महाविद्यालयीन तरुणाचा खून

By admin | Published: March 29, 2017 02:49 AM2017-03-29T02:49:35+5:302017-03-29T02:49:35+5:30

किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला़

College youth murder | महाविद्यालयीन तरुणाचा खून

महाविद्यालयीन तरुणाचा खून

Next

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासांत दोघांना अटक केली आहे़
आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (वय २०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़
गौरव रामचंद्र जाधव (वय २१, रा़ सिंहगड इन्स्टिट्यूट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मूळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे़ या प्रकरणात मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली़
तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना सोमवारी रात्री गौरव जाधव याचा मृत्यू झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मूळ गावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, श्रीकांत शिंदे, तपास पथकाचे उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळविले़
या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले़ गुन्ह्यात वापरलेला बांबू हस्तगत करायचा आहे़ गुन्हा करण्याचा मुख्य उद्देश काय, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ (प्रतिनिधी)
किरकोळ कारणावरून बाचाबाची
अभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोश बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्व जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदव्यांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्रांचा वाढदिवस साजरा करून रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यावर बसले होते़
आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ ते गप्पा मारत बसले असताना एकाने त्यांची ओळख करून दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरून त्यांच्यात व आशिष पवार यांच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ तेव्हा आभिजित शिंदे यांचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़
या बाचाबाचीचा राग मनात धरून आकाश डोके हातात बांबू घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यात बांबूने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबूने मारहाण केली़ ते पाहून शिंदे पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलावून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबूने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़

Web Title: College youth murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.