शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची पदवी बोगस असल्याचा आरोप

By admin | Published: June 22, 2015 04:55 PM2015-06-22T16:55:29+5:302015-06-22T16:55:29+5:30

विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे.

The allegations of school education minister Vinod Tawde's degree are bogus | शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची पदवी बोगस असल्याचा आरोप

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची पदवी बोगस असल्याचा आरोप

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ - सध्या राजकीय नेत्यांच्या पदवीवरून रणधुमाळी माजलेली असताना, आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्रीच वादाच्या भोव-यात सापडले आहेत. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची इंजिनीअरिंगची पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून घेतलेली असून या विद्यापीठाला शासनमान्यता नव्हती त्यामुळे तावडे यांची डिग्रीच बोगस होती असा आरोप होत आहे.
खुद्द तावडे यांनीही आपली डिग्री शासनमान्य नसल्याचे सांगताना, प्रतिज्ञापत्रात ही पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, त्यामुळे यात कुठलीही फसवणूक केलेली नाही असा दावा केला आहे. मात्र, ज्या विद्यापीठाला शासनमान्यता नाही, अथवा ज्या पदवीला मुंबई वा पुणे अथवा तत्सम अधिकृत विद्यापीठाचीच मान्यता नाही ते शिक्षण मूळातच पदवी म्हणवून घेऊ शकते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आत्तापर्यंत स्मृती इराणी, जितेंद्र तोमर, छगन भुजबळ, बबन लोणीकर अशा अनेक नेत्यांच्या पदवीवरून आणि त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावरून बराच गदारोळ माजला आहे. आता खुद्द महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्रीच पदवीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत.
 
दरम्यान, विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे. मला त्याचा गर्व आहे. त्या विद्यापीठात मी घेतलेली पदवी कधीही लपवलेली नाही. माझ्या प्रतिज्ञापत्रात ही पदवी मी स्पष्टपणे लिहिलेली आहे.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळावा म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे यांच्या सप्रे व इतर सरांनी एक ब्रिज कोर्स सुरु केला होता. या कोर्सला मी १९८० मध्ये प्रवेश घेतला. हा कोर्स अर्धवेळ शिक्षण व अर्धवेळ इंटर्नशिप ऐसा होता. मी १९८४ ला हा कोर्स करून पास झालो. 
सदर कोर्सला शासन मान्यता नाही हे मला प्रवेश घेताना सांगण्यात आले होते. त्याच्या जोडीला अशी मान्यता आम्ही घेणार नाही ही सप्रे सर व इतरांची भूमिका होती. जी मला माहिती होती व मान्यही होती.
पुढे कालांतराने मनोहर जोशी ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यानंतर जोशी यांचे कुणी विरोधक कोर्टात गेल्याने सदर कोर्सवर कोर्टाकडून बंदी आली व विद्यापीठाने तो कोर्स तात्काळ बंद केला.
या कोर्सला शासन मान्यता नसल्याने मी कधीही पासपोर्टसाठी पदवीधारकांना असणारे लाभ घेतलेले नाहीत. ना मी कधी स्वतःची पदवीधारक मतदार म्हणून  नोंदणी केली आहे. या कोर्स शिवायचे माझे शिक्षण १२वी पास इतके आहे व ते मी लपवलेले नाही असेही तावडे यांनी सांगितले आहे.

Web Title: The allegations of school education minister Vinod Tawde's degree are bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.