमेश रामेश्वर मिसाळ (२६) या कामगाराच्या आत्महत्येला काल धक्कादायक कलाटणी मिळाली. ही आत्महत्या नसून खून असल्याचे चिकलठाणा पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ या गाण्याप्रमाणे मालमत्तेसाठी सख्खा लहान भाऊ गणेश मिसाळ (२२, रा. नारेगाव), बहीण जयश्री सोनटक्के व भावजी ओंकार सोनटक्के (रा. जालना) यांनीच रमेशचा खून केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली.
खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करणाऱ्या गणेश मिसाळ आणि ओंकार सोनटक्केया दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहीण जयश्री फरार झाली असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याचे चिकलठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी सांगितले.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मयत रमेश मिसाळ हा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील केशव पाईप या कंपनीत काम करीत होता. २५ मार्च रोजी त्याचा विवाह झाला होता. कंपनीच्या आवारातच असलेल्या क्वार्टरमध्ये रमेश आणि त्याची पत्नी विजया हे नवदाम्पत्य वास्तव्यास होते. त्याच्याच कंपनीत बहीण जयश्रीही काम करते आणि तीही रमेशच्या शेजारीच असलेल्या क्वार्टरमध्ये राहते.
घरात सापडले होते फासावर लटकलेले प्रेत
१६ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयश्रीने आवाज देऊन भावजय विजयाला बोलविले आणि ‘आपण शौचाला जाऊन येऊ’ असे सांगितले. मग दोघी शौचाला गेल्या. विजयाला घेऊन जवळपास दीड तास जयश्रीने तितकाच वेळ ‘टाईमपास’ केला. साडेअकरा वाजेच्या सुमारास दोघी परत आल्या. विजयाने खोलीचा दरवाजा उघडताच आतमध्ये पती रमेशचे फासाला लटकलेले प्रेत तिच्या नजरेस पडताच तिला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस तेथे पोहोचले. फासावर लटकलेल्या रमेशचे पाय जमिनीला टेकलेले होते. त्यामुळे तेथेच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मात्र, त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली.
पत्नीलाही आला होता संशय
आपला पती आत्महत्या करूच शकत नाही, हा खून आहे आणि त्यात घरच्यांचाच हात आहे, असा संशय रमेशची पत्नी विजयालाही त्याच वेळी आला होता. कारण जेव्हा भावजयी जयश्रीने तिला रात्री शौचासाठी नेले. त्यावेळी तिला घरातून पतीच्या ओरडण्याचा आवाज आला. विजयाने जयश्रीला ‘मला त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला’ असे म्हटलेही होते; परंतु नाही तुला भास झाला, असे म्हणत तिने वेळ मारून नेली होती. त्यानंतर घरी येताच पतीचे प्रेत विजयाला नजरेस पडले. त्यामुळे विजयानेही हा खून असल्याची तक्रार करून याच्या चौकशीची मागणी केली होती. सहायक निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी मग तपासाची चके्र फिरविली.
सर्व बाजूंनी तपास केला तेव्हा रमेशचा बहीण जयश्री व लहान भाऊ गणेशसोबत नारेगावातील वडिलांच्या घराच्या वाटणीवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. नेमक्या घटनेच्या वेळीच जयश्रीचे विजयाला घरातून बाहेर घेऊन जाणे, दीड तास फिरविणे, या गोष्टी पोलिसांना खटकल्या. अखेर गणेशला आणि जयश्रीचा पती ओंकारला काल ताब्यात घेऊन ‘खाक्या’ दाखविताच त्यांनी तोंड उघडले. आपणच खून केल्याची त्यांनी स्पष्ट कबुली दिली.

Web Title: No father big, no brother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.