Kolhapur: लिफ्ट दुरुस्त करताना कोसळून दोघे ठार; उचगाव येथील मसुटे मळ्यातील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:41 AM2024-05-09T11:41:38+5:302024-05-09T11:41:54+5:30

दुर्घटनेनंतर इमारत मालकाला धक्का

Two killed in elevator repair collapse; Accident at Masute farm in Uchgaon kolhapur | Kolhapur: लिफ्ट दुरुस्त करताना कोसळून दोघे ठार; उचगाव येथील मसुटे मळ्यातील दुर्घटना

Kolhapur: लिफ्ट दुरुस्त करताना कोसळून दोघे ठार; उचगाव येथील मसुटे मळ्यातील दुर्घटना

कोल्हापूर/गांधीनगर : उचगाव येथील मसुटे मळ्यात कमल परफ्यूम स्टोअर्सच्या गोडाऊनमधील लिफ्टची दुरुस्ती करताना हूक तुटून लिफ्ट कोसळल्याने दोन कर्मचारी ठार झाले. किशोर बाबू गायकवाड (वय ६३, रा. मणेर माळ, उचगाव, ता. करवीर) आणि महेश जेम्स कदम (वय ४७, रा. राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. मदतनीस सचिन महादेव सुतार (वय ४५, रा. टोप, ता. करवीर) हे सुदैवाने बचावले. बुधवारी (दि. ८) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मसुटे मळा येथे महेंद्रसिंह राजपुरोहित यांच्या मालकीचे कमल परफ्यूम स्टोअर आहे. याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर त्यांचे गोडाऊन आहे. इमारतीमधील मालवाहतूक लिफ्ट गेल्या महिन्यापासून बंद होती. तिच्या दुरुस्तीसाठी महेश कदम, किशोर गायकवाड आणि सचिन सुतार हे तिघे बुधवारी सकाळी गेले होते.

दुपारचे जेवण आटोपून तीनच्या सुमारास पुन्हा दुरुस्तीचे काम करताना गायकवाड आणि कदम हे तिसऱ्या मजल्यावर लिफ्टच्या वर बसले होते. सुतार हे लिफ्टच्या बाहेर थांबून मदत करीत होते. त्याचवेळी हूक तुटून लिफ्ट खाली कोसळली. लिफ्ट खाली आदळून दोघांच्या डोक्याला आणि पायांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने गायकवाड यांना कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात पाठवले, तर कदम यांना सीपीआरमध्ये पाठवले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

दुर्घटनेची माहिती मिळताच गायकवाड आणि कदम यांच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. गांधीनगर येथील व्यापारीही मोठ्या संख्येने सीपीआरमध्ये पोहोचले होते. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये पोहोचून माहिती घेतली. रात्री उशिरा गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

दुर्घटनेनंतर इमारत मालकाला धक्का

दुर्घटना घडताच कमल परफ्यूम स्टोअर्सचे मालक राजपुरोहित यांना धक्का बसला. चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फॅब्रिकेशनचे काम करणारे महेश कदम यांनीच पाच वर्षांपूर्वी लिफ्ट बसवली होती.

मृतांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

कदम आणि गायकवाड हे दोघे फॅब्रिकेशनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. प्रामाणिक आणि कष्टाळू वृत्तीमुळे त्यांची व्यवसायात चांगली ओळख होती. दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. कदम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लिफ्टची दुरुस्ती करताना हेल्मेट वापरणे, कर्मचाऱ्यांसाठी दोरखंड वापरणे, मजबूत साखळीने लिफ्ट बांधून ठेवणे अशा सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या महिन्यात बापट कॅम्प येथे मूर्ती कारखान्यात लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला होता. सलग दुसऱ्या महिन्यात लिफ्टची दुर्घटना घडल्यामुळे सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Web Title: Two killed in elevator repair collapse; Accident at Masute farm in Uchgaon kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.