चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, २८ तोळे सोन्यासह कार, दुचाकी जप्त

By उद्धव गोडसे | Published: May 9, 2024 04:24 PM2024-05-09T16:24:35+5:302024-05-09T16:26:34+5:30

बिअर शॉपीच्या परवान्यासाठी मागितली लाखाची लाच, कारवाईची खबर लागताच अधीक्षक पाटील कोल्हापुरातून पसार

Chandrapur State Excise Superintendent Sanjay Patil house raided in Kolhapur, car, two-wheeler seized with 28 tola gold | चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, २८ तोळे सोन्यासह कार, दुचाकी जप्त

चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कोल्हापुरातील घरांवर छापे, २८ तोळे सोन्यासह कार, दुचाकी जप्त

कोल्हापूर : चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४, मूळ रा. आर. के. नगर, कोल्हापूर) यांनी बिअर शॉपीला परवानगी देण्यासाठी कार्यालयातील कर्मचा-यांकरवी तक्रारदाराकडून लाखाची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर पथकाने मंगळवारी (दि. ७) सापळा रचून कारवाई केल्यानंतर अधीक्षक पाटील पसार झाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने पाटील यांच्या कोल्हापुरातील तीन घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईत पथकाने पाटील यांच्या घरातून २८ तोळे सोन्याचे दागिने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या. वरिष्ठ अधिका-यावर झालेल्या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर येथील एका व्यावसायिकाने बिअर शॉपीचा परवाना मिळण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, त्याला परवानगी देण्यास अधिका-यांनी टाळाटाळ केली. अखेर व्यावसायिकाने उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे याच्याशी संपर्क साधून अर्ज मंजूर करण्याची विनंती केली.

त्यावर खारोडे याने अर्ज मंजुरीसाठी अधीक्षक पाटील यांच्यासह इतर अधिका-यांसाठी एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी लावलेल्या सापळ्यात खारोडे लाखाची लाच घेताना रंगेहाथ सापडला. पथकाने खारोडे याच्यासह कार्यालय अधीक्षक अभय खताळ या दोघांना अटक केली. मात्र, कारवाईची माहिती मिळताच अधीक्षक पाटील पसार झाले.

तीन घरांवर छापेमारी

चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विनंतीनुसार कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. उपअधीक्षक सरदार नाळे, निरीक्षक बापू साळोखे आणि आसमा मुल्ला यांच्या पथकांनी आर. के. नगर, शिवाजी पेठेतील काळकाई गल्ली आणि शिरदवाड (ता. शिरोळ) येथील घरांची झडती घेतली.

शिरदवाड येथील घर वडिलोपार्जित आहे. शिवाजी पेठेतील घर भावाच्या नावावर आहे, तर आर. के. नगरातील घर संजय पाटील यांच्या नावावर आहे. या घरातून २८ तोळे सोने, एक अलिशान कार आणि दोन दुचाकी पथकाने जप्त केल्या. बंगल्याची किंमत सुमारे ८० लाख रुपये आहे. झडतीचा अहवाल गुरुवारी (दि. ९) चंद्रपूर कार्यालयाला पाठवल्याची माहिती उपअधीक्षक नाळे यांनी दिली.

Web Title: Chandrapur State Excise Superintendent Sanjay Patil house raided in Kolhapur, car, two-wheeler seized with 28 tola gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.