बोअरवेल कंपनीला केला दंड

By admin | Published: September 25, 2015 01:56 AM2015-09-25T01:56:54+5:302015-09-25T01:56:54+5:30

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेत जमिनीला सिंचीत करण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरी या कंपनीकडून बोअर मारून घेतले होते.

Ban on borewell company | बोअरवेल कंपनीला केला दंड

बोअरवेल कंपनीला केला दंड

Next

जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल : भेंडाळाच्या शेतकऱ्याला ३३ हजार रूपये देण्याचे आदेश
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेत जमिनीला सिंचीत करण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरी या कंपनीकडून बोअर मारून घेतले होते. मात्र बोअर मारल्यानंतर आपली फसवणूक झाली. ही बाब संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी बोअरवेल मारून देणाऱ्या कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली. त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात त्यांनी धाव घेतली. ग्राहक मंचाने शेतकऱ्यास ३३ हजार रूपये देण्याचा निर्णय बुधवारी दिला आहे.
भेंडाळा येथील मनोहर पत्रूजी तुंबडे यांची मौजा भेंडाळा येथे सर्वे नंबर ३२५ आराजी १.९० हेक्टर ही शेतजमीन अजल सिंचित आहे. त्यामुळे मनोहर तुंबडे यांनी १५ जून २०१४ ला मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरीचे प्रोप्रायटर सुकुमार उर्फ सुखदेव मंडल यांच्याकडून बोअरवेल मारून घेतले. त्यापूर्वी मंडलसोबत ९ इंची बोअरवेल ३०० फूट खोल व २०० फूट केसींग टाकण्याबाबत ठरले होते. परंतु मंडल यांनी ठरल्याप्रमाणे नऊ इंचीचा बोअरवेल मारला नाही. तो साडेसहा इंचीचा मारला व ६० फूटपर्यंतच पीव्हीसी केसींग टाकले. याबाबीला तुंबडे यांनी आक्षेप घेतला. तेव्हा मंडल यांच्या आॅपरेटरने मालकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काम केले, असे सांगितले. त्यामुळे तुंबडे यांना नाईलाजास्तव काम न होताही पूर्ण रक्कम द्यावी लागली. परंतु बोअरवेलमधून पाणी उपसा केल्यावर लागलीच गढूळ पाणी येत होते. वारंवार मोटार बंद पडत होती. त्यामुळे त्यांच्या १२० पोते धान पिकाचे नुकसानही झाले.
नवीन बोअरवेल मारून द्यावी, अशी मागणी मंडल यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तुंबडे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय चंद्रलाल प्रेमचंदानी यांनी २३ सप्टेंबर रोजी या प्रकरणी निकाल देताना मनोहर तुंबडे यांना बोअरवेलची संपूर्ण रक्कम २५ हजार ५००, शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये व तक्रारीचा खर्च २ हजार ५०० रूपये द्यावा, असा आदेश जारी केला. तुंबडे यांच्या वतीने अ‍ॅड. आर. बी. म्हशाखेत्री व अ‍ॅड. के. आर. म्हशाखेत्री यांनी काम पाहिले.
ग्राहक मंचाच्या या निकालामुळे आपल्याला योग्य न्याय मिळाला असून गडचिरोली जिल्ह्यातील जे शेतकरी शेतात बोअरवेल खोदतात त्यांनी संबंधित कंपनीकडून रितसर बिल घ्यावे, असे आवाहन मनोहर तुंबडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Ban on borewell company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.