आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यास अटक

By admin | Published: February 25, 2017 01:02 AM2017-02-25T01:02:55+5:302017-02-25T01:02:55+5:30

गाडी चोरी प्रकरण : एन. डी. पाटील यांना दिला गाडीचा ताबा

Inter-state gang patrol arrested | आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यास अटक

आंतरराज्य टोळीच्या म्होरक्यास अटक

Next

कोल्हापूर : मोटार चोरी प्रकरणातील आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार मनजितसिंग जोगिंदरसिंग मारवा (वय २८, रा. दिल्ली, सध्या रा. एलिगंट सोसायटी, निगडी, पुणे) याला लोणावळा रेल्वेस्थानकावर शुक्रवारी अटक केली. त्याने महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मेरठ, आदी ठिकाणी महागड्या चारचाकी गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार भूपेंद्रसिंग राजसिंग हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेनुसार ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांची इनोव्हा गाडी त्यांना परत केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. पाटील यांच्या इनोव्हा गाडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील गॅरेजमालक जुबेर रज्जाक सय्यद (३७, रा. तळवडे, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक केली होती. त्याच्याकडून इनोव्हासह गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार पोलिसांनी जप्त केली. चौकशीमध्ये इनोव्हा गाडी टोळीचा मुख्य सूत्रधार मनजितसिंग मारवा व साथीदार भूपेंद्रसिंग यांनी चोरल्याची त्याने कबुली दिली होती. मारवाचे मोबाईल लोकेशन लोणावळा येथे आढळल्याने पोलिस उपनिरीक्षक शरद माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ लोणावळा येथे जाऊन रेल्वेस्थानकावरून त्याला ताब्यात घेतले. त्याने भारतभर महागड्या चारचाकी गाड्यांची चोरी केल्याची कबुली दिली.
मनजितसिंग मारवा याने सुरुवातीस चुलत भावाकडे नोकरी केली. त्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये तो दिल्लीहून पुण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील निगडी येथे भाड्याने फ्लॅट घेऊन तो पत्नी व दोन मुलांसह राहू लागला. जुबेर सय्यदच्या मदतीने तळवडे येथे पंधरा हजार रुपये भाड्याने जागा घेऊन सद्गुरू मोटार शॉप सुरू केली. दुकान थाटल्यानंतर जुबेर हा गाड्यांची मागणी करील तशा तो व त्याचा साथीदार भूपेंद्रसिंग त्याला गाड्या चोरून आणून देत असत.


शेकडो मोटार चोऱ्या उघडकीस
जुबेर सय्यद याने दि. १३ फेब्रुवारीला सकाळी मारवाकडे ‘मेरे को एक इनोव्हा चाहिए,’ अशी मागणी केली. त्यावर मारवा व भूपेंद्रसिंग यांनी गाडीचोरीचा कट रचला. लोणावळा रिसॉर्ट येथून त्यांनी पांढऱ्या रंगाच्या आलिशान कारची चोरी केली. त्याच गाडीतून ते रात्री सव्वाआठ वाजता कोल्हापुरात आले. रेल्वे स्टेशनशेजारील गोकुळ हॉटेलमध्ये त्यांनी खोली घेतली. जेवण करून मध्यरात्री बाराच्या सुमारास ते बाहेर पडले. तेथून ते इनोव्हा शोधत सासने मैदानावर आले. या ठिकाणी त्यांना वेरणा गाडी दिसली. ती चोरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी भूपेंद्रसिंगने ‘भाई, ये गाडी क्यों चाहिए? अपने को इनोव्हा चोरी करनी है,’ असे सांगितल्यावर मारवाने ‘हमारे घरवालों को घूमने के लिये गाडी चाहिए,’ असे सांगितले; परंतु यापूर्वीच त्यांच्या ताब्यात एक गाडी होती. त्यांना इनोव्हा पाहिजे होती. एकावेळी तीन गाड्या घेऊन कसे जाणार म्हणून ते पुढे इनोव्हाचा माग काढत रुईकर कॉलनीत प्रा. पाटील यांच्या घरासमोर गेले. तेथून त्यांनी ती गाडी चोरून पुणे गाठले. मारवा व संशयित पिंकू प्रीतपाल सिंग (रा. दिल्ली) या दोघांविरोधात ट्रकचोरीचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर संपूर्ण भारतात शेकडोंच्या वर गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Inter-state gang patrol arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.