मुश्रीफ यांनी केले ‘हात वर’ पानसरे मारेकऱ्यांची माहिती नाही

By admin | Published: July 30, 2015 12:37 AM2015-07-30T00:37:55+5:302015-07-30T00:48:01+5:30

‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...

Mushrif did not know about the 'Hands Up' Pansare killers | मुश्रीफ यांनी केले ‘हात वर’ पानसरे मारेकऱ्यांची माहिती नाही

मुश्रीफ यांनी केले ‘हात वर’ पानसरे मारेकऱ्यांची माहिती नाही

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहीत आहेत, असा गौप्यस्फोट करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आता त्यासंबंधी अधिक माहिती देण्यास ‘हात वर’ केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’च्या पथकाला त्यांनी याप्रकरणी आपल्याकडे ‘स्पेसिफिक’ काही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे या अतिशय संवेदनशील प्रकरणात त्यांनी अत्यंत स्वैरपणे हा आरोप केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुश्रीफ यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.कोल्हापूर महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या पानसरे स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शुक्रवारी (दि.२४ जुलै) सकाळी मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला होता. मुश्रीफ म्हणाले होते की, ‘मला पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मारेकरी सापडले आहेत परंतु राज्य सरकार मारेकऱ्यांची नावे जाहीर करण्यास प्रतिबंध करत आहे.’ मंगळवारी व बुधवारीही त्यांनी यासंबंधी कोणतीच माहिती विधानसभेत दिलेली नाही. मुश्रीफ सभागृहात उपस्थित होते परंतु बुधवारी दिवसभर याकूबच्या फाशीवरून सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज झाले नाही (प्रतिनिधी)


‘त्या’ संघटनेबाबत बोलायचे होते...
मुश्रीफ यांच्या या विधानाने राज्यभर खळबळ उडवून दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी आपण केलेल्या विधानावर ठाम असून, मंगळवारी (दि. २८ जुलै) विधानसभेत त्याची माहिती देणार असल्याचे जाहीर केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) अप्पर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्याकडे या आरोपांबाबतची माहिती घेण्यासाठी पथक पाठविले परंतु त्यांनी आरोपींची अथवा ज्या अधिकाऱ्याने त्यांना ही माहिती दिली, असे ते सांगतात त्यांचीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते ज्या संघटनेवर संशय व्यक्त करतात त्यांच्या बाबतच आपल्याला बोलायचे होते, असे या चौकशीत मुश्रीफ यांनी सांगितले परंतु त्याबद्दल अन्य कोणतीच माहिती ते देऊ शकले नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: Mushrif did not know about the 'Hands Up' Pansare killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.