गुजरातऐवजी धार्मिक मॉडेलचा चमत्कार कसा?

By admin | Published: August 9, 2016 01:02 AM2016-08-09T01:02:39+5:302016-08-09T01:02:39+5:30

गायीवरून चालू असलेल्या वर्तमान राजकारणाचा धागा ५४ वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी जोडता येऊ शकेल. साल होते १९५२चे. याच वर्षाच्या सुरुवातीला संघाची राजकीय शाखा

What is the miracle of a religious model instead of Gujarat? | गुजरातऐवजी धार्मिक मॉडेलचा चमत्कार कसा?

गुजरातऐवजी धार्मिक मॉडेलचा चमत्कार कसा?

Next

रामचन्द्र गुहा, (ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)
गायीवरून चालू असलेल्या वर्तमान राजकारणाचा धागा ५४ वर्षांपूर्वीच्या एका घटनेशी जोडता येऊ शकेल. साल होते १९५२चे. याच वर्षाच्या सुरुवातीला संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जन संघाने पहिल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या तीन जागा मिळवल्या होत्या. याच वर्षातील आॅक्टोबर महिन्यात रा.स्व.संघाचे सर्वाधिक काळ सरसंघचालकपद भूषविलेल्या म.स. गोळवलकर यांचा एक लेख प्रकाशित झाला होता. या लेखाद्वारे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य राखण्यासाठी हिंदू तरुणांना प्राचीन मूल्य आणि संकल्पना पुनरुज्जीवित ठेवण्याचे तसेच मातृभूमीच्या सन्मानासाठी व प्रगतीसाठी त्याग करण्यास सदैव तत्पर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
गोळवलकरांचे असे म्हणणे होते की, मातृभूमीचा सन्मान म्हणजे दुसरे काही नसून फक्त गोमाता आहे, ते पृथ्वीचे जिवंत प्रतीक आहे. तेच तुमच्या त्यागाचा, उपासनेचा उद्देश आहे. गाईवर होणारा कुठलाही हल्ला रोखणे हे राष्ट्रीय सन्मानाचे आणि मातृभूमीसाठी त्यागाचे माध्यम आहे. गोहत्त्या बंदी हे आपल्या राष्ट्रीय पुनर्जागरण कार्यक्रमातील सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे असे गोळवलकरांनी त्या लेखात म्हटले होते. धार्मिक वृत्तीचे हिंदू गायीची पूजा करत; पण मुस्लिम आणि ख्रिस्ती गायीचे मांस खात. गोळवलकर आणि संघासाठी गायीचे पूजन हे अल्पसंख्याकांना झोडपण्याचे चांगले माध्यम होते, त्यांना त्या माध्यमातून हे हिंदू राष्ट्र आहे हेही अल्पसंख्याकांच्या मनात ठसवायचे होते.
१९५०च्या दशकात संघाच्या प्रचाराचा टिकाव लागणार नाही एवढा जवाहरलाल नेहरू यांचा प्रभाव होता. नेहरूंच्या निधनानंतर मात्र संघाने गोहत्त्या बंदीसाठी राष्ट्रव्यापी चळवळ राबवली होती. या मुद्द्यावर संतप्त हिंदुत्ववाद्यांनी १९६६ साली संसदेवर मोर्चाही नेला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठी हल्ला केल्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी काही इमारती, घरे आणि शेकडो वाहनांना आग लावली होती. संसदेवरचा हा कट्टर हिंदुत्त्ववाद्यांकडून झालेला हल्ला विस्मरणात गेला आहे. हा हल्ला म्हणजे डिसेंबर २००१मध्ये जिहादी हल्लेखोरांनी संसदेवर केलेल्या हल्ल्याची नांदीच होती. नरेंद्र मोदींची जडणघडण संघातच झाली आहे, जेथे त्यांना गोळवलकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचेही शिक्षण देण्यात आले आहे. मोदींनी गोळवलकरांची प्रशंसा करणारे निबंधसुद्धा लिहिले आहेत. तरीसुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी संघ आणि त्याच्याशी संलग्न विश्व हिंदू परिषदेसारख्या अन्य कट्टर संघटनांना राज्याच्या राजकारणात एका मर्यादेत ठेवण्याचेही प्रयत्न केले आहेत.
२०१३ साली पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होईपर्यंत मोदींनी स्वत:ला सार्वजनिक दृष्ट्या संघापासून दूर ठेवले होते. परिणामी मतदारांना मोदींच्या कट्टरपंथी भूतकाळाचा विसर पडला होता. त्यांना फक्त गुजरातेत होत असलेली औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रातील विकास दिसत होता. पंतप्रधान होताच गुजरात मॉडेलची अंमलबजावणी देशभरात केली जाईल, असे आश्वासन मोदींनी त्यावेळी दिले होते. मोदींना पुढे निवडणुका जिंकण्यासाठी संघाच्या मदतीची गरजच नव्हती; पण देश पातळीवर यश प्राप्त करण्यात काही कमी राहू नये म्हणून नाईलाजास्तव त्यांना संघापर्यंत जावे लागले होते. तिकडे द्विधा अवस्थेत असलेल्या सध्याचे सरसंघचालक मोहन भागवतांनाही त्यांच्या संघटनेचे वजन मोदींच्या पारड्यात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. संघ आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला उत्साही प्रतिसाद देत उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात आणि देशभरात भरभरून जागा मिळवून दिल्या होत्या.
२०१४च्या मे महिन्यात मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि सरकारचा कारभार सुरू केला. भाजपा म्हणजे जन संघाचे सध्याचे रूप आहे आणि पहिल्यांदाच या पक्षाला एवढ्या प्रचंड प्रमाणात बहुमत मिळाले होते. मोदींना हे ठाऊक होते की, सार्वत्रिक निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढवाव्या लागतात; पण निष्णात राजकीय विश्लेषक चंद्रभान प्रसाद लिहितात की, ‘हिंदू समाजातला एक गट (उच्च जातींचा आणि परंपरावादी लोकांचा भरणा असलेला) असे समजत होता की मोदींना मिळणारे बहुमत हे हिंदू राष्ट्रासाठी आहे’. या गटाचे हे मत गोळवलकरांच्या विचारांनी प्रभावित होते.
१९७३ साली गोळवलकरांचे निधन झाले; पण त्यांचे विचार कट्टरपंथी हिंदूंच्या डोक्यात तसेच राहिले. मिंट या वृत्तपत्रात नुकत्याच प्रकाशित एका लेखात भारतीय गोरक्षक दलाचा उल्लेख करण्यात आला आहे. याचे सदस्य प्रामुख्याने ब्राह्मण आहेत. ज्यांनी गाईच्या रक्षणाची शपथ घेतली आहे. आता तर त्यांचेच सरकार केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना गोमांस भक्षण आणि गायीची वाहतूक करताना पकडल्या गेलेल्या मुसलमानांवर हल्ले करण्याची हिंमत वाढली आहे. मोदींनी कारभार हाती घेतल्यानंतर अशा घटना उत्तर प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात घडल्या आहेत. दरम्यान काही राज्यातील भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनीही गो संरक्षण आणि गोमांसावर बंदीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या घटनांमध्ये झळ पोहोचलेले सर्व मुस्लिम आहेत. ज्यांनी अशा घटनांचा निषेध केला आहे, त्या सर्वांना भंपक धर्मनिरपेक्षतावादी किंवा राष्ट्रविरोधी ठरविण्यात आले आहे. हा उन्माद आता मोदींच्या गुजरातेतसुद्धा पोहोचला आहे. काही गोरक्षकांनी मेलेल्या गायीचे कातडे काढणाऱ्या दलितांना मारहाण केली आहे. उना येथे घडलेल्या या घटनेतील मारहाण करणाऱ्या तरुणांनी घटनेचे छायाचित्रण करून ते सोशल मीडियावर प्रसारितही केले आहे.
दलित हे मान्यतेने का असेना, पण हिंदू समाजाचाच एक भाग आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाध्यक्षांनीही दलितांविषयी मोठी आस्था दाखवली आहे. पण नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे भाजपाला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. अशी वेळ गेल्या काही महिन्यात बऱ्याच वेळा येऊन गेली. पण जेव्हा गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून इतर लोकांवर हल्ले झाले आहेत तेव्हा भाजपाने मौनच पाळले आहे. भाजपाच्या आमदाराने काश्मीर विधानसभेत एका अपक्ष आमदाराला गोमांस भक्षणावरून मारहाण केली होती, तेव्हाही भाजपा अध्यक्ष शांत राहिले होते. परिणामी कार्यकर्त्यांनाही हिंमत मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरात मॉडेल राबवून देशाच्या इतर भागाचा आर्थिक विकास करण्याची अपेक्षा असताना आर्थिक विकासाऐवजी संघ परिवाराने त्यांचा धार्मिक बहुसंख्यत्वाचाच कार्यक्रम गुजरातसहित देशभर राबवावा, असा एकाएकी चमत्कार तरी का घडला असावा?

Web Title: What is the miracle of a religious model instead of Gujarat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.