आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल!

By admin | Published: July 6, 2017 02:22 AM2017-07-06T02:22:27+5:302017-07-06T02:22:27+5:30

व्यापार आणि उद्योगांमध्ये ‘आय’ म्हणजे ‘आय’. पण मी आय म्हणजे इंडिया आणि आय म्हणजे इस्रायल असे संबोधू इच्छितो. म्हणजे

I for India, I for Israel! | आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल!

आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल!

Next

जेरुसलेम : व्यापार आणि उद्योगांमध्ये ‘आय’ म्हणजे ‘आय’. पण मी आय म्हणजे इंडिया आणि आय म्हणजे इस्रायल असे संबोधू इच्छितो. म्हणजे इंडिया इस्रायलसोबत आणि इंडिया इस्रायलसाठी असा त्याचा अर्थ होतो, असा मैत्रीचा नवा मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिवलीन यांची भेट घेतल्यानंतर घोषित केला.
मोदी आणि रिवलीन यांच्या द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चाही झाली. तसेच रिवलीन यांनी नोव्हेंबरमध्ये भारतात आल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला. मोदी म्हणाले की, ‘‘राष्ट्रपती रिवलीन यांनी स्वत: रस्त्यावर येऊन माझे स्वागत करणे हा माझा सन्मान नाही तर सव्वाशे कोटी भारतीय जनतेचा सन्मान आहे.’’
मोदी यांनी रिवलीन यांच्या निवासस्थानी असलेल्या गेस्टबुकमधील संदेशात लिहिले की, ‘‘रिवलीन यांची भेट अत्यंत उत्साहवर्धक होती. त्यांनी नोव्हेंबरमध्ये केलेल्या भारत दौऱ्याची यावेळी आवर्जून आठवण होते. भारतासाठी बरेच काही करण्याची त्यांनी व्यक्त केलेली मनिषा आणि त्यांच्या आदरातिथ्याने मी भारावून गेलो आहे.’’
यावेळी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मेक इन इंडिया’ योजना आणखी सक्षम बनविण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.
रिवलीन म्हणाले की, मोदी जगातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. दोन्ही देशांमध्ये बरेच साम्य आहे आणि दोन्ही देश एकमेकांना मदत करतील. तुमच्या ‘मेक इन इंडिया’च्या कल्पनेसाठी आम्हीही बरेच काही करत आहोत. भारतासोबत करण्याच्या प्रकल्पांच्या शिफारसी आम्ही केल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये विद्यापीठ आणि उद्योगांच्या पातळीवर बरेच काही करण्यासारखे आहे. इस्रायलमधील लोकही भारतात गुंतवणूक करण्याच्या आणि एकत्र प्रकल्प राबविण्याच्या संधी आणि मार्ग शोधत आहेत.

रामानुजन हे भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक
प्रसिद्ध भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन हे भारतीयांच्या प्रतिभेचे प्रतीक आहेत, अशा शब्दांत नेत्यानाहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर गौरव केला. आम्ही भारतीयांचा खूप सन्मान करतो. मी आणि मोदी मिळून दोन्ही देशांच्या जनतेसाठी चांगल्या भविष्याची आकांक्षा बाळगतो आहे, असेही नेत्यानाहू म्हणाले.

द्विपक्षीस संबंधाचा नवा आध्याय
मोदी आणि नेत्यानाहू यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त गोपाल बागले यांनी टिष्ट्वट केले की, मोदी यांनी नेत्यानाहू यांच्याशी चर्चा करताना द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी नवा आध्याय सुरू करण्याचा विश्वास व्यक्त केला. नेत्यानाहू यांनीही भारतीय पंतप्रधानाने ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इस्रायलला भेट देण्याच्या या घटनेचा ऐतिहासिक असा उल्लेख केला.

फुलाला दिले "मोदी" नाव
मोदी आणि पंतप्रधान नेतान्याहू डँजिगर फ्लॉवर फार्म येथे पोहोचले. यावेळी भारतीय पंतप्रधानांच्या सन्मानार्थ इस्त्रायली क्रायसेंथेमन या फुलाला "मोदी" हे नाव देण्यात आले.
इस्त्रायली सरकारने कृषी क्षेत्रात वापरात असलेल्या उच्च तंत्रज्ञानाचे यावेळी प्रदर्शन केले. फुलांच्या शेतीसाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाविषयी मोदींना माहिती देण्यात आली.


नेत्यानाहू यांना दिली अनोखी भेट
मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना अनोखी भेट दिली. नेत्यानाहू यांच्यासाठी खास केरळच्या कोची शहरातून मोदी खास भेटवस्तू घेऊन गेले. त्यात ऐतिहासिक ठेवा असलेले दोन सेट होते. हे सेट ज्यू धर्माच्या भारतातील पुरातन इतिहासाशी संबंधित होते. नवव्या-दहाव्या शतकातील धार्मिक वस्तूंच्या या प्रतिकृती होत्या.
तांब्याच्या धातूची एक प्लेट कोची येथील ज्यू बांधवांच्या भारतातील इतिहासाची आठवण करून देणारी होती. हिंदू राजा चेरामन पेरूमल यांनी ज्यू नेते जोसेफ रब्बन यांना दिलेल्या अनुवंशिक अधिकारांचा या प्लेटवर उल्लेख आहे. हेच जोसेफ पुढे शिलगीचे राजकुमार म्हणून घोषीत झाले होते. कोचीमध्ये आजही ज्यूंचे सिनेगॉग हे धार्मिक स्थळ आहे.

इस्रायलमधील भारतीय खूश
मोदी यांचे इस्रायलमध्ये जंगी स्वागत झाल्याने तेथे राहणारे भारतीय खूश झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचेही अशा प्रकारचे स्वागत होताना आम्ही कधी पाहिले नव्हते, अशा भावना इस्रायलमधील भारतीयांनी व्यक्त केल्या. मूळ भारतीय असणारे आठ हजार ज्यू बांधव इस्रायलमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यात मुंबई, केरळ, कोलकाता आणि मणिपूर अशा भागांतील काही जण आहेत.

राजशिष्टाचार ठेवला बाजूला

1 मोदी जेव्हा तेल अविव येथे पोहोचले, त्या वेळी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू आपल्या ११ मंत्री आणि सरकारच्या ४० अधिकाऱ्यांसह तेथे जातीने हजर होते. अमेरिकेचे पंतप्रधान आणि पोप यांच्याशिवाय असे स्वागत आतापर्यंत कोणत्याच्या देशाच्या नेत्याचे झाले नव्हते.
2मोदी यांच्या स्वागतार्थ विमानतळावर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले गेले. शिवाय गार्ड आॅफ आॅनरही देण्यात आला.
3तीन दिवसांत मोदींनी १८ कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे, यातील १२ कार्यक्रमांमध्ये नेत्यानाहू सोबत असतील.
4इस्रायलमध्ये येणाऱ्या कोणत्याही देशाच्या नेत्यासोबत एक वेळा बैठक घेतात आणि एक वेळा भोजन करतात. मोदींसोबत मात्र ते दोन वेळा डिनर आणि दोनदा लंचही करणार आहेत.
5दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मोदींना निरोप देण्यासाठी स्वत: नेत्यानाहू आपल्या संपूर्ण कॅबिनेटसह विमानतळावर हजर राहणार आहेत.


मुंबई हल्ल्यात वाचलेला मोशे म्हणाला..
मोदी, आय लव्ह यू!


मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेला चिमुकला मोशे याचीही मोदींनी भेट घेतली. या भेटीने भारावून गेल्यानंतर मोशे म्हणाला, ‘पंतप्रधान मोदी आय लव्ह यू... माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर खूप प्रेम आहे.’ मोशेच्या भावपूर्ण शब्दांनंतर पंतप्रधान मोदींनी ‘हवे तेव्हा तू भारतात येऊ शकतो. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना दीर्घकाळाचा व्हिसा देण्यात येईल,’ असेही जाहीर केले.
२००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यावेळी मोशे अवघ्या दोन वर्षांचा होता. खाबाद हाउसवर झालेल्या हल्ल्यात मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते. मोशेची काळजी घेणारी दाई सँड्रा सॅम्युअल्स हिने त्याचे प्राण वाचविले होते. सँड्राच्या या धाडसी कृतीबद्दल इस्रायल सरकारने तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. सँड्रा सॅम्युअल्सही आता इस्त्रायलमध्येच राहतात.
 

Web Title: I for India, I for Israel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.