वाचनीय : जानी दोस्त असे झाले जानी दुश्मन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:34 AM2024-04-16T06:34:29+5:302024-04-16T06:36:00+5:30

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपण्याऐवजी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

Instead of ending, the conflict between Israel and Hamas is intensifying day by day | वाचनीय : जानी दोस्त असे झाले जानी दुश्मन! 

वाचनीय : जानी दोस्त असे झाले जानी दुश्मन! 

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष संपण्याऐवजी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात आता अणुबॉम्बचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धांचा जगावर परिणाम झाला नसता तरच नवल! या युद्धात आणखी कोणी पडणार नाही आणि लवकरच ही युद्धं थांबतील, अशी आशा वर्तवली जात होती; पण होतंय ते उलटंच. आता तर इस्रायल आणि इराण यांच्यातच जुंपली आहे. इराणने शनिवार- रविवारी इस्रायलवर ३००पेक्षा जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.  इराणचे ९९ टक्के ड्रोन आणि क्षेपणास्त्रं आम्ही हवेतल्या हवेतच नष्ट केली असं इस्त्रायलचं म्हणणं आहे.

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील या नव्या संघर्षामुळे जग पुन्हा एकदा दोन गटांत विभागलं गेलं आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे, इस्त्रायलनं जर इराणवर प्रतिहल्ला केला, तर आम्ही इस्त्रायलची साथ देणार नाही. त्याचवेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की इराण आणि इस्त्रायल यांच्या संघर्षात अमेरिकेने कुठल्याही प्रकारे नाक खुपसू नये. अमेरिका जर इस्त्रायलच्या बाजूनं उभी राहिली तर आम्ही हातावर हात ठेऊन गप्प बसणार नाही. आम्ही उघडपणे इराणच्या बाजूनं उभे राहू आणि इराणचं समर्थन करू. याआधी रशियानं इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं होतं.  

पण मुख्य गोष्ट म्हणजे गेली काही वर्षे इराण आणि इस्रायल यांच्यातून विस्तव जात नसला, दोघेही देश एकमेकांना पाण्यात पाहत असले तरी कधीकाळी हे दोन्ही देश एकमेकांचे चांगले मित्र होते. मग त्यांच्यातील ही दोस्ती दुश्मनीत बदलली तरी कशी, याविषयीची कहाणी मात्र अतिशय रोमांचक आहे. 

अरब देशांच्या मोठ्या विरोधानंतर आणि तीव्र संघर्षानंतर १९४८मध्ये मध्य पूर्वेत इस्रायलच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. अनेक देशांनी इस्रायलला मान्यता दिली, पण असेही अनेक देश होते, ज्यांनी इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली नाही. मध्य पूर्वेतील बहुतांश अरब राष्ट्रांचा याला अर्थातच विरोध होता. असे असतानाही तुर्की या मुस्लिम राष्ट्रानं पहिल्यांदा आणि त्यानंतर इराणनं १९४८मध्येच इस्रायलला मान्यता दिली! अनेक मुस्लिम राष्ट्रांसाठी हा धक्का होता. अशा रीतीनं इस्रायलच्या जन्मापासूनच इराण आणि इस्रायल यांच्यातील दोस्तीचा सिलसिला सुरू झाला! या दोघांमधील दोस्ती आणखी वाढली, जेव्हा अमेरिकेने एका गुप्त ऑपरेशनद्वारा इराणमध्ये आपलं कठपुतली सरकार स्थापन केलं! 

१५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत जेव्हा आपला सहावा स्वातंत्र्यदिवस साजरा करत होता, त्याचवेळी अमेरिकन गुप्तचर संस्था इराणमधील एक लोकनियुक्त सरकार पाडायचा प्रयत्न करीत होती. इराणी लष्कराचा जनरल फललुल्लाह जाहेदीचा यात हात होता. इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोसादेग यांना ही खबर मिळताच ते सतर्क झाले आणि त्यांनी आंदोलकांना अटक करून हे बंड मोडून काढलं. जाहेदीलाही देश सोडून पळून जावं लागलं. अमेरिकेचा हा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरही त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र त्यांचा हा डाव यशस्वी झाला. मोहम्मद मोसादेग यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचं लोकनियुक्त सरकार पडलं. त्यानंतर इराणची सत्ता शाह रजा पहलवी यांच्या हातात आली. 

इथपर्यंतही सारं काही ठीक होतं, इस्रायल आणि इराण यांच्यातील दोस्ती कायम होती; पण याच सुमारास इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांचा उदय होत होता. त्यांना इराणला मुस्लिम राष्ट्र बनवायचं होतं. त्याला शाह यांचा विरोध असल्यानं त्यांनी खोमेनी यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. खोमेनी यांचा दबदबा इतका की, त्यांनी देशाबाहेर, इराकमध्ये राहून इराणमध्ये मोठं आंदोलन उभं केलं. झपाट्यानं लोक त्यांच्या बाजूनं झाले आणि या आंदोलनानं एका इस्लामिक क्रांतीचं रूप घेतलं. शाह रजा पहलवी यांना देश सोडणं भाग पडलं. इराणमध्ये अयातुल्ला खोमेनी यांचं राज्य सुरू झालं. इस्रायल आणि इराणच्या दोस्तीची कहाणीही इथेच संपली.

‘बडा शैतान’ आणि ‘छोटा शैतान’! 
सन १९७९मध्ये खोमेनी इराणमध्ये परतताच त्यांनी इराणला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केलं. देशात शरिया कायदा लागू केला. इस्रायलशी असलेले सारे संबंध त्यांनी तोडले. अमेरिका आणि तिचे सहयोगी देश आपले शत्रू आहेत असं जाहीर केलं. इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रवास बंद केला. एकमेकांच्या देशात जाणारे हवाईमार्ग बंद केले. इराणमधल्या इस्रायली दूतावासाचं रूपांतर पॅलेस्टिनी दूतावासात केलं. अमेरिका हा ‘बडा शैतान’ तर इस्रायल हा ‘छोटा शैतान’ असल्याचं खुलेआम जाहीर केलं!

Web Title: Instead of ending, the conflict between Israel and Hamas is intensifying day by day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.