इस्लामिक स्टेटने केला अमेरिकेत पहिला हल्ला

By admin | Published: May 5, 2015 11:59 PM2015-05-05T23:59:24+5:302015-05-05T23:59:24+5:30

प्रेषित मोहंमद यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्यंगचित्र स्पर्धेच्या आयोजनस्थळी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने मंगळवारी स्वीकारली.

Islamic State first attacked in America | इस्लामिक स्टेटने केला अमेरिकेत पहिला हल्ला

इस्लामिक स्टेटने केला अमेरिकेत पहिला हल्ला

Next

ह्युस्टन : प्रेषित मोहंमद यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्यंगचित्र स्पर्धेच्या आयोजनस्थळी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने मंगळवारी स्वीकारली. अमेरिकी मातीवरील हा पहिला हल्ला असून यापुढे अधिक घातक हिंसाचार घडवून आणण्यात येईल, अशी धमकी इराक व सिरियात थैमान घालणाऱ्या या संघटनेने दिली.
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील गारलँड शहरात आयोजित व्यंगचित्र प्रदर्शनावर खलिफातच्या दोन सैनिकांनी हल्ला केला, असे इस्लामिक स्टेटने सिरियातील आपल्या अल-बायन रेडिओवरून सांगितले. जगभरातील कट्टरवादी गटांचे निरीक्षण करणाऱ्या ‘साईट’ या गुप्तचर गटाने ही माहिती दिली.
गारलँडमध्ये आयोजित व्यंगचित्र स्पर्धेच्या ठिकाणी कारमधून आलेल्या दोघांनी सुरक्षा अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे दोघे मारले गेले होते. या घटनेनंतर गोळीबाराचा संबंध व्यंगचित्र स्पर्धेशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र त्याची शहानिशा होऊ शकली नव्हती. इसिसने जबाबदारी स्वीकारल्यामुळे हा हल्ला व्यंगचित्र स्पर्धेवरूनच झाल्याचे स्पष्ट झाले.
‘इस्लामिक स्टेटचे इतर सैनिक अमेरिकेला लक्ष्य करतील व त्यांचे हल्ले अधिक भीषण व घातक असतील’, अशी धमकी इस्लामिक स्टेटने आपल्या रेडिओ संदेशात दिली; मात्र इस्लामिक स्टेटने या दोन हल्लेखोरांशी कशाप्रकारे संपर्क साधला किंवा दिशानिर्देश दिले याचा उल्लेख या संदेशात नाही.
व्यंगचित्र स्पर्धेच्या आयोजनस्थळी हल्ला करणारे हे दोघे बंदूकधारी अ‍ॅरिझोनातील फिनिक्सचे रहिवासी आहेत. इल्टन सिम्पसन (३१) व नादीर सूफी (वय ३४) अशी त्यांची नावे असून ते एकत्र राहत होते, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. हल्ल्यापूर्वी केलेल्या एका टष्ट्वीटमध्ये सिम्पसन याने स्वत:चा संबंध इस्लामिक स्टेटशी जोडला होता, असे सरकारी सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले. केंद्रीय अधिकारी सिम्पसन राहत असलेल्या अपार्टमेंटची झडती घेत आहेत, असे एका एफबीआय अधिकाऱ्याने सांगितले.
आंतरराष्ट्रीय व घरगुती दहशतवादाबाबत खोटे बोलल्याप्रकरणी सिम्पसनला दोषी ठरविण्यात आले होते. दहशतवादाच्या संशयावरून त्याची चौकशी करण्यात आली होती. तो २००६ पासून निगराणीखाली होता. सोमालियातील जिहादमध्ये सहभागी होण्याच्या इच्छेबाबत एफबीआय एजंटला खोटे बोलल्याबद्दल २०१० मध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले होते.

Web Title: Islamic State first attacked in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.