आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिला - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 29, 2014 09:11 AM2014-09-29T09:11:11+5:302014-09-29T12:33:29+5:30

केंद्रातील मंत्रीपदाच्या गुळाच्या आशेने भीमशक्तीला अंधारात ठेवून रामदास आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Athavalee Ambedkar roused people - Uddhav Thackeray | आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिला - उद्धव ठाकरे

आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिला - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ -  केंद्रातील मंत्रीपदाच्या गुळाच्या आशेने भीमशक्तीला अंधारात ठेवून रामदास आठवलेंनी आंबेडकरी जनतेला दगा दिल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली असतानाही भाजपात गेलेल्या रामदास आठवले यांचा 'सामना'च्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. आठवल्यांच्या हातात चणे-फुटाणे म्हणून विधानसभेच्या सात-आठ जागा ठेवण्यात आल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे. मात्र आठवले भाजपाच्या तंबूत घुसले असले तरीही आंबेडकरी जनता महाराष्ट्रहितासाठी शिवशक्तीबरोबरच राहणार असल्याचे सांगत उद्धव यांनी सर्व जनता आपल्यासोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 
जे लोक आज आठवल्यांच्या पायाशी कमळपाकळ्यांचे सडे पाडत आहेत तेच लोक आठवल्यांना पाहून दरवाजे धाडकन बंद करून घेत होते. आठवले व त्यांची भीमशक्ती हे शिवसेनेचे लोढणे आहे. आम्ही का गळ्यात बांधायचे?’’ या राजकीय हेतूने समस्त भाजप परिवार आठवल्यांचे तोंड दिसताच रस्ताच बदलत होते ना? असा सवालही लेखात करण्यात आला आहे. अशा गोंधळी नेतृत्वामुळेच आंबेडकर महाराष्ट्रात जन्मास येऊनही त्यांच्या विचारांची वाट लागली असे टीकास्त्रही लेखात सोडण्यात आले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात:
 
- नवा सौदा असा झालेला दिसतो की, आठवले यांना केंद्रात मंत्रीपदाचा चोथा दिला जाईल व भाजपची सत्ता आलीच तर सत्तेत १० टक्के वाटा दिला जाईल! बाकी विधानसभेच्या ७-८ जागा चणे-फुटाणे म्हणून त्यांच्या हाती ठेवल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हणे हा गूळ लावला व आठवले यांनी भीमशक्तीला अंधारात ठेवून आंबेडकरी जनतेला दगा दिला.
 
- "माझे मंत्रीपद प्यारे. त्यासाठी मी काहीही करीन. मंत्रीपद नसेल तर जनतेची सेवा कशी करू?’’ असा प्रबळ विचार पुन्हा एकदा रामदास आठवल्यांनी दिला, पण हा दिव्य विचार त्यांच्या समर्थकांना तरी मान्य आहे काय? मुळात शिवशक्तीबरोबर भीमशक्ती यावी व महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडावी हा मूळ विचार शिवसेनाप्रमुखांचा. महाराष्ट्राची फक्त दोनच दैवते - एक छत्रपती शिवराय व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विचार बाळासाहेबांचा! ‘‘तुमचे धर्मांतर झाले असेल, पण रक्तांतर झालेले नाही. आपण सारे एक आहोत. आपले रक्त एक आहे. एकत्र येऊ आणि राज्याची सत्ता ताब्यात घेऊ’’ ही गर्जना बाळासाहेबांची. 
 
- आठवल्यांना मंत्रीपद देऊन भीमशक्तीचा मान राखावा असे भाजपातील एकाही पुढार्‍याला वाटले नाही. उलट ‘‘राज्यसभा दिली तेच मोठे, आठवले व त्यांची भीमशक्ती हे शिवसेनेचे लोढणे आहे. आम्ही का गळ्यात बांधायचे?’’ या उदात्त राजकीय हेतूने समस्त भाजप परिवार आठवल्यांचे तोंड दिसताच रस्ताच बदलत होते ना? 
 
- मुळात आठवल्यांना राज्यसभा देण्यासाठी त्यांची इतकी खळखळ होती की विचारता सोय नाही, पण आम्हीच तेव्हा आठवले यांच्यासाठी अहमदाबाद येथे मोदींना व दिल्लीत राजनाथ सिंह यांना जाऊन भेटलो व मोदी यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर महाराष्ट्रातील भीमशक्तीस बळ देणे गरजेचे आहे व आठवले यांना राज्यसभा देण्याची गरज असल्याचे निक्षून सांगितले.
 
- आज जे लोक आठवल्यांच्या पायाशी कमळपाकळ्यांचे सडे पाडत आहेत तेच लोक आठवल्यांना पाहून दरवाजे धाडकन बंद करून घेत होते, पण काळाचा महिमा अगाध आहे. आठवले आज त्यांच्याच दारात बसून मंत्रीपदाचे सौदे करतात. आंबेडकर महाराष्ट्रात जन्मास येऊनही त्यांच्या विचारांची वाट लागली ती अशाच गोंधळी नेतृत्वामुळे. 
 
-  हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे तसा तो बाळासाहेबांचा व बाबासाहेबांचा आहे. असा महाराष्ट्र घडविण्याची संधी आठवले यांनी गमावली त्याबद्दल दु:ख व्यक्त करावे की दिल्लीश्‍वरांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवून तंबूत घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे? तूर्तास आम्ही आठवलेंना शुभेच्छा देतो व भीमशक्ती आजही शिवशक्तीबरोबर राहिल्याबद्दल त्या विराट निळ्या सागराचे अभिनंदन करतो
 

Web Title: Athavalee Ambedkar roused people - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.