डॉ. आंबेडकरांचा पुतळा जपानमध्ये उभारणार

By Admin | Published: February 15, 2015 01:15 AM2015-02-15T01:15:28+5:302015-02-15T01:15:28+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फूट उंचीचा, पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा एप्रिलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जपान येथे पाठविण्यात येणार आहे.

Dr. Ambedkar statue to be set up in Japan | डॉ. आंबेडकरांचा पुतळा जपानमध्ये उभारणार

डॉ. आंबेडकरांचा पुतळा जपानमध्ये उभारणार

googlenewsNext

दाजी पांचाळ यांची शिल्पाकृती : जपान आणि महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा करार
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ (जि़सिंधुदुर्ग)
कला व कलाकारांची खाण असलेल्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फूट उंचीचा, पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा एप्रिलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जपान येथे पाठविण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार बाळकृष्ण उर्फ दाजी पांचाळ यांच्या हस्तकलेतून हा पुतळा साकारला जात आहे.
प्रसिद्ध शिल्पकार कै. नारायण सोनवडेकर यांच्याकडून शिल्पकलेचा वारसा घेतलेल्या दाजी पांचाळ यांचा शिल्पकलेचा स्टुडिओ कुडाळच्या एमआयडीसीत येथे आहे. याठिकाणी ते विविध देवदेवता, लोकनेते तसेच इतर प्रकारचे सर्व माध्यमातील पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे साकारतात. मालवण तालुक्यातील तळगाव हे दाजी पांचाळ यांचे मूळ गाव असून, सध्या ते पेडवे येथे वास्तव्यास आहेत. जपानच्या वाकायामा येथील कोयसान टेकडीवर डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा यंदा एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान उभारण्यात येईल. वाकायामाबरोबर महाराष्ट्र सरकारचा पर्यटनविषयक सामंजस्य करार झाला आहे. त्याच कराराअंतर्गत तेथे डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येईल. पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने निविदा मागविल्या होत्या. यामधून ज्येष्ठ शिल्पकार दाजी पांचाळ यांना हा सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबईच्या वास्तुशिल्प विभागानेही या शिल्पाला परवानगी दिली आहे.

देशभर कलेचा आविष्कार
ज्येष्ठ शिल्पकार
दाजी पांचाळ यांनी प्रसिध्द शिल्पकार कै. नारायण सोनवडेकर यांच्यासोबत गेली ४५ वर्षे शिल्पकलेत काम केले असून, त्यांनी साकारलेले पुतळे विविध राज्यांमध्ये आहेत. यवतमाळमध्ये शक्तिस्थळावरील लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांचा पूर्णाकृती पुतळा, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळे तसेच तेथीलच माता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे अर्धपुतळे यांचा समावेश आहे.

साडेदहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा
जपान येथे पाठविण्यात येणारा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पंच धातूचा असून, त्याची उंची साडेदहा फूट आहे. यामध्ये पुतळा साडेसहा फूट, तर त्याचा चौथरा चार फूट उंचीचा आहे.

पुतळ्याचे कुडाळ
येथे काम सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे काम डिसेंबर २०१४ पासून सुरू झाले असून, ते मार्च २०१५ अखेरीस पूर्णत्वास येणार आहे. हा पुतळा एप्रिलअखेरीस मुंबई येथे पाठविण्यात येणार असून, तेथून सागरी मार्गाने बोटीतून जपानच्या वाकायामा येथील कोयसान बेटावर नेण्यात येईल़ या पुतळ्यासाठी
२२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

दुसरी कलाकृती
देशाबाहेर
यापूर्वी कै. सोनवडेकर यांच्या स्टुडिओमध्ये असताना दाजी पांचाळ यांनी साकारलेल्या श्री परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा पोलंड येथे पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जपान येथे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Dr. Ambedkar statue to be set up in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.