चिमुरड्या मुलांना जग कळण्याआधी मृत्यू कसा कळतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:47 AM2024-04-26T07:47:36+5:302024-04-26T07:47:52+5:30

सतत टोकाला जाणारा राग हा एक आजार आहे आणि त्यावर औषधोपचारही असतात! लहान मुलांइतकेच मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे!

Special Article - Growing anger in children, why they take extreme steps like suicide | चिमुरड्या मुलांना जग कळण्याआधी मृत्यू कसा कळतो?

चिमुरड्या मुलांना जग कळण्याआधी मृत्यू कसा कळतो?

खेळताना हरणे, मित्र-मैत्रिणींनी चिडवणे, आई-वडील रागावणे.. यामुळे राग टोकाला गेलेली मुले काहीही करतात. मुले इतकी टोकाला का जाऊ लागली आहेत?  मुलांचा राग टोकाला जाणे याबाबतच्या बातम्या अलीकडे वरचेवर वाचायला मिळतात हे खरे, पण म्हणून या फक्त आजकालच्या गोष्टी असाव्यात असे निदान क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये तरी वाटत नाही. हे आधीपासून होतेच. आता अशा टोकाच्या घटना घडतात, तेव्हा त्याकडे लक्ष जाऊन  त्यांची बातमी होण्याचे प्रमाण वाढले असावे. याबाबत जागरूकता आल्याचेही हे लक्षण आहेच.

राग सहन न होण्यामागे कसला ‘ट्रिगर’ असू शकेल?  पटकन व खूप राग येणे हा काही जणांच्या स्वभावाचा भाग असतो. वातावरण पोषक असेल तर तो वाढत जातो. अगदी लहान वयातल्या मुलांच्या जगात आत्महत्येचे विचार.. आणि थेट कृती हे कसे, कुठून आले असावे? 
 विशेषतः १५-४५ या वयोगटात हे प्रमाण अधिक दिसते. निदान न झालेले मानसिक आजार, हिंसक वातावरण, कोणाचेही लक्ष  नसणे, नशेचे पदार्थ, आत्महत्या करायची साधने सहज हाताशी असणे आणि एकटेपणा ही त्याची प्रमुख कारणे आहेत. मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या ठळक प्रसिद्ध होणे योग्य आहे का? त्याबाबत काय काळजी घ्यायला हवी?

मुलांच्या आत्महत्यांचे रिपोर्टिंग हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. या बातम्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मुलांच्या आत्महत्यांचे वार्तांकन कसे करावे याबाबातच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन माध्यमांनी करणे गरजेचे आहे.

१. बालक म्हणजे १८ वर्षांखालील व्यक्ती. या वयोगटातील आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचे सविस्तर वार्तांकन टाळावे. त्यामुळे मुलांमध्ये त्याची ‘काॅपी’ होण्याची दाट शक्यता असते.  जी लहान मुले आत्महत्या, त्याचे परिणाम याबाबत अनभिज्ञ असतात, त्यांच्याबाबतीत आत्महत्यांच्या बातम्या वाचून त्याची पुढे भविष्यात काॅपी होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

२. लहान मुले चित्रे, कार्टून याकडे पटकन आकर्षित होतात. आत्महत्यांच्या बातम्यांमध्येही जर उदास मुले, डोळ्यातून पाणी वाहणारी मुले अशा प्रकारची चित्रे वापरून  बातमी दिली गेली असेल तर त्या प्रभावानेही मुलांमध्ये आत्महत्येची ‘काॅपी’ होण्याचा धोका असतो.

३. मुलांच्या आत्महत्येच्या बाबतीत अनेक घटक कार्यरत असतात. त्यामुळे बातमीत आत्महत्येचे एकच एक कारण सांगणे चुकीचे आणि धोकादायक असते. लहान मुलाने परीक्षेतील अपयशामुळे आत्महत्या केली असे सांगून/लिहून/छापून घटनेचे सामान्यीकरण होते. ‘परीक्षेत अपयश आले तर आत्महत्या करावी’ असा समज मुलांमध्ये होण्याची दाट शक्यता असते.

४. कोवळ्या, बहरण्याच्या वयात जीवनाचा शेवट.. अशा  प्रकारच्या शब्दांच्या फुलोऱ्यांमुळे आत्महत्येच्या घटनांना अनावश्यक आणि उपद्रवी ‘ग्लॅमर’ मिळते. मुलांचे लक्ष आत्महत्येच्या घटनांकडे आकर्षित होते.

५. मुलांच्या आत्महत्येच्या, आत्महत्येच्या प्रयत्नांच्या बातम्या देताना त्यात आवर्जून मुलांसाठी-पालकांसाठी काम करणाऱ्या हेल्पलाइनचे नंबरही द्यायला हवेत. जेणेकरून मुले, पालकांना वेळेत मदत मिळू शकेल.

६. परीक्षांचे निकाल जाहीर होण्याच्या काळात मुलांच्या आत्महत्यांच्या दुर्दैवी घटना घडतात. या काळात शिक्षक, पालक, धोरणकर्त्यांना मार्गदर्शन करणारा मजकूर माध्यमांनी आवर्जून प्रसिद्ध करायला हवा. अडचणीत असलेल्या मुलांपर्यंत त्यामुळे वेळेत मदत पोहोचू शकते.
आपल्या मुलाचा राग हा काळजीचा विषय आहे, हे पालकांनी कसे ओळखावे? मुलांच्या भावना सतत उतू जात असतील आणि भांडणे, रुसवा, खंडणी मागणे अशा प्रकारे वारंवार व्यक्त होत असतील तर मदत घेण्याची जरूर आहे हे लक्षात ठेवावे.

रागाला औषध असते का? 
हो. रागाची व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते. प्रत्येकाच्या रागाचा एक पॅटर्न असतो तो शोधून मानसोपचार आणि राग आजारातून येणारा असेल तर औषधोपचार करून या रागावर नियंत्रण आणता येते. हे लहान मुलांइतकेच मोठ्या माणसांच्या बाबतीतही खरे आहे!
- डाॅ. भूषण शुक्ल, बालमानसोपचार तज्ज्ञ 

हेल्पलाइन- ९९२२००४३०५, ९९२२००११२२

Web Title: Special Article - Growing anger in children, why they take extreme steps like suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.