‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:07 AM2024-04-23T10:07:39+5:302024-04-23T10:08:00+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Ajit Pawar was once an elephant, now he has become a baby mouse'; Bochari criticism of the Uttam jankars | ‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथींचं केंद्र बनला आहे. येथे भाजपाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. तर मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक मानल्या जाणाऱ्या उत्तम जानकर यांनीही शरद पवारांसोबत जात मोहिते पाटील यांच्यासोबतचा वाद मिटवला आहे. त्यामुळे माढ्यातील समिकरणं बदलली आहेत. दरम्यान, कालपरवापर्यंत महायुतीसोबत असलेल्या जानकर यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर यांनी लगावला आहे.

एका सभेला संबोधित करताना उत्तम जानकर म्हणाले की, आज परकीयांनी आक्रमण केलेलं नाही, स्वकीयांनी आक्रमण केलं आहे. ज्याला किल्लेदार म्हणून नेमलं, ज्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला दिला होता तोच माणूस फितूर झाला, त्यामुळे तुम्हा बारामतीकरांना आणि संपूर्ण राज्याला, या मतदारसंघाला एक मोठा धक्का बसला. अजित पवार यांचं व्यक्तिमत्त्व मी गेली २५-३० वर्षे मी पाहतो. आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत. काय अवस्था झालेली आहे. त्यामुळे किल्लेदार फितूर झाल्याने पायथ्याशी काठी घेऊन एक ८५ वर्षांचा तरुण उभा आहे. तसेच या राज्यातील हजारो लोक त्याला वेढा टाकून बसले आहेत. आता त्या वेढ्यातून किल्लेदाराची सुटका नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.

यावेळी जानकर यांनी भाजपालाही टीकेचं लक्ष्य केलं. तुम्ही पक्ष फोडला. ४० आमदार सोबत नेले. तरीसुद्धा तुमचं समाधान झालं नाही. तुम्ही बारामतीवरच हल्ला करायचा हे ठरवलं. त्यामुळे या राजकारणाबद्दल आमच्यासारख्या तरुणामध्ये घृणा निर्माण झाली. आम्ही आमदार होऊ अथवा नाही होऊ. आम्हीही वाट चुकलो होतो. मागच्या निवडणुकीत मी आणि मोहिते पाटील यांनी भाजपाला १ लाख १६ हजारांचं मताधिक्य दिलं होतं. जिथून शरद पवार निवडून आले होते. तो मतदारसंघ पाडायचं पाप आमच्या हातून घडलं होतं. परंतु यातून मुक्ती मिळवली पाहिजे. पाप:शालन झालं पाहिजे. म्हणून आमचीसुद्धा मागच्या दहा वर्षांत फसवणूक झाली. मोहिते पाटील आमचे राजकीय शत्रू विरोधक असतील. पण त्यांनासुद्धा एका कोपऱ्यात ठेवलं गेलं. मी आणि मोहिते पाटील एकत्र येऊ शकत नाही, ही यांची भावना होती. मात्र महाराष्ट्रातील दीनदुबळ्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही हे वैर संपवलं. मी आणि मोहिते पाटील एकत्र आलोय. आता १ लाख ८० हजारांचं मताधिक्य माळशिरस तालुक्यातून मोजून घ्यायचं. या आकड्यात कमी पडलो तर मी राजकारण सोडून देईन, असा दावाही जानकर यांनी यावेळी केला. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Ajit Pawar was once an elephant, now he has become a baby mouse'; Bochari criticism of the Uttam jankars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.