पोलिसांच्या ९० जागांसाठी १४,०३३ अर्ज

By admin | Published: March 31, 2016 02:40 AM2016-03-31T02:40:14+5:302016-03-31T02:40:14+5:30

पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पदपथ व इतर मोकळ्या जागांवर मुक्काम केला आहे.

14,033 applications for 90 seats for the police | पोलिसांच्या ९० जागांसाठी १४,०३३ अर्ज

पोलिसांच्या ९० जागांसाठी १४,०३३ अर्ज

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पदपथ व इतर मोकळ्या जागांवर मुक्काम केला आहे. मुलांना पाणी, जेवणही मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील सुशिक्षित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोकरीच नसल्याने उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ७८ व तळोजा जेलसाठी १२ अशा ९० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी मुंबई, नवी मुंबईसह लातूर, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल १४,०३३ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारपासून या उमेदवारांची उंची व कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयामध्ये रोज २ हजार तरुणांची चाचणी घेतली जात आहे. उंची मोजणे व कागदपत्रे तपासण्यासाठीच आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. आपला नंबर लवकर यावा यासाठी तरुणांनी मुख्यालयाच्या बाहेर गर्दी केली आहे. पहाटेपासूनच तरुण येथे येवून थांबत आहेत. अनेकांनी रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी वास्तव्य केले आहे. दिवसभर पदपथ, रस्त्याचा दुभाजक व जिथे जागा मिळेल तिथे ठाण मांडले आहे. केळी, वडापाव व इतर जे खाद्यपदार्थ मिळतील ते खावून दिवसभर नंबरची वाट पहात आहे. प्रचंड गरमी सुरू असल्याने घशाला कोरड पडत असून पिण्यासाठी चांगले पाणीही मिळत नाही. कडक उन्ह व दिवसभराची रखडपट्टी यामुळे तरुणांची प्रकृती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी भरती केंद्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी नाष्टा, पाणी व गरमीपासून सुटका होण्यासाठी तंबू ठोकले आहेत. परंतु भरती केंद्राच्या बाहेरील तरुणांसाठी काहीच सुविधा उपलब्ध नाहीत.
पोलीस भरतीच्या रांगेत उच्च शिक्षितांची संख्या जास्त आहे. बी. ए. बी.एड व डी. एड., पदवीधारक तरुणही नोकरी नसल्याने पोलीस भरतीसाठी आले आहेत. कला शाखेतून पदवी घेतलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे. खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातूनही मुले या ठिकाणी आली आहेत. अनेक जणांनी पोलीस भरतीसाठीचे प्रशिक्षण घेतलेले आहे तर बहुतांश तरुण नोकरी नसल्याने भरतीसाठी आले आहेत. फक्त ९० जागा असून उमेदवारांची संख्या १४ हजार ३३ असल्याने आपला नंबर लागणार का याविषयी अनेकांना शंका वाटू लागली आहे. रोज दोन हजार मुलांची कागदपत्रे व उंची तपासली जात आहे. यामध्ये पात्र ठरणाऱ्या तरुणांची मैदानी व नंतर लेखी चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

उन्हामुळे आरोग्य धोक्यात ...
उकाडा सुरू असल्याने पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची प्रचंड गैरसोय होत आहे. पदपथ, दुभाजक, मोकळे भूखंड जिथे जागा मिळेल तिथे उमेदवारांनी ठाण मांडले आहे. पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी चांगले अन्नही मिळत नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी मुंबईमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांचा मृत्यू झाला होता. यावेळीही तापमान वाढलेले असल्यामुळे भरतीसाठी आलेल्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा...
भरतीसाठी आलेल्या तरुणांची गैरसोय होवू नये यासाठी भरती केंद्रामध्ये चोख व्यवस्था केली आहे. मुलांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी तंबू उभारले आहेत. मुलांसाठी पाणी, नाष्टा याचीही व्यवस्था केली आहे. भरती केंद्राच्या बाहेरील हजारो तरुणांसाठी काहीच व्यवस्था नाही. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी या मुलांना बाटलीबंद पाणी, फळे उपलब्ध करून दिली तर त्यांना मोठा आधार मिळू शकतो. बाहेरील खाद्यपदार्थ व पाण्यामुळे आरोग्य बिघडू शकते, असे मत उमेदवारांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्तालयामध्ये ७८ व जेलसाठीचे १२ अशा ९० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण १४ हजार ३३ अर्ज आले असून रोज दोन हजार उमेदवारांची उंची व कागदपत्रे तपासली जात आहेत. भरती केंद्राच्या बाहेरील कोणासाठी मदत देता येत नाही, मात्र केंद्रात येणाऱ्या सर्वांची योग्य काळजी घेतली जात आहे. मुलांसाठी पाणी, नाष्ट्याची सोय केली आहे. उन्हाचा त्रास होवू नये यासाठी तंबू उभारले असून कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
- प्रशांत खैरे, पोलीस उपायुक्त

Web Title: 14,033 applications for 90 seats for the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.