फ्रान्सवर पुन्हा अतिरेकी हल्ला; ट्रकखाली चिरडले ८४ निष्पाप

By admin | Published: July 16, 2016 03:48 AM2016-07-16T03:48:32+5:302016-07-16T03:48:32+5:30

फ्रान्सच्या नीस शहरात शुक्रवारी राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरू होता. याच वेळी अतिरेक्याने भरधाव ट्रक या गर्दीत घुसवला आणि २ किमीपर्यंत नागरिकांना चिरडत नेले

French terror strikes again 84 innocent in trucks crushed | फ्रान्सवर पुन्हा अतिरेकी हल्ला; ट्रकखाली चिरडले ८४ निष्पाप

फ्रान्सवर पुन्हा अतिरेकी हल्ला; ट्रकखाली चिरडले ८४ निष्पाप

Next

नीस : फ्रान्सच्या नीस शहरात शुक्रवारी राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरू होता. नागरिकांच्या प्रचंड गर्दीने परिसर फुलला होता. याच वेळी अतिरेक्याने भरधाव ट्रक या गर्दीत घुसवला आणि २ किमीपर्यंत नागरिकांना चिरडत नेले. लोक जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते, जवळच असलेल्या समुद्रात उड्या मारत होते, आसपासच्या गल्लीबोळांचा आसरा घेत होते. अंगावर शहारे आणणाऱ्या या दुर्घटनेत ८४ जणांचा बळी गेला आणि १00हून अधिक लोक जखमी झाले. ज्या ठिकाणी राष्ट्रीय दिनाचा आनंदोत्सव काही वेळापूर्वी सुरू होता त्याच ठिकाणी सर्वत्र मृतदेह पडलेले दिसत होते. गेल्या वर्षभरातील हा फ्रान्सवरील तिसरा मोठा हल्ला आहे.
जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध झाला असून, अनेक राष्ट्रप्रमुखांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादाविरुद्धची
लढाई तीव्र करण्याची गरज बोलून दाखवली आहे. आधी ब्रेक निकामी झाल्याने वा चुकून ट्रक गर्दीत शिरला की काय, असे अनेकांना वाटले; पण ट्रकच्या
मागे धावणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि पुढून येणाऱ्या पोलिसांनी अखेर
त्या ट्रकचालकाला गोळ्या घालून
मारले. त्या गोळीबारात ट्रकच्या समोरील भागाची गोळ्यांनी चाळणी झाली
आणि टायरही फुटले. हा ३१ वर्षीय हल्लेखोर फ्रान्स-ट्यूनिशियन नागरिक होता. (वृत्तसंस्था)


तेही होरपळले असते...
या ट्रकमधून पोलिसांनी एका ३१
वर्षीय फ्रान्स-ट्यूनिशियन मोहम्मद लाहोएज बुलेल याचे ओळखपत्र, बंदुका तसेच मोठ्या प्रमाणात हत्यारे व ग्रेनेड्स जप्त केली आहेत. त्या ग्रेनेड्सचा स्फोट झाला नाही, हे फ्रान्सच्या नागरिकांचे नशीबच. अन्यथा रस्त्यांच्या बाजूने पळत सुटणारे लोकही होरपळले असते.

मुंबईसह राज्यात हाय अलर्ट
फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई व राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धार्मिक, प्रेक्षणीय, गर्दीसह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये.
सोशल मीडियावरून अफवा पसरवू नयेत आणि संशयित वस्तू, व्यक्तीबद्दल तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.

फ्रान्सच्या नीस शहरात एका रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिनानिमित्त गर्दी उसळली होती.
रोशणाईच्या फटाक्यांची आतशबाजी सुरू असताना नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते.
नेमकी हीच वेळ साधून या हल्लेखोराने गर्दीत ट्रक घुसवला आणि एकच हाहाकार उडाला.
त्यामुळे सुरू झालेला मृत्यूचा थरार ८४ जणांचे प्राण घेऊन थांबला.

Web Title: French terror strikes again 84 innocent in trucks crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.