सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर,१०५३ गावांचा समावेश

By admin | Published: March 9, 2016 05:08 PM2016-03-09T17:08:47+5:302016-03-09T17:17:38+5:30

दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Drought in Solapur, Ahmednagar district, including 1053 villages | सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर,१०५३ गावांचा समावेश

सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर,१०५३ गावांचा समावेश

Next
>महसूलमंत्री एकनाथ खडसेंची घोषणा
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ९ - दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ६४५ तर अहमदनगरमधील ४०८ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महसूल मंत्री खडसे यांनी विधान परिषदेत याबाबतचे निवेदन केले. मंगळवारी रात्री झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून या दुष्काळी गावांमध्ये सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
अपु-या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून यापूर्वीच खरीपातील १५ हजार ७४७ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर रब्बी हंगामालाही दुष्काळाचा फटका बसला असून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणा-या १०५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना करण्यात येतील. या सर्व गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी, चारा डेपो वा छावण्या, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, शेत पंपांची वीज जोडणी खंडित न करणे आणि रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. खरीपातील शेतपिकांच्या नुकसानीपोटी सुमारे २५०० कोटींची मदत 
शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी २ हजार कोटींची मदत केली जाणार आहे. 
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणात दुष्काळाचा उल्लेखच करण्यात आला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी केला. यावर राज्यपालांच्या भाषणात दुष्काळाचा उल्लेख आहे. भाषणादरम्यान गोंधळ घातला नसता तर ऐकू आले असते, असा टोला खडसे यांनी लगावला.

Web Title: Drought in Solapur, Ahmednagar district, including 1053 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.