अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी; स्टाईलबाजीत दडलेय बिश्नोईच्या दहशतीचे राज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:17 AM2024-04-21T11:17:39+5:302024-04-21T11:18:50+5:30

तब्बल दोन डझन खतरनाक गुन्ह्यांची नोंद असलेला लॉरेन्स हा पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा. २०१० साली त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवातच झाली ती हत्येचा प्रयत्न

The story of gangster Lawrence Bishnoi who tries to kill actor Salman Khan | अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी; स्टाईलबाजीत दडलेय बिश्नोईच्या दहशतीचे राज

अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी; स्टाईलबाजीत दडलेय बिश्नोईच्या दहशतीचे राज

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मुंबईपासून दीड हजार किमी दूर तिहार तुरुंगातील कोठडीत भरपूर व्यायाम करत दररोज सात लिटर दूध रिचवणारा बंदिस्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईतल्या अभिनेता सलमान खानला धमकावण्याचे एक - दोन नव्हे तर पाच प्रयत्न कसे करतो, हे प्रत्येकाला पडलेले कोडे. सोशल मीडियाचा वापर करत सातशेहून अधिक गुंडांची फौज गोळा करणारा स्टायलिस्ट लॉरेन्स तुरुंगात राहूनही भारतातच नव्हे तर कॅनडा, इटली, थायलंड, मेक्सिकोमध्येही उच्छाद मांडू शकतो, हे त्याला ओळखणाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.

तब्बल दोन डझन खतरनाक गुन्ह्यांची नोंद असलेला लॉरेन्स हा पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा. २०१० साली त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवातच झाली ती हत्येचा प्रयत्न, घुसखोरी आणि लुटमारीचे गुन्हे दाखल होत. विद्यार्थी चळवळीत असल्यापासूनच राडेबाजी करणाऱ्या लॉरेन्सच्या नेटवर्कबाबत जाणून घेण्याची देशभरातील पोलिसांना उत्सुकता आहे तर गुंडांना कमालीचे अप्रूप. इतक्या अल्पावधीत जगाच्या नकाशावरील अनेक देशांत तो आपले नेटवर्क कसे पसरवू शकला, याचे उत्तर त्याच्या स्टाईलबाजीत आहे. तुरुंगात लॉरेन्सशी ओळख झालेला प्रत्येक गँगस्टर त्याच्या प्रभावामुळे बाहेर पडल्यावर त्याच्याच गँगमध्ये दाखल होतो. 

अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी 
सोशल मीडियाचा पुरेपूर गैरफायदा घेत अंडरवर्ल्डमध्ये त्याने आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. आठ वर्षांपूर्वी एका काँग्रेस नेत्याची हत्या करून लॉरेन्सने थेट फेसबुकवर त्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा हलकल्लोळच माजला. अक्कडबाज मिशा आणि पिळदार देहयष्टीच्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने असलेल्या सर्व सोशल अकाऊंटवर दिसतो तो दहशत माजेल असाच मजकूर. 

स्टेटस... ‘नेक्स्ट टार्गेट सल्लू’ 
‘नेक्स्ट टार्गेट सल्लू’ हे स्टेटस त्याच्या नावाच्या इस्टाग्रामवर आजही कायम आहे. सलमान खानला जोधपूरमध्येच मारण्याची धमकी, पोलिसांच्या वेढ्यात ये - जा करताना चेहऱ्यावर दिसणारी बेफिकिरी त्याच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. जे करायचे ते वाजतगाजत, हा त्याचा खाक्या. तो इतका निर्ढावलेला की, जे करतो किंवा करायचे आहे ते बिनधास्त सोशल मीडियावर टाकून मोकळा होतो. 
ना कायद्याची भीती, ना कारवाई होण्याची तमा. त्याच्या या बेदरकारपणामुळेच त्याचा गोतावळा हा हा म्हणता वाढत गेला.

मी तर तुरुंगात, माझा काय संबंध?
तिहार तुरुंगात सुरक्षित राहून पंजाब, हरयाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत तो गुन्हेगारी कारवाया बिनदिक्कतपणे पार पडतो. तुरुंग आपल्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे जाणून तो कुठल्याही प्रकरणात जामिनावर बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही. तुरुंगात मोबाइल मिळवून तो वापरणे कैद्यांसाठी कठीण नाही. 

तुरुंगात जॅमर लावल्याचा दावा तुरुंग प्रशासन कितीही करत असले तरी तो व्हॉट्सॲपवरून बाहेरील त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असतो आणि त्यावरूनच तो निरोप, सुपाऱ्या आणि खतरनाक गुन्ह्यांचे प्लॅनही देतो, असे एनआयएला चौकशीत आढळले.  त्याच्या नावाने धमक्या देणारे मेसेज चक्क ई-मेलद्वारे पाठवून त्याचे साथीदार धनाढ्य लोकांकडून खंडणी आणि तीही बिटकॉनमध्ये मागतात. ते पकडले गेले की बिश्नोई म्हणतो, ‘माझा काय संबंध? ते माझ्या नावाचा वापर करतात.          

शत्रूचा शत्रू... आपला दोस्त
शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त, हे त्याचे आवडते सूत्र. म्हणूनच प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या विरोधकांशी हातमिळवणी करतो. त्याच्या टोळीचे जाळे वेगाने पसरण्याचे हेही एक कारण समजले जाते.  राजस्थानातील काला जठेडी असो आणि लेडी डॉन अनुराधा. त्यांच्यासोबत मिळून तो काम करतो. वेगवेगळ्या राज्यांतील गँगलीडरशी संबंध जोडत असल्याने त्याला त्या गँगचे नेटवर्क आयतेच वापरता येते. आंतरराष्ट्रीय सिंडीकेटशी त्याचे थेट संबंध. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करून कॅनडात दडलेल्या गोल्डी ब्रारशी त्याचा दोस्ताना. मेक्सिकन ड्रग कार्टेल्सशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकर अमनदीप त्याच्या थेट संपर्कात. ब्रिटनमधील मॉन्टीशी त्याची पक्की दोस्ती. शिवाय इटली, थायलंड, कॅनडा, मेक्सिको येथे त्याचे अनेक हितचिंतक गँगस्टर. त्यांच्यासोबत मिळून तो ड्रग तस्करी, जमीन कब्जा, खंडणी उकळणे, अपहरण, हत्येचे गुन्हे करतो.   
 

कित्येक सीएंची नेमणूक
भारतात उकळलेल्या खंडणीच्या रकमा तो हवालामार्फत कॅनडा, अमेरिका, दुबई, थायलंड आणि ऑस्ट्रेलियात तळ ठोकून असलेल्या साथीदारांकडे पाठवतो.  आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी कित्येक सीएंची नेमणूक केलेली. पैशांची ददात नसल्याने यंत्रणा त्याच्या पायांवर लोळण घेते. त्यामुळे त्याचा कारभार दिवसागणिक वाढतच आहे. एनआयए गेली दोन वर्षे लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांचे नेटवर्क धुंडाळून काढण्यासाठी खोदकाम करतेय. पण चार - पाच मालमत्ता जप्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती अद्याप फारसे काही लागलेले नाही. 
लॉरेन्स बिश्नोई टोळी नजीकच्या काळात तपास यंत्रणांसाठी मोठीच डोकेदुखी ठरणार, हे मात्र नक्की.  

Web Title: The story of gangster Lawrence Bishnoi who tries to kill actor Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.