...पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली; ‘डमी’ बेझाॅसही खेचतोय खोऱ्यानं पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 06:16 AM2024-04-24T06:16:10+5:302024-04-24T06:16:53+5:30

जेफ बेझाॅससारखा दिसतो म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला हॅलीसिलर स्वत: या गोष्टीने खूप आनंदी आहे. पण, त्याची प्रेयसी मात्र जाम वैतागली आहे.

Cagdas Halicilar, is a German entrepreneur who looks exactly like Amazon owner Jeff Bezos. | ...पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली; ‘डमी’ बेझाॅसही खेचतोय खोऱ्यानं पैसे

...पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली; ‘डमी’ बेझाॅसही खेचतोय खोऱ्यानं पैसे

एवढ्या मोठ्या जगात चारही बाजूंनी माणसंच माणसं. माणसांच्या या गर्दीतला प्रत्येक चेहरा वेगळा आणि एकमेव. अशा या जगात कोणी कोणासारखं हुबेहूब दिसणं फारच अवघड. पण जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जगातल्या दोन व्यक्तींचं सारखं दिसणंही त्याला अपवाद नाही. दोन सामान्य माणसं थोडीफार सारखी दिसत असली तर त्याची बातमी होत नाही. जग फारशी दखलही घेत नाही. पण, लोकप्रिय व्यक्तीसारखं कोणी दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या वाट्यालाही सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेचा थोडासा का होईना स्पर्श होतो. शाहरूख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर यांच्या डुप्लिकेट्सना एकेकाळी खूप भाव होता. माणसं फुटेज खाऊन जायचीच. सध्या कागडस हॅलीसिलर हा ४६ वर्षांचा जर्मन उद्योजक  खूपच चर्चेत आहे. कारण ॲमेझाॅनचा मालक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकावरील जेफ बेझाॅस यांच्यासारखाच तो दिसतो.

पूर्वी हॅलीसिलर हा सामान्य इलेक्ट्रिशियन होता. बांधकाम साइटसवर जाऊन जाऊन तो वैतागला आणि त्याने इलेक्ट्रिशियनची नोकरी सोडून दिली. नंतर त्याने लाॅजिस्टिक्सचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू होऊन काही महिनेच झाले होते की त्याचे मित्र त्याला अब्जाधीश म्हणून चिडवू लागले. हॅलीसिलरला काही कळेना की मित्र आपली अशी टर का उडवत आहेत ते. नंतर मित्रांनी हॅलीसिलरला एक फोटो दाखवला. फोटोतली व्यक्ती आणि हॅलीसिलर या दोघांच्या दिसण्यात काडीचाही फरक नव्हता. ही व्यक्ती म्हणजेच ॲमेझाॅन कंपनीचे मालक जेफ बेझाॅस. फोटो पाहून हॅलीसिलरलाही धक्का बसला. आपण फक्त जेफ बेझाॅससारखं दिसतो यात नुसतं कौतुक वाटून काय उपयोग? त्याचा आपल्याला काय फायदा? असा विचार आधी हॅलीसिलरने केला, पण नंतर त्याला त्यातच ‘संधी’ दिसली! मग त्याने सर्व कामेधंदे सोडून जेफ बेझाॅससारखं दिसणं एवढंच काम करायला सुरुवात केली. जेफ बेझाॅस म्हणून वावरणं हाच त्याचा व्यवसाय झाला. त्याच्या या भूमिकेने जेफ बेझाॅससारखंच हॅलीसिलरलाही लोकप्रिय केलं. 

हॅलीसिलर म्हणतो, जेफ बेझाॅसच्या व्यक्तिमत्त्वात शिरायला मला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मुळात जेफ बेझाॅसचं राहणं खूप औपचारिक आहे. ते कधी सूट घालतात तर कधी जीन्स आणि त्यावर पोलो शर्ट हे जेफ बेझाॅसचे स्टाइल स्टेटमेंट. कपड्यांची काॅपी त्यामुळे हॅलीसिलरला सहज जमून जायची. त्याला थोडे कष्ट घ्यावे लागले ते चेहेऱ्यावर. बेझाॅसप्रमाणे हॅलीसिलर डोकं कायम चकचकीत ठेवू लागला. नीव्हिया क्रीम लावू लागला. त्याचं हे दिसणंच त्याला पैसा आणि प्रसिद्धीही देऊन गेलं. 

एकदा हॅलीसिलर अमेरिकेत सिॲटल येथे मित्रांसोबत फिरायल गेला. तेव्हा त्याने ॲमेझाॅन कंपनीच्या कॅम्पसमध्ये निवांत फेरफटका मारला. हॅलीसिलरला पाहून ॲमेझाॅन कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना जेफ बेझाॅसच आल्याचं वाटलं. सर्वांनी हॅलीसिलरला गराडा घातला. अनेकांनी हॅलीसिलरला वैयक्तिकरीत्या भेटून आपल्याला ॲमेझाॅनासारख्या कंपनीत काम करण्याचं भाग्य मिळाल्याचे म्हणत आभार व्यक्त केले.
हॅलीसिलर जेफ बेझाॅससारखा फक्त दिसतच नाही तर त्याची जीवनशैलीही बेझाॅससारखीच भव्यदिव्य आणि आलिशान आहे. बेझाॅसप्रमाणे हॅलीसिलरलाही मोठमोठ्या जहाजांनी प्रवास करायला फार आवडतं. चांगल्या दर्जाची आणि उंची व्हिस्की त्याला आवडते.  जेफ बेझाॅससोबत त्याच्या जहाजावर बसून हॅलीसिलरला व्हिस्की प्यायची आहे. त्याचं म्हणणं बेझाॅससारखं राहाता आलं तरच बेझाॅससारखं दिसण्यात अर्थ आहे. दिसायचं अब्जाधीशासारखं आणि राहायचं सामान्यासारखं यात काही मजा नाही. त्यामुळे हॅलीसिलरने आपले ‘शौक’ही अब्जाधिशाचेच ठेवले आणि जपलेही.

जेफ बेझाॅससारखा दिसतो म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला हॅलीसिलर स्वत: या गोष्टीने खूप आनंदी आहे. पण, त्याची प्रेयसी मात्र जाम वैतागली आहे. कुठेही गेलं तरी बेझाॅसची लोकप्रियता हॅलीसिलरच्या मागे शेपटासारखी चिकटलेली असते, यामुळे ती जाम वैतागली आहे, पण बेझाॅससारखं दिसणं आणि राहाणं हाच हॅलीसिलरचा व्यवसाय म्हटल्यावर तिचाही नाइलाज आहे.

‘बेझाॅसच्या चेहेऱ्यानं’ जादू केली!
जेफ बेझाॅसप्रमाणे दिसणं एकवेळ सोपं असू शकतं, पण त्याच्यासारखं राहाणं ही तोंडाची गोष्ट नाही. इथे पैसाच हवा. जेफ बेझाॅसचा चेहेरा घेऊन खोऱ्यानं पैसा कमावणं हॅलीसिलरला जमू लागलं आहे. जर्मनीमधील टीव्ही शो, स्थानिक कार्यक्रम या ठिकाणी हॅलीसिलरला आमंत्रित केलं जातं, त्याच्या मुलाखती घेतल्या जातात. ‘किंग स्टॉन्क्स’ या जर्मन नेटफ्लिक्सवरील मिनी  सिरीजमध्येही हॅलीसिलरने ‘गेस्ट रोल’ केला. जेफ बेझाॅसच्या चेहेऱ्याने हॅलीसिलरला पैसाही खूप मिळवून दिला.

Web Title: Cagdas Halicilar, is a German entrepreneur who looks exactly like Amazon owner Jeff Bezos.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.