केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 08:28 AM2024-03-28T08:28:16+5:302024-03-28T08:28:59+5:30

केट मिडलटन आणि किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरच्या निमित्तानं अनेक नव्या - जुन्या घटनांना लोक उजाळा देताहेत. पण, या घराण्याविषयी लोकांना तितकंच प्रेमही आहे

Kate Middleton, Princess of Wales, diagnosed with cancer | केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची!

केट मिडलटनला कॅन्सर; पण लोकांत चर्चा पूर्वेतिहासाची!

ब्रिटिश राजघराणं सध्या बिकट अवस्थेतून जात आहे. दोन महिन्यांपूर्वीच किंग चार्ल्स यांना कॅन्सर झाल्याची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. राजघराणंही त्यामुळे चिंतित होतं. या घटनेमुळे निर्माण झालेली चिंता आणि त्यासंदर्भातल्या बातम्या थोड्या विरत नाहीत, तोच पुन्हा एक तशीच बातमी आली. प्रिन्स विल्यम यांची पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनाही कॅन्सर झाल्याच्या बातमीने स्वत: केट यांच्यासह अनेकांना धक्का बसला. स्वत: केट यांनीच ही बातमी माध्यमांना दिली. जानेवारी २०२४मध्ये केट यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया झाली होती. दोन आठवडे त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यानंतर त्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा सार्वजनिक व्यासपीठावर दिसल्या नव्हत्या.

सार्वजनिक जीवनातून त्या एकदम गायब का झाल्या, याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती, त्यांच्या तब्येतीवरूनही अनेक प्रश्न विचारले जात होते आणि त्यानंतर थेट त्यांना कॅन्सर झाल्याची बातमीच जाहीर झाली. केट यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाल्यापासून बकिंगहॅम पॅलेसच्या आपल्या ऑफिशिअल ड्युटीवर त्या दिसल्या नव्हत्या. केट कुठेच दिसत नाहीत म्हटल्यावर सोशल मीडियावर ‘व्हेअर इज केट’ हा हॅशटॅगही ट्रेंड व्हायला लागला होता. ब्रिटिश राजघराणं असंही कायम जगभरात चर्चेत असतं. या राजघराण्यात कुठे, काय चालू आहे, याबाबत अख्ख्या जगालाच कायम उत्कंठा असते. आता तर राजघराण्यातील एकदम दोन जणांना कॅन्सर झाल्याच्या चर्चेनं हे घराणं आणि त्यांचे सदस्य पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यात सध्या केट आघाडीवर आहेत. त्यांच्याविषयीचे किस्से, कहाण्या आणि वाद पुन्हा सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.

ब्रिटनच्या शाही परिवाराच्या अतिशय जवळचे मानले जाणारे टॉम क्विन यांनी ‘गिल्डेड यूथ : एन इंटिमेट हिस्ट्री ऑफ ग्रोइंग अप इन द रॉयल फॅमिली’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. काही महिन्यांपूर्वीच ते प्रकाशित झालं. त्यात त्यांनी दावा केला आहे की प्रिन्सेस डायना यांची सून केट मिडलटन शाही राजघराण्यात लग्न करीत असल्यामुळे लग्नापूर्वी म्हणजे २०११मध्ये त्यांना ‘फर्टिलिटी टेस्ट’ म्हणजे त्या आई होऊ शकतील की नाही, याबद्दलची मेडिकल टेस्ट द्यावी लागली होती. केट शाही परिवारातील नसल्यामुळेच त्यांना या ‘परीक्षे’ला सामोरं जावं लागलं होतं. या पुस्तकात प्रिन्सेस डायना आणि केट मिडलटन यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, १९८१ मध्ये ज्यावेळी प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचा विवाह झाला, त्यावेळी डायना यांनाही अशाच प्रकारची फर्टिलिटी टेस्ट द्यावी लागली होती. त्याचंही कारण हेच. त्या शाही राजघराण्यातल्या नव्हत्या! या पुस्तकावरून आणि राजघराण्यातल्या नसल्यामुळे डायना आणि केट या दोघी सासू-सुनांना फर्टिलिटी टेस्ट द्याव्या लागल्याच्या मुद्द्यावरून सध्या ब्रिटनमध्ये चर्चेला तोंड फुटलं आहे. 

एखादी गोष्ट चर्चेत असली की मग त्यासंदर्भात इतरही गोष्टींच्या बाबतीत शिळ्या कढीला ऊत आणला जातो. केट यांच्याबाबत दुसरी एक घटना घडली होती ती २०१२मध्ये. पण, त्यावरूनही सध्या सोशल मीडियावर मोहोळ उठलं आहे. प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडलटन यांचा एक टॉपलेस फोटो एका फ्रेंच मासिकात छापून आला होता. शाही परिवार त्यामुळे खूपच नाराज झाला होता. खुद्द प्रिन्स विल्यम यांनीही या घटनेचं वर्णन त्यावेळी ‘दु:खद’ असं केलं होतं. याच प्रकरणावरून त्या मासिकाशी संबंधित सहा जणांवर त्यावेळी खटलाही भरण्यात आला होता. केटच्या तोटक्या कपड्यांचा वादही वेळोवेळी ब्रिटनमध्ये चर्चेचा मुद्दा बनला होता आणि मीडियानंही त्यावेळी राजघराण्याचं वाभाडं काढलं होतं. पण, राजघराण्यानं त्यावेळी गप्प बसणंच पसंत केलं होतं.त्यांच्याबाबतीत अलीकडचा आणखी एक किस्सा आहे. प्रिन्स विल्यम आणि केट २०२२मध्ये कॅरेबियन देशांच्या टुरवर गेले होते. तिथल्या फुटबॉलच्या ग्राउंडवर शाही हेलिकॉप्टर लँड करण्यात आल्यानं गावकरी आणि गावातले तरुण नाराज झाले होते. लोकांनी याचा निषेध तर केलाच, पण गावात लगोलग पोस्टर लागले, ‘ही जागा रॉयल फॅमिलीची नाही, मुलांचं मैदान खराब करण्याचा शाही राजघराण्याला कोणताही अधिकार नाही!’

आमचं आम्हाला लढू द्या! 
केट मिडलटन आणि किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरच्या निमित्तानं अनेक नव्या - जुन्या घटनांना लोक उजाळा देताहेत. पण, या घराण्याविषयी लोकांना तितकंच प्रेमही आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीविषयी लोकही तितकेच चिंतित आहेत आणि ते लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करीत आहे. खुद्द केट आणि किंग चार्ल्स यांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलं आहे, ‘खूप आभार, पण या कठीण काळाचा सामना आमचा आम्हाला करू द्या!’

Web Title: Kate Middleton, Princess of Wales, diagnosed with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.