नाशिकमध्ये ११ छतांवर पिकतेय वीज! सौर ऊर्जेचा वाढला वापर

By Admin | Published: October 27, 2016 08:54 AM2016-10-27T08:54:55+5:302016-10-27T12:31:38+5:30

वीजेचे वाढते दर आणि त्यानंतरही पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे नाशिकमध्ये नागरिकांनीच सौर ऊर्जेचा वापर करून घराच्या छतावर वीजनिर्मिती करणे सुरू केले आहे

Nashik has 11 electric power plants! Increased use of solar energy | नाशिकमध्ये ११ छतांवर पिकतेय वीज! सौर ऊर्जेचा वाढला वापर

नाशिकमध्ये ११ छतांवर पिकतेय वीज! सौर ऊर्जेचा वाढला वापर

googlenewsNext

संजय पाठक, ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २७ -  वीजेचे वाढणारे दर आणि त्यानंतरही पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनीच सौर ऊर्जेचा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती करणे सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी अशा प्रकारे छतांवरच वीजनिर्मिती केंद्रे सुरू झाली असून ही वीज केवळ नागरिकच वापरत नाही तर ती महावितरणलाही विकत असल्याने महावितरणाचा बोजा कमी झाला आहे. अर्थात, महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील अनभिज्ञता आणि मंजुरीसाठी किचकट प्रकार यामुळे अपेक्षेपेक्षा हा प्रतिसाद कमीच असून, महावितरणने त्रुटी दूर केल्यास कैकपटीने अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे
नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे छतावर वीजनिर्मिती करून ती स्वत: वापरतानाच अन्य नागरिकांना देण्यासाठी ९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ११ वीज ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली असून त्यात ५ घरगुती ग्राहक आहे. सामान्यत: विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी नागरिक घराचे पाणी सौर ऊर्जेवर तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटरचा वापर करतात. त्यातून घरगुती गॅसची बचतही केली जाते. परंतु अशा प्रकारचे घरासाठी वीज निर्मितीसाठी स्वयंपूर्ण होण्याबाबत शासनाचे धोरण चालू वर्षीच आखले गेले आहे. घराच्या छतावर घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती करतानाच अतिरिक्त निर्माण होणारी वीज महावितरणला विकता येऊ शकते, यासंदर्भातील रूफ टॉप पॉलिसी केंद्र आणि त्यानंतर राज्य शासनाने आणली आहे. ती सर्वसामान्यांपर्यंत हळूहळू पोहचू लागली असून त्याचाच लाभ घेत नागरिक घरगुजी वीजनिर्मिती करीत आहे.
या प्रकारामध्ये घरांवर सोलर पॅनल बसवले जातात. त्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज इर्न्व्हटरमध्ये जाते. त्याला नेट मीटर जोडले जाते. नेट मीटरमध्ये निर्माण होणारी वीज ग्राहकाने किती वापरली आणि अतिरिक्त ठरणारी वीज महावितरणाच्या ग्रीडला किती जोडली अशाप्रकारची नोंद घेणारी व्यवस्था आहे. त्याला नेट मीटर किंवा नक्तमापन म्हणतात. साहजिकच सकाळच्या वेळी वीज वापरतानाच सूर्यकिरणे प्रखर असल्यास अधिक वीजनिर्मिती होते, त्यावेळी घरात न वापरली जाणारी वीज थेट महावितरणाच्या रोहित्राला पाठविली जाते. सामान्यत: ग्राहकाच्या मंजूर वीजभारापेक्षा अधिक वीज निर्मितीची परवानगी दिली जात नाही. ग्राहक त्याला आवश्यक असलेली वीज वापरू शकतो. परंतु सकाळी अतिरिक्त निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्यापेक्षा थेट महावितरणलाच विकतो. ग्राहक स्वत: निर्मिती केलेली वीज जितकी वापरेल, तितका महावितरणचा भार कमी होतो. महावितरणने वीज वापरली आणि काही अतिरिक्त युनिट महावितरणला विकले तर ग्राहकाची रक्कम समायोजित केली जाते. त्यामुळे मासिक वीज बिलात फिक्स चार्जेसपेक्षा अतिरिक्त रक्कम भरावी लागत नाही. तर खूपच अतिरिक्त वीज महावितरणला दिल्यास वर्षभराचा हिशेब करून ग्राहकाला त्या विजेचा मोबदलाही दिला जातो. त्यामुळे ग्राहकाला त्याचा फायदाच होत आहे. (प्रतिनिधी)

काहीसे खर्चिक पण...
काही वर्षांपर्यंत सौर ऊर्जेसाठी लागणारे सोलर पॅनल खरेदी करणे खूप खर्चिक होते. आता त्यातील दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र एकदा पॅनल बसवल्यानंतर निर्माण होणारी वीज आणि एकंदर सोलर पॅनलचे आयुर्मान बघितले तर शून्य देखभाल खर्चामुळे ग्राहकांना ते सहज परवडते. विजेच्या युनिटच्या आधारे वापरानुसार महावितरणने स्लॅब ठरविले आहेत. घरगुती विजेचा वापर १०० युनिटपर्यंत असेल तर ३.७६ पैसे प्रतियुनिट दर आहेत. शंभर युनिटपेक्षा एक युनिट अधिक वापर झाला तर स्लॅब बदलतो आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंत दुपटीपेक्षा अधिक म्हणजेच ७.२१ प्रति युनिट असा दर आहे. अशा वेळी घरगुती बिल अपेक्षेपेक्षा जास्त होते. मग, नागरिक त्रस्त होतात. असे होऊ नये आणि विजेचा वापर अधिक झाला तरी महावितरणचे बिल वाढू नये यासाठी हे अत्यंत सोयीचे ठरते. विशेष म्हणजे सोलर सिस्टीमचे आयुर्मान बघितले तर सर्वच खर्च काही वर्षांत सहज वसूल होतो.

एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी ८५ हजार खर्च
सध्या सोलर पॅनलच्या वितरणात देश-विदेशातील कंपन्या असून त्यामुळे आता पॅनलचे दर स्पर्धात्मक झाले आहेत. साधारणत: एक किलो वॅट वीज निर्मितीच्या दृष्टीने विचार केला तर किमान ८५ हजार रुपये इतका खर्च येतो. (बॅटरीचा वापर असेल तर खर्च अधिक वाढतो.) नेट मीटर सध्या महावितरणकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे मार्केटमध्ये कोणत्याही दराने त्याची विक्री होते. नेट मीटरच्या (नक्त मापन) तपासणीचा खर्चही खूप होतो. महावितरणने नेट मीटरची व्यवस्था केल्यास जास्तीत जास्त अडीच ते तीन हजार रुपये खर्चात हे मीटर उपलब्ध होऊ शकते. सोलर पॅनलमध्ये अनेक प्रकार असले तरी टेकॅड पॉलीक्रिस्टलाईनचाच वापर संयुक्तिक आहे.

९२ टक्के वीज निर्मितीची क्षमता
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर २०.० ते २०.७ अक्षांश असे शहर वसलेले आहे. सकाळी जसजसा सूर्य वर येतो तशी सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती होत असते. सकाळी साडेदहा वाजेनंतर नाशिकमध्ये वीज निर्मितीला वेग येतो तोपर्यंत आठ ते नऊ टक्के वीजनिर्मिती होते. पीक अवर म्हणजे १२.४५ मिनिटांनी सर्वाधिक वीजनिर्मिती होत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. सोलर पॅनलच्या दर्जानुसार पीक अवरमध्ये ९० ते ९२ टक्के वीजनिर्मिती होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: Nashik has 11 electric power plants! Increased use of solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.