दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:22 AM2024-05-09T06:22:55+5:302024-05-09T06:23:25+5:30

लोकसभेनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार यांच्या दाव्याने खळबळ; विरोधकांकडून मात्र टीकेचे सूर

Let's celebrate Diwali together, but Ajit Pawar no entry in party again; Sharad Pawar closed the doors of return... | दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. पुढील दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

 नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे, हे आमच्यासाठी अवघड असल्याचेही पवार म्हणाले. १९७७ मध्ये विविध पक्ष एकत्र आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. विरोधकांनी तेव्हाही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाईंपेक्षा राहुल गांधींना जास्त जण स्वीकारतात. समविचारी लोकांना एकत्र आणण्याबाबत राहुल यांनी चर्चाही केली असल्याचे पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे : औपचारिकता बाकी आहे
शरद पवार काही सूचक वक्तव्य करत असतात. औपचारिकता बाकी आहे. उद्धवसेनेचे सध्या काँग्रेसीकरण झाले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस : उद्धवसेनाही सोबत जाईल
लोकसभेनंतर पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. त्यामुळे ते त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. उद्धवसेनाही काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

अजित पवार : त्यांच्यासाठी हे काही नवे नाही
शरद पवारांनी यापूर्वीदेखील आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. शरद पवारांसाठी पक्ष विलीन करणे नवे नाही. ८ डिसेंबर १९८६ रोजी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आयमध्ये विलीन केला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार होतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

त्यांना पक्षात नो एन्ट्री
ज्या लोकांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडला, त्यांना जनता पसंत करत नाही. पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळी एकत्र साजरी करतात. मात्र, राजकीयदृष्ट्या त्यांना परत यायचे असेल, तर आम्ही त्यांना स्वीकारणार नाही, असेही शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता स्पष्ट केले.

नाना पटोले : शरद पवार सांगतात त्यात तथ्य आहे
देशपातळीवर चर्चा चालू आहे. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी पुण्याला आले होते, तेव्हा राहुल गांधींनी मला सांगितले होते की अनेक पक्षांचा विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे. देशात भाजपच्या तानाशाही विरोधात एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वात रहावे, अशा पद्धतीची भूमिका अनेक प्रादेशिक पक्षांनी मांडल्याचे मला राहुल गांधींनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार जे काही सांगतात त्यात तथ्य आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Web Title: Let's celebrate Diwali together, but Ajit Pawar no entry in party again; Sharad Pawar closed the doors of return...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.