धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित

By admin | Published: October 14, 2015 12:19 AM2015-10-14T00:19:28+5:302015-10-14T00:19:28+5:30

हिंदू धर्मातील चातुर्वण्यव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसोबत नागपूर येथे (सध्याची दीक्षाभूमी) बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.

Today's Fate of Dhamchachakra Enforcement Day | धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित

Next

प्रा.डॉ.वामनराव जगताप, (सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक )
हिंदू धर्मातील चातुर्वण्यव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसोबत नागपूर येथे (सध्याची दीक्षाभूमी) बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला २२ प्रतिज्ञा देऊन विषमता व अमानुषतेच्या मुळावरच घाव घातले. त्यांनी घडवून आणलेल्या धार्मिक, सामाजिक परिवर्तन-प्रवर्तन व क्रांतीने दलित-बौद्ध समाजात आमूलाग्र बदल घडून आले. पण स्वत:ला नवबौद्ध समजणारा सध्याचा समाज खरंच त्या २२ प्रतिज्ञांच्या मार्गाने आपला जीवनक्रम चालवित आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
आज हा समाज हिंदू परंपरा-संस्कृतीला पुन्हा जवळ करीत आहे असे वाटते. लग्न सोहळ्यात गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन होत असले तरी त्यापूर्वी घरातल्या सर्व देवीदेवतांची पूजा उरकलेली असते. लग्न पत्रिकेत श्री. व सौ. या शब्दांचा वापर करणे, देणगी, बक्षीस, हौस या गोंडस नावाखाली भरमसाठ हुंडा घेणे, मुलाच्या नोकरीसाठी दिलेले लाखोचे डोनेशन वसूल करणे, त्याउपरही लग्नाचा संपूर्ण खर्च मुलीकडच्यांवर लादणे, असले जीवघेणे प्रकार सध्या सुरु आहेत. लग्नातील बौद्ध पद्धतीचा एक विधी सोडला तर त्यापूर्वीचे व नंतरचे सर्वच सोपस्कार पारंपरिक हिंदू पद्धतीनेच पार पाडले जातात हे वास्तव आहे. यांना बौद्ध म्हणवून घेण्याची लाज वाटते की काय? मृत्युनंतर पिंडदान करणाऱ्यांचीही कमी नाही. पुण्या-मुंबईतील बहुतेक उच्चभ्रू नवबौद्धांच्या घरात बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमा दिसत नाहीत. ही मंडळी बुद्धनगर, भीमनगर अशा वस्तीत राहणे पसंत करीत नाही. विशेष म्हणजे असे सारे प्रकार दीक्षाभूमिसारख्या नागपूर शहर व जिल्ह्यातही दिसून यावेत यासारखी शोकांतिका अजून ती कोणती?
यातील अजून एक शोकांतिका म्हणजे बौद्धधर्मीय (पूर्वाश्रमीचे महार) राजकीय नेते, कार्यकर्ते स्वत:च्या घरात गणपतीच्या भव्य मूर्तीची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करून रोजची आरती, आकर्षक निमंत्रण पत्रिकेसह विसर्जनाच्या दिवशी महाआरती, महाप्रसाद म्हणून हजारएक लोकांच्या जेवणाचा भंडारा, सवाद्य भव्य विसर्जनसोहळा इत्यादि घडवून आणतात.
आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, स्वर्ग, नरक आदि काल्पनिक, अगम्य, अवैज्ञानिक, चमत्कारिक प्रकरणांवर काथ्याकूट करून वेळ व ऊर्जा कदापि नष्ट न करण्याबद्दल स्वत: बुद्धाने आवर्जून सांगितले, स्वत:चा विचारही घासून, पारखून स्वीकारण्याचे आवाहन केले. बाबासाहेबांनीही तेच सांगितले असता नवबौद्ध समाज या अवैज्ञानिक प्रकरणात पुन्हा अडकून पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक विहार, समाज मंदिरातील प्रवचनातूनही अशाच प्रकारचा चुकीचा संदेश सध्या रोज ऐकू येतो. विद्वान, उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ श्रोतेही या प्रकरणावर मौन धारण केलेले असतात, हे कशाचे द्योतक आहे? मूळ बुद्ध धर्मात काळानुरूप कितीही अवैज्ञानिक, चमत्कारिक गोष्टींचा भरणा असला तरी त्याला त्यागून जे व्यवहारिक, वैज्ञानिक असेल तेच घेण्याबद्दल त्यांनी सांगितले. अशा वैज्ञानिक धर्मालाच त्यांनी ‘धम्म’ अशी संज्ञा दिली. त्यांच्या या विचाराला पुढील काळात बाबासाहेबांचा ‘नवयान’ अशी व्याख्या अस्तित्वात आली, तरीही सध्याचे बौद्धजन पुन्हा जुना विचार, परंपरा व चमत्काराला बळी पडून चुकीच्या पद्धतीने धम्माचरण करीत आहेत.
यातील वास्तव असे आहे की, बहुसंख्य नवबौद्धांच्या बैठकीत फुले, शाहू, आंबेडकर असतात, पण आतील दालनात अनेक देवदेवतांच्या प्रतिमा, पुतळे पाहावयास मिळतात. खरं तर दसऱ्याचा शुभदिवस म्हणून बाबासाहेबांनी त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली नव्हती तर, १४ आॅक्टोबर ही तारीख ठरवून धम्मदीक्षा घेतली. पण आजचे बौद्धजन दसऱ्याच्या दिवशीच धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करीत असतात. एका वेगळ्या पद्धतीने ते पारंपरिक दसराच साजरा करतात, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. यातील भलेभलेही धम्मचक्र प्रवर्तनऐवजी धम्मचक्र परिवर्तन असा शब्दप्रयोग करतात. यातील बहुतेकाना प्राथमिक स्वरूपातील साधे त्रिशरण-पंचशीलसुद्धा धड म्हणता येत नाही. ग्रामीण भाग व शहरी झोपडपट्ट्यात राहणारे अज्ञ बौद्धजन तुलनेने जास्त बुद्ध व बाबासाहेबमय आहेत, हे मान्य करूनही त्यांच्याही दुहेरी निष्ठा लपून नाहीत.
महाराष्ट्राव्यतिरिक्त उर्वरित भारताचे चित्र तर विचारायलाच नको. महाराष्ट्रातसुद्धा बुद्ध धम्माच्या संबंधाने पूर्वाश्रमीचे महार सोडले तर बाकीच्या दलित-मागासवर्गीयांचे काय, असा प्रश्न पडतो. प्रत्येकाच्या राहुट्या वेगवेगळ्या आहेत. सर्व मागासवर्गीय मिळून ८५ टक्के असताना बाबासाहेबांच्या स्वप्नातील बुद्धमय भारत म्हणूनच साकारत नाही. त्यातील पा.ना.राजभोज, एल.आर.बाली, कांशीराम, मायावती, भालचंद्र मुणगेकर (चर्मकार), नानकचंद रत्तू, पट्टीचे शाहीर जंगम स्वामी, अण्णाभाऊ साठे, आर.के.त्रिभुवन, पारवे, पोचीराम कांबळे, एकनाथ आव्हाड, मिलिंद आव्हाड (मातंग), हनुमंत उपरे (ओबीसी), लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड (विमुक्त-भटके), विरा साथीदार इत्यादींची प्रबळ बांधिलकी व कृतीचा अपवाद सोडला तर सर्व सुन्न आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर म्हणावेसे वाटते की आजच्या नवबौद्धांपेक्षा ब्राह्मण वर्गातील पण बुद्ध धर्माचा स्वीकार केलेले भदंत आनंद कौशल्यायन, राहूल सांकृत्यायन, धर्मानंद कोसंबी (पिता-पुत्र) यांच्या बुद्ध धर्माप्रति असलेल्या प्रतिबद्धतेला तोड नाही. अभ्यासू व त्यागी, साधक वृत्तीने त्यांनी आपली निष्ठा आजीवन फक्त बुद्धचरणीच अर्पिली होती. बुद्धाचे प्रथम शिष्यही निष्ठावान विद्वान ब्राह्मणच होते. रामस्वामी पेरियार, म.भि.चिटणीस, रा.भि.जोशी,श्री.म.माटे (उपरोधिक संबोधन-महार माटे) या मालिकेत अगदी अलीकडील रूपा बोधी-कुळकर्णी, सत्यनारायणजी गोयंका इत्यादींचाही नामोल्लेख करता येईल. सविता कबीर उपाख्य माईसाहेब आंबेडकर यांनी तर बाबासाहेबांच्या सहचारिणी बनून प्रत्यक्ष त्यांच्यासमवेतच धम्मदीक्षा ग्रहण केली होती. या सर्वांच्या सामाजिक, मानसिक तयारीला नक्कीच दाद देऊन त्यांचे स्वागतही झाले आहे. पण यातील संख्या फार मोठी नाही, हेही मान्य करावे लागते.
भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र, चलनावरीत राजमुद्रा, भारताचे पंचशील धोरण इत्यादिच्या माध्यमातून भारत बुद्धमय झाला खरा, पण त्यातील बहुतांश समाज मात्र कोराच राहून गेला, नवबौद्ध म्हणविणारेही अर्धवटच राहून गेले.

Web Title: Today's Fate of Dhamchachakra Enforcement Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.