हरिनामे गर्जला चंद्रभागातीर!

By admin | Published: July 15, 2016 03:33 AM2016-07-15T03:33:53+5:302016-07-15T03:33:53+5:30

अनंत तीर्थांच्या माहेरात कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैलाची पायपीट करत अखंड हरिनामाचा गजर करत विविध संत-सज्जनांच्या पालख्यांसह

Hariname Garjala Chandrabagatir! | हरिनामे गर्जला चंद्रभागातीर!

हरिनामे गर्जला चंद्रभागातीर!

Next

बाळासाहेब बोचरे,  पंढरपूर
अनंत तीर्थांच्या माहेरात कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैलाची पायपीट करत अखंड हरिनामाचा गजर करत विविध संत-सज्जनांच्या पालख्यांसह नऊ लाख वैष्णवांची मांदियाळी गुरुवारी चंद्रभागातीरी विसावली. अखंड हरिनाम व टाळ-मृदंगांच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली.
गेले १५-२० दिवस विविध पालख्यांसोबत पायपीट करत वैष्णवांचा दळभार पंढरीकडे वाटचाल करत होता. संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताबाई तसेच संत गजानन महाराज यांच्या पालख्या नवमीलाच पंढरीत दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत व इतर मिळून चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.
गुरुवारी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सोपानदेव या प्रमुख पालख्यांसह दिंड्या-दिंड्यांमधून सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. याशिवाय रेल्वे, बस व खासगी वाहनांनीही वारकरी आले आहेत. सुमारे ९ लाख भाविकांची सध्या पंढरीत दाटी झाली असून, त्यांच्या मुखातून सदा ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष ऐकायला मिळत आहे.

विठ्ठलाला केवळ ६५ मिनिटांची विश्रांती
एकादशीच्या दिवशी विठ्ठलभक्तांचा जसा उपवास असतो तसाच देवाचाही उपवास असतो. त्यामुळे एकादशीच्या पूर्वरात्री मंदिर समितीकडून होणाऱ्या पूजेनंतर विठ्ठलाला भगरीचा तर रुक्मिणीमातेला साबुदाण्याचा नैवेद्य दाखविण्यात येतो. यासाठी विशेष कारण नसले तरी ही परंपरा आजही जोपासली जाते. पूजेनिमित्त पांडुरंगाला २४ तासात केवळ ६५ मिनिटांची विश्रांती मिळते.

आषाढी यात्रेच्या काळात पंधरा दिवस देवाचे रोज नित्योपचार थांबवून चोवीस तासांचा वेळ केवळ दर्शनासाठी ठेवण्यात येतो. आषाढी एकादशीच्या पूर्वरात्री अर्थात दशमीच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंदिर समितीच्या वतीने विठ्ठलाची पाद्यपूजा होते. त्यामध्ये देवाच्या पायावर पाणी ओतून हळदी-कुंकू वाहून पूजा करण्यात येते. त्यानंतर संकल्प सोडला जातो.

सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना होते. पहाटे पावणेदोनच्या सुमारास देवाला पंचामृताचा अभिषेक होतो. मूर्तीच्या संवर्धनासाठी डोक्यावरून पाण्याने अभिषेक तर पायावर पंचामृताने अभिषेक होतो. देवाच्या वस्त्राने अंग पुसून नवे वस्त्र परिधान केल्यावर चंदनाचा टिळा लावून, देवाला आरसा दाखविण्यात येतो व विठ्ठलाला भगरीचा नैवेद्य दाखविण्यात येतो, हाच विधी त्याच वेळेत रुक्मिणीमातेच्या पूजेत होतो.

सकाळी ११.०० च्या सुमारास देवाला महानैवेद्य दाखविण्यात येतो. ज्यात साबुदाणा खीर, गोड भगर, साधी भगर, शेंगा आमटी, बटाटा खीर असे उपवासाचेच पदार्थ असतात. हा नैवेद्याचा विधी सुमारे पंधरा मिनिटे चालतो. त्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते ते रात्री साडेआठपर्यंत अखंड सुरू राहते.

शीण घालविण्यासाठी लिंबू-सरबत
रात्री साडेआठच्या सुमारास गंधअक्षता हा विधी होतो. त्यावेळी देवाचा चेहरा ओल्या वस्त्राने पुसून पुन्हा चंदन टिळा लावण्यात येतो व देवाला लिंबू-सरबत देऊन शीण कमी केला जातो. या विधीनंतर पुन्हा एकदा देव पहाटे नित्यपूजेपर्यंत दर्शनासाठी विटेवर उभा राहतो. विठ्ठलाच्या आरतीनंतर पहाटे २.२५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेला सुरुवात होते. ३.३० वाजता पुन्हा दर्शन सुरु करण्यात येते.

शितोळे सरकारांच्या गळ्यात पादुका
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण इसबावी येथे झाले. त्यानंतर पालखी सोहळ्याचे मानकरी अंकली श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका देण्यात आल्या. त्यांच्या एका बाजूला वासकर व दुसऱ्या बाजूला मालक आरफळकर असा पारंपरिक पायी सोहळ््याने पादुका मंदिरापर्यंत नेण्यात आल्या.

दुष्काळामुळे १० टक्के गर्दी घटण्याची शक्यता
गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या खाईतून शेतकरी अजून सावरला नसल्याने त्याचा यंदाच्या आषाढीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. वारकऱ्यांची गर्दी किमान १० टक्के घटेल, असा अंदाज आहे.

 

Web Title: Hariname Garjala Chandrabagatir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.