कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्र राहणार दोन हात लांब

By admin | Published: April 13, 2017 11:26 AM2017-04-13T11:26:49+5:302017-04-13T11:26:49+5:30

पाकिस्तानी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमध्ये आपण कोणतीही मध्यस्थी करणार नसल्याचं राष्ट्रीय संघाने स्पष्ट केलं आहे

In the case of Kulbhushan Jadhav, the United Nations will remain two arms long | कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्र राहणार दोन हात लांब

कुलभूषण जाधव प्रकरणी संयुक्त राष्ट्र राहणार दोन हात लांब

Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 13 - पाकिस्तानी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेमध्ये आपण कोणतीही मध्यस्थी करणार नसल्याचं राष्ट्रीय संघाने स्पष्ट केलं आहे. बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या इशा-यानुसार संयुक्त राष्ट्र या प्रकरणापासून दोन हात लांब राहणार आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो यांचे प्रवक्ता स्टिफन ड्यूजेरिक यांनी पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले आहेत. 
 
स्टिफन ड्यूजेरिक यांनी सांगितलं की, संयुक्त राष्ट्र या प्रकरणात कोणत्याती प्रकारचा निर्णय देण्याचा स्थितीत नाही. "आम्ही सध्या कायदेशीर निर्णयावर टिप्पणी करण्याच्या परिस्थितीत नाही. यासंबंधी आम्ही काहीच बोलू शकत नाही", असं स्टिफन ड्यूजेरिक बोलले आहेत. "जिथपर्यंत भारत - पाकिस्तान संबंधाचा प्रश्न आहे, तिथे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की दोन्ही पक्षांनी बसून शांतपणे चर्चा करत यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे", असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

(५६ इंच छाती असेल तर कुलभूषण यांची सुटका करा!)
(कुलभूषण जाधव यांची फाशी म्हणजे पाकचा पूर्वनियोजित हत्येचा कट - राजनाथ सिंह)
(VIDEO - कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह)
 
कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली शिक्षा तसंच भारत - पाकिस्तानमधील तणावपुर्ण संबधावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना स्टिफन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावत जर फाशी दिल तर ही पुर्वनियोजित हत्या समजली जाईल असं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारसहित विरोधी पक्षांनाही पाकिस्तानच्या कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 
 
कुलभूषण जाधव हे मुंबईच्या पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर भारताने आपल्या ताब्यात असलेले १२ पाकिस्तानी कैदी न सोडण्याचा निर्णय घेतला.
 
(अशाप्रकारे भारताला टाळता येईल कुलभूषण जाधवांची फाशी)
 
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
 
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालविण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले.
 
कुलभूषण यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा
जाधव यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे आणि न्यायालयातही गुन्हे कबूल केल्याचा दावा करून या पत्रकात म्हटले की, बलुचिस्तान आणि कराचीमधील अशांतता काबूत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणून तेथे आणखी अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी व हेरगिरी करण्यासाठी ‘रॉ’ने आपल्याला पाठविल्याचे जाधव यांनी शपथेवर कबूल केले. याआधी पाकिस्तान लष्कराने जाधव यांच्या या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओही जारी केला होता.

Web Title: In the case of Kulbhushan Jadhav, the United Nations will remain two arms long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.