थकीत करदाते बॅनरवर झळकले

By admin | Published: March 29, 2017 02:26 AM2017-03-29T02:26:36+5:302017-03-29T02:26:36+5:30

नगर पंचायतीने मागील आठ दिवसांपासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.

Tired people are tired of banner | थकीत करदाते बॅनरवर झळकले

थकीत करदाते बॅनरवर झळकले

Next

अहेरी नगर पंचायत क्षेत्रात कर वसुलीची धडक मोहीम
प्रतीक मुधोळकर   अहेरी
नगर पंचायतीने मागील आठ दिवसांपासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या मागणीनंतरही मागील अनेक वर्षांपासून कर न भरलेल्या नागरिकांची नावे बॅनरवर झळकविण्यात आले आहेत. सदर बॅनर अहेरी शहराच्या प्रमुख चौकात लावण्यात आले आहे. हा जास्तीत जास्त कर वसुली करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नगर पंचायतीद्वारे मागील एक महिन्यापासून आॅटो फिरवून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून थकीत मालमत्ता कर ३१ मार्चपूर्वी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत काही नागरिकांनी कराचा भरणाही केला. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके व नगर पंचायतीच्या इतर कर्मचाऱ्यांनी अहेरी शहरातील प्रत्येक घरी जाऊन कर भरण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर नगरसेवकांना लेखीपत्र देऊन त्यांच्या प्रभागातील नागरिकांना कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही केले होते. मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कराचा समावेश असलेली पावती संबंधित नागरिकाला दिली जात होती. पावती मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत थकीत कराचा भरणा करण्याची सूचनाही देण्यात आली. या कालावधीत थकीत कराचा भरणा न केल्यास कारवाई करण्याचेही नमूद केले. त्यानंतरही ज्या नागरिकांनी कराचा भरणा केला नाही. अशा नागरिकांच्या नावाचे बॅनर नगर पंचायतीने तयार केले आहे. संबंधित व्यक्तीच्या नावासमोर कराची किती रक्कम शिल्लक आहे. हे नमूद करण्यात आले आहे. सदर बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणारे व्यक्ती थांबून बॅनरवरील सर्व नागरिकांची नावे वाचत आहेत. अहेरीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवरील नाव पाहून जे व्यक्ती तत्काळ कराचा भरणा करीत आहेत, अशा नागरिकांच्या नावासमोर तत्काळ चिकटपट्टी लावून त्यांचे नाव बुजविण्यात येत आहे. बॅनरवर अहेरीतील काही प्रतिष्ठीत नागरिकांचीही नावे असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. बॅनरच्या या अनोख्या संकल्पनेमुळे बॅनर लागल्यापासून अवघ्या दोन दिवसांत दोन लाख रूपयांची कर वसुली झाली आहे.

अहेरी नगर पंचायतीचे प्रशासन मागील सव्वा महिन्यांपासून शहरात आॅटो फिरवून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून तसेच चौकाचौकात बॅनर लावून कर वसुली करण्याविषयी विनंती केली होती. याला काही नागरिकांनी प्रतिसाद दर्शवित कर भरले. मात्र काही नागरिकांवर आवाहनाचा काहीच परिणाम झाला नाही. अशांची नावे बॅनरवर झळकली आहेत. बॅनर लावल्याने काही नागरिकांचा आपल्यावर रोष आहे. मात्र कर वसुलीसाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते. ७० टक्केपेक्षा अधिक वसुली झाल्यास शासनाकडून नगर पंचायतीला प्रोत्साहनात्मक निधी उपलब्ध होणार आहे.
-डॉ. कुलभूषण रामटेके, मुख्याधिकारी नगर पंचायत अहेरी

मुदत संपण्यापूर्वीच बॅनरवर नावे
अहेरी नगर पंचायतीने कराचा तपशील असलेली पावती नागरिकांना दिली होती. या पावतीवर पावती मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत कराचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र काही नागरिकांना अगदी आठ दिवसांपूर्वी पावती मिळाली. कर भरण्यास मुदत असल्याने संबंधित नागरिकांनी कराचा भरणा केला नाही. मात्र त्यांची नावे बॅनरवर झळकली. त्याचबरोबर काही नागरिकांना पावतीही मिळाली नाही. तरीही त्यांची नावे बॅनरवर आहेत. अशा नागरिकांनी नगर पंचायतीच्या या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नागरिकांनी आपली बदनामी झाली असून नगर पंचायतीच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title: Tired people are tired of banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.