अवैध दारू विक्री बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:17 PM2017-08-21T23:17:37+5:302017-08-21T23:18:18+5:30

Stop illegal alcohol sales | अवैध दारू विक्री बंद करा

अवैध दारू विक्री बंद करा

Next
ठळक मुद्देमहिलांमध्ये संताप : दारू विक्रेत्यांना अटक करा, संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील तेढा गावपरिसरात नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर परत अवैध दारु विक्री पुन्हा जोरात सुरू झाली आहे. यामुळे गावातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्याप्त असून अवैध दारु विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी या मागणीला घेऊन सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे.
गावात मागील १५ ते २० वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटांनी पुढाकार घेवून दारू विक्री बंद केली होती. परंतु अवैध दारू विक्रेते ग्रामस्थांच्या निर्णयावर अंमल करून फक्त काही काळासाठी दारू विक्रीवर प्रतिबंध ठेवत असत. कधी दोन अडीच वर्षे तर कधी चार ते पाच वर्षे बंद, यानंतर पुन्हा ही अवैध दारू विक्री सातत्याने सुरू करतात. त्यामुळे जेव्हा पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई-वडिलांना मारहाण करून घरातील धान्ये व भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. आजची नवीन पिढी अवघ्या १२ ते २० वर्षे वयोगटातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत.
ही अवैध दारू विक्री किती वेळा बंद व किती वेळा सुरू होत राहील, असा सवाल तेढा येथील महिलांनी उपस्थित केला आहे. या विक्रेत्यांविरूद्ध काही सुज्ज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे. येथील अवैध दारू विक्री १०० टक्के बंद व्हावी यासाठी १५ आॅगस्ट २०१७ रोजी ग्रामसभेत अवैध दारू विक्री विरोधात ठराव घेण्यात आला. ग्रामसभेत उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट तसेच क्षेत्रातील दारूमुळे त्रस्त जनता अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जावून आता तरी तुम्ही अवैध दारू विक्री बंद करा, असे समजावून सांगण्यात आले. परंतु अवैध दारू विक्रेत्यांनी फक्त १५ व १६ आॅगस्टला दारु विक्री बंद ठेवली व पुन्हा १७ आॅगस्टपासून दारू विक्रीला सुरूवात केली.
त्यामुळे रविवार (दि.२०) रोजी ग्रा.पं. तेढा येथील पदाधिकारी व महिलांनी विशेष महिला ग्रामसभा घेतली. अध्यक्षस्थानी डॉ. जितेंद्र मेंढे होते. तसेच पोलीस निरीक्षक नारनवरे, बीट जमादार गणवीर, ग्रा.पं. पदाधिकारी, जि.प. सदस्य ज्योती वालदे, तंमुसचे पदाधिकारी, महिला बचत गटाचे सदस्य, नागरिक, महिला व युवावर्ग उपस्थित होता. यावेळी घरातील दारू पिणाºया व्यक्तीमुळे त्रस्त महिला तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या. तसेच दारूबंदी करताना आलेल्या अडचणी व अवैध दारू विक्रेत्यांकडून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराची माहिती महिलांनी पोलीस निरीक्षक नारनवरे यांना दिली.
जि.प. सदस्य खुमेंद्र मेंढे यांनी गेल्या १५ ते २० वर्षाच्या काळातील अवैध दारू विक्रीची संपूर्ण माहिती दिली. यात किती काळासाठी बंद करण्यात आली व कशाप्रकारे पुन्हा सुरू करण्यात आली आदी बाबींचा समावेश होता. भोलाराम तावाडे यांनी कोणकोणत्या ठिकाणी अवैध दारू विक्री होते व १२ ते २० वर्षे वयोगटातील मुले या व्यसनात कसे अडकले, हे सांगितले. तर डॉ. विवेक मेंढे यांनी नागरिकांच्या समस्या व दारूमुळे त्रस्त जनतेची व्यथा मांडली.
यावर पोलीस निरीक्षक नारनवरे यांनी दारू विक्रीवर लागणाºया कलमा, अवैध दारू विक्रेत्यांवर कोण कार्यवाही करु शकतात तसेच अन्य दुसºया गुन्ह्यांवर लागणाºया विविध कलमांची माहिती उपस्थितांना दिली. गुन्ह्याचे किती प्रकार आहेत व त्यावर कायद्याने कशी कार्यवाही केली जाते, पुरावे कसे लागतात यावरही मार्गदर्शन केले. तसेच तेढा क्षेत्रातील अवैध दारू विक्री १०० टक्के बंद होणारच, असे आश्वासन दिले. यानंतर डॉ. जितेंद्र मेंढे यांनी आतापर्यंत नागरिकांत असलेली पोलिसांबद्दलची प्रतिमा व काही भ्रष्ट पोलीस अधिकाºयांबद्दल सांगून सभेला सर्वांचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक व निरीक्षकांना निवेदन
तेढा गावातील महिला तसेच दारुमुळे त्रस्त जनतेने रोष व्यक्त करुन १८ आॅगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील व गोरेगावचे पोलीस निरीक्षक नारनवरे यांना यांना निवेदन दिले. या वेळी सरपंच रत्नकला भेंडारकर, जि.प. सदस्य ज्योती वालदे, उपसरपंच डॉ. विवेक मेंढे, ग्रा.पं. सदस्य उमेश शहारे, वच्छला राऊत, कविता नाईक, लता भोयर, खुमेंद्र मेंढे, जिल्हा छावा संग्राम परिषद अध्यक्ष निलम हलमारे, तंमुस अध्यक्ष भोलाराम तावाडे, धनेश्वर मेंढे, सावलराम ताराम, काशिनाथ भेंडारकर, प्रतिष्ठित नागरिक, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. अवैध दारू विक्रीवर आळा घालण्याकरिता उपाययोजना करून त्याचा आराखडा तयार करा व अवैध दारू विक्रेत्यांना अटक करा, अशी मागणी केली.
बोदा गावात दारूचा खुला व्यवसाय
गोंडमोहाळी : बोदा गावात दारुचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत आहे. गावातील युवक मोठ्या प्रमाणात दारुच्या आहारी जात आहेत. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे ठाम दुर्लक्ष आहे. ग्रामस्थ दररोज दारू पिऊन भांडण करतात. दारुच्या पायी बोदा गावात चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. गावातील अनेक कर्ते पुरूष दारुच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. येथे कोणीही व्यक्ती समोर येवून दारूबंदी करण्यास पुढाकार घेत नाही. दारूच्या व्यवसायाला अनेकांचा पाठिंबा आहे. अधिकारी वर्ग कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. अधिकारी किंवा गावातील जबाबदार व्यक्तींनी अवैध दारूचा व्यवसाय बंद करण्याची योजना राबवावी व संपूर्ण दारुबंदी पूर्णपणे बंद करण्याची मागणी बोदा येथील महिलांनी केली आहे.

Web Title: Stop illegal alcohol sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.