चला, पाणी वाचवू या...

By admin | Published: May 1, 2016 03:30 AM2016-05-01T03:30:10+5:302016-05-01T03:30:10+5:30

राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यापायी होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या नागरिकांनी

Let's save the water ... | चला, पाणी वाचवू या...

चला, पाणी वाचवू या...

Next

- सचिन लुंगसे

राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यापायी होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या नागरिकांनी
आश्रयासाठी मुंबई गाठली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात कमी पाऊस पडल्याने यापूर्वीच शहरात २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. ती पावसाळ्यापर्यंत कायम राहणार आहे. अशातच एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चटके वाढत आहेत. पावसाळ्यापर्यंत पाणी टिकून राहावे म्हणून मुंबईकरांनी ‘चला, पाणी वाचवू या...’ असे म्हणत ‘जलबचती’ला हातभार लावला आहे. स्वयंसेवी संस्थांपासून व्यक्तिगत पातळीवर पाणीबचतीचे धडे गिरवण्यात येत आहेत. मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पाणीबचतीच्या चळवळीला व्यापक स्वरूप आले आहे.

मुंबई आणि उपनगरात पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सामाजिक सेवाभावी संस्था, शाळा महाविद्यालये यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान, पाणी हक्क समिती, वी द पीपल, रिव्हर मार्च, युवा आणि जलवर्धिनीसारख्या संस्था कार्यरत आहेत. पाणीबचतीसाठी व्यक्तिगत पातळीवरही प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त कपडे, भांडी आणि वाहने धुण्यासाठी पाण्याच्या कमी वापरावर भर देण्यात येत आहे. शहरासह उपनगरातील चाळींमध्ये असलेल्या जुन्या विहिरी स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. पिण्याव्यतिरिक्तच्या पाण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. सेवाभावी संस्थांनी या विहिरी स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. ‘अभियान’ संस्थेतर्फे मुंबई आणि उपनगरात ‘विहीर स्वच्छ अभियान’ हाती घेण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून हाती घेण्यात आलेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत अंदाजे २५ विहिरी स्वच्छ करण्यात आल्या आहेत, असा दावा अभियानाचे अध्यक्ष अमरजित मिश्र यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे विहीर स्वच्छ अभियान वर्षभर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्च या दोन संस्थांनी मुंबईमधील चारही नद्या स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. केवळ नदी स्वच्छ करणे हा त्यांच्या मोहिमेचा उद्देश नाही, तर भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नदीच्या पाण्याचे महत्त्व पटवून देणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. दोन्ही संस्थांनी प्रत्यक्ष काम करतानाच यासाठी तरुणांना एकत्र करता यावे म्हणून सोशल नेटवर्क साइट्सवरही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल हे सोशल नेटवर्क साइट्सवर पाणीबचतीचे धडे देणाऱ्या चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. तर रिव्हर मार्च संस्थेकडून नदीच्या स्वच्छतेसह मुंबईकरांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पश्चिम उपनगरात शाळा महाविद्यालयात जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रभातफेऱ्यांद्वारे विद्यार्थी मुंबईकरांना पाण्याचे महत्त्व पटवून देत आहेत. यात पथनाट्य आणि भित्तीपत्रकाचा समावेश आहे.
पाणी हक्क समितीसारखी नामांकित संस्था मुंबईभर काम करत असतानाच पूर्व उपनगरातील गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, टिळकनगर येथील ज्या झोपड्यांना पाणी मिळत नाही; त्यांच्यासाठीचे आंदोलन आणखी व्यापक करत आहे. त्यांच्यासाठीच्या आंदोलनाव्यतिरिक्त शाळा आणि महाविद्यालयीन तरुणांना एकत्र घेत ‘युवा’ या संघटनेच्या माध्यमातून मुंबईकरांना पाणीबचतीचे महत्त्व पाणीहक्क समितीकडून पटवून दिले जात आहे. विशेषत: पाणीबचतीच्या सभा घेत महिलांना एकत्र करत पाणी कसे वाचवता येईल, यावर समितीचा अधिकाधिक भर आहे.

विशेष म्हणजे श्रमदानातून टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जात आहे, असे जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी सांगितले. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही त्या नमुन्याच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

मुंबईमधील जलवर्धिनी नामक संस्था पाणी कसे वाचवता येईल? यासाठी केवळ मुंबईत नाही तर रत्नागिरीसह ठाणे आणि उर्वरित जिल्ह्यात प्रत्यक्षात काम करत आहे.

ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटवण्यासाठी मुंबईसह येथे जलजागृती सप्ताह घेण्यात येत आहेत. आणि या माध्यमातून फेरोसिमेंटच्या जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे.

उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्याची मागणी

2050
सालापर्यंत सध्यापेक्षा चौपटीने जास्त होणार आहे. परिणामी पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर होणे गरजेचे आहे.

2000 मिलीमीटर मुंबईत साधारणपणे म्हणजे २ मीटर पाऊस पडतो, असे गृहीत धरले तर पावसाळ्यात एकूण १ हजार ८०० घनमीटर म्हणजे १८ लाख लीटर पाणी इमारतीच्या गच्चीवरून वाहते.

वाहत्या नळातून एका मिनिटात

12
लीटर पाणी वाया जाते, असे सूत्र आहे.

दात घासण्यास पाच मिनिटे उघड्या ठेवलेल्या नळातून

60
लीटर पाणी
वाया जाते.

जगात सुमारे

74.8
कोटी जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही.

नळाच्या तोटीतून सेकंदाला एक थेंब गळत असेल तर दररोज पाच लीटरहून अधिक पाणी वाया जाते. आठवड्याला

36.4
लीटर व वर्षाला १,८९१ लीटर पाणी वाया जाते.

माणसाला दिवसागणिक किती पाणी लागते? याचा विचार केला तरी साधारणपणे पिण्यासाठी ३ लीटर, आंघोळीस १५ ते २० लीटर व इतर कामांस १०० लीटर पाणी लागते. म्हणजेच सरासरी १२५ ते १५० लीटर पाणी ही प्रत्येकाची गरज असते.

५ माणसांच्या घरात जवळजवळ

300
लीटर पिण्याचे पाणी वाया जाते.

Web Title: Let's save the water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.