नंदुरबारच्या मूर्तींना ग्लोबल टच

By admin | Published: August 30, 2015 01:34 AM2015-08-30T01:34:54+5:302015-08-30T01:34:54+5:30

सुमारे ७० वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती कारखाना उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. येथील गणेशमूर्ती सातासमुद्रापार जात आहेत. ३५ पेक्षा अधिक लहानमोठ्या

Global touch of idols of Nandurbar | नंदुरबारच्या मूर्तींना ग्लोबल टच

नंदुरबारच्या मूर्तींना ग्लोबल टच

Next

- मनोज शेलार, नंदुरबार
सुमारे ७० वर्षांची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती कारखाना उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. येथील गणेशमूर्ती सातासमुद्रापार जात आहेत. ३५ पेक्षा अधिक लहानमोठ्या कारखान्यांमधून एक इंचापासून ते २० फूटापर्यंतच्या हजारो मूर्ती येत्या गणेशोत्सवासाठी तयार होऊ लागल्या आहेत. लाखोंची उलाढाल करणारा हा उद्योग सरकारदरबारी मात्र उपेक्षितच आहे.
पूर्वी पेणच्या गणेशमूर्र्तींची मक्तेदारी होती. ती मोडीत काढत नंदुरबारच्या मूर्ती उद्योगाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. गेल्या वर्षी जवळपास ४०० लहान मूर्ती थेट दक्षिण आफ्रिकेत पाठविण्यात आल्या होत्या. यंदाही मागणी आहे.
२५ हजारांपेक्षा अधिक मूर्ती
नंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे ३० ते ३५ कारखाने आहेत. जून महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात तीन ते चार महिने राबत असतात. पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागीर होते. त्यांच्या कलेमुळे येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. शहरातील कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणाऱ्या मूर्र्तींची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक आहे.
जागेचा अभाव
मूर्ती कला उद्योगाला स्थानिक स्तरावर फारसा वाव नाही. शासन व प्रशासन दरबारी त्याची दखल घेतली जात नाही. मूर्ती कारखान्यांना वीज, पाणी आणि जागेसाठी झटावे लागते. गल्लीबोळात जेथे जागा मिळेल तेथे कारखाना सुरू करावा लागतो.
गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी
नंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातूनदेखील मोठी मागणी आहे. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणाऱ्या मूर्र्तींचे प्रमाण अधिक आहे.


गृह उद्योगही नावारूपाला
नंदुरबारात मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे घरगुती उद्योगही आहेत. अगदी एका इंचापासूनची मूर्ती तयार करण्याची कला येथे अवगत आहे. सध्या शाडूच्या मूर्र्तींना चांगली मागणी असल्यामुळे शाडूच्या मूर्ती तयार करणारे देखील अनेक जण आहेत.

मूर्ती व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. पूर्वी मोजकेच असलेले कारखाने आजच्या स्थितीत दुप्पट, तिप्पट झाले आहेत. परंतु शासन, प्रशासनाकडून येथील उद्योगाला प्रोत्साहन दिले जात नाही. कमीत कमी जागेचा प्रश्न तरी सोडविला जावा अशी अपेक्षा आहे.
- नारायण वाघ, मूर्ती कारागीर

Web Title: Global touch of idols of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.